Search This Blog

कापूस लागवडीची वेळ

कापूस लागवडीची वेळ

प्री-मान्सून लागवड
महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर खरीप हंगामात कापसाची लागवड होते. यामध्ये ज्या शेतक-यांकडे ओलिताची व्यवस्था आहे असे शेतकरी मे महिन्यामध्ये लागवड करून पाणी देतात. याला प्री-मान्सून लागवड म्हणतात. जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा व अकोला या भागामध्ये प्री-मान्सून लागवड मोठ्या प्रमाणात होते. इतरही काही भागांमध्ये अशी लागवड होते. मे महिन्यामध्ये साधारणतः २० मेनंतर मुबलक पाणी असल्यास प्री-मान्सून लागवड फार फायद्याची ठरते. ठिबक सिंचन असणा-यांसाठीसुद्धा ही लागवड योग्य आहे. काही शेतकरी फार लवकर १० मेच्या जवळपास लागवड करतात. यामध्ये मात्र कडक उन्हात रोपटे भाजण्याची शक्यता असते. तसेच उशिराच्या पावसाने झाडाच्या खालच्या भागातील बोंडे सडण्याची शक्यता जास्त असते म्हणून २० मेच्या नंतरच प्री-मान्सून कापसाची लागवड करता येईल, मात्र आपल्या शेतात किंवा जवळपास मागील वर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला असल्यास प्री-मान्सून लागवड टाळावी. प्री-मान्सून लागवडीवर यावर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त आढळून आला. त्यामुळे ही जोखीम न घेता अशा ठिकाणी लवकर लागवड टाळावी.
    प्री-मान्सून लागवडीमुळे झाडांची वाढ झपाट्याने होते. गुलाबी बोंडअळीव्यतिरिक्त इतर किडींपासून ब-याच अंशी संरक्षण होते. पीक लवकर हातामध्ये येते व दुसरे पीक घेण्यास लवकर जमीन खाली होते तसेच उत्पादनसुद्धा वाढते. वेचणीचा खर्च कमी लागतो, मजूर उपलब्ध असते, उशिरा पाऊस कमी आला तरी ब-याच अंशी बोंडे पक्व होतात. म्हणून ही लागवड करू शकत असणा-या शेतक-यांनी अवश्य करावी.
प्री-मान्सून लागवड केल्यानंतर पाऊस उशिरा आल्यास मुळांची वाढ खुटते व मर रोग येतो. झाडांची वाढ खुटून पाने लाल-पिवळी होतात. त्यासाठी पावसाला उशीर झाल्यास दाडांनी पाणी द्यावे व ठिबकसुद्धा अंतर बदलून जास्त वेळ चालवावे. या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास ठिबकद्वारे किंवा ड्रेचिंगद्वारे एकरी अर्धा लिटर फ्रेश व चांगल्या कंपनीचे ट्रायकोडर्मा किंवा अर्धा किलो ब्ल्यू कॉपर अधिक दीड लिटर रायझर अवश्य द्यावे.

वेळेवरची लागवड
     समाधानकारक पाऊस पडला म्हणजे लागवड करतात. यामध्ये साधारणतः ७५ ते १०० मि.मी. पावसाची अपेक्षा असते. या लागवडीमध्ये उगवण चांगली व एकसमान होते व नांगे भरण्याची आवश्यकता जास्त भासत नाही. मात्र, सर्वांचीच लागवड सोबत आल्याने मजुरांची टंचाई मात्र जाणवते. तसेच लागवड झाल्यानंतर पाऊस उशिरा आल्यास खाड्या (नांगे)चे प्रमाण वाढते.

धूळपेरणी
     धूळपेरणी ही पाऊस येण्यापूर्वी करतात. पावसाळा सुरू होण्याच्या आधीच कापसाची लागवड करतात. मग पहिल्या पावसामध्येच हे बियाणे उगवते अशा लागवड केलेल्या बियाण्याची जोमात वाढ होते व उत्पन्नात वाढ होते. मात्र, या लागवड पद्धतीमध्ये पहिला पाऊस कमी आला व नंतर लवकर आलाच नाही तर उगवणशक्ती कमी होण्याची किंवा उगवलेली रोपटी जळण्याची शक्यता असते. म्हणजेच आपण जर जोखीम पत्करण्यास तयार असाल तर ही लागवड फायद्याची आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, मोताळा, नांदुरा या तालुक्यांमध्ये हजारो शेतकरी कापसाची धूळपेरणी करतात व ते फायद्यात आहेत. ४-५ वर्षांत एखाद्या वर्षी मात्र बियाण्याचे नुकसान होऊ शकते.
प्री-मान्सून व वेळेवरच्या पेरणीमध्ये रासायनिक खत पेरणीपूर्वी किंवा पेरणीबरोबर देता येईल. मात्र, धूळपेरणीमध्ये रासायनिक खत आधी किंवा पेरणीबरोबर न देता बियाणे उगवल्याबरोबर द्यावे.

खाडे किंवा नांगे भरणे.
     अपेक्षित उगवण न झाल्यास एकरी झाडांची संख्या कमी होते. त्यामुळे लागवड पद्धत कोणतीही असो ज्या ठिकाणी बियाण्याची उगवण झाली नाही तिथे ताबडतोब नांगे भरावेत. जास्त उशिरा नांगे भरल्यास या झाडांवर जास्त कीड येते.
     विषम अंतर पद्धतीमध्ये एका ठिकाणी दोन बिया लावण्याऐवजी एका जागी एकच बी लावणे फायद्याचे आहे. मात्र, ताबडतोब खाडे भरावेत. समान अंतर पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या कमी असल्याने एक बी लावण्याची जोखीम घेऊ नये. कापसाच्या कोणत्याच वाणामध्ये १०० टक्के उगवण क्षमता नसते. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असलेले बियाणे विकता येते म्हणजेच त्यामध्ये ३० टक्के बियाण्याच्या उगवणशक्तीबद्दल निश्चितता नाही. म्हणून एक बी लावल्यास खाडे ताबडतोब भरावेत.



No comments:

Post a Comment