Search This Blog

कापूस लागवडीचे अंतर


कापूस लागवडीचे अंतर

कापूस लागवडीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये मोठे बदल होऊन नवीन पद्धतींचा प्रचार कृषी क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी केला. ज्यामुळे उत्पादनामध्ये लक्षात येईल अशी भरीव वाढ झाली. बीटी वाणांच्या लागवडीमध्ये लागवडीच्या अंतराला फार महत्त्व आहे. ज्यामुळे एकरी झाडांची संख्या ठरते. योग्य एकरी झाडांची संख्या असल्यावरच उत्पादनामध्ये वाढ होते. यामध्ये साधारणतः तीन पद्धती आहेत. ज्यांचे फायदे व तोटे खालीलप्रमाणे आहेत.

 समान अंतर पद्धत
यामध्ये दोन झाडांमधील व दोन ओळींमधील अंतर सारखे असते म्हणजे २x२ फूट, ३४३ फूट, ४x४ फूट याप्रमाणे. पूर्वी नॉन बीटी कापसाची लागवड या पद्धतीनेच करीत असत. या पद्धतीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे दोन्ही बाजूंनी आंतरमशागत होते. ज्यामुळे निंदणाचा खर्च वाचतो. मात्र, यात एकरी झाडांची संख्या वाढवू शकत नाही. तसे केल्यास कापूस दोन्ही बाजूंनी दाटतो. ठराविक वाढीनंतर आंतरमशागत, फवारणी शक्य होत नाही. कापूस वेचणीस त्रास होतो. एकूणच या पारंपरिक पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या न वाढवता आल्याने उत्पादनामध्येसुद्धा जास्त वाढ अपेक्षित नाही.

 विषम अंतर पद्धत
यामध्ये दोन झाडांमधील अंतर कमी व दोन ओळींमधील अंतर जास्त ठेवले जाते. एका बाजूने कापूस दाटतो. मात्र, दुसरी बाजू मोकळी राहते. त्यामुळे एकरी झाडांची संख्या वाढते. हवा खेळती राहते व सूर्यप्रकाश मिळतो, उशिरापर्यंत आंतरमशागत व फवारणी करणे शक्य होते. कापूस वेचणीस त्रास व नुकसान होत नाही. या पद्धतीमध्ये दोन झाडांमधील अंतर दीड फुटापेक्षा कमी असल्यास आडवी-उभी मशागत होत नाही; पण हे अंतर दीड किंवा दोन फूट असल्यास सुरुवातीच्या दोन-तीन डवरण्या आडव्या, उभ्या शक्य होतात. या सर्व फायद्यामुळे विषम अंतर पद्धतच फायद्याची आहे. ज्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा एकरी झाडांची संख्या वाढवून उत्पादन २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढवणे शक्य आहे.
या पद्धतीमध्ये दोन ओळींमध्ये शेवटपर्यंत दाटणी होणार नाही एवढे अंतर ठेवावे. हे अंतर आपली जमीन, पाण्याची व्यवस्था, आपले व्यवस्थापन या गोष्टींवरून ठरवता येते. तणांचा उपद्रव जास्त असल्यास किंवा सुरुवातीला आडवी-उभी डवरणी करायची असल्यास दोन झाडांमध्ये दीड किंवा दोन फूट अंतर ठेवावे. नसता झाडांची संख्या वाढण्यासाठी एक फूट अंतर ठेवावे. दोन ओळीतील अंतर प्रत्येक शेतानुसार, तेथील परिस्थितीनुसार किंवा शेतक-यानुसार बदलू शकते. दोन ओळीत किमान ३ फूट व जास्तीत जास्त ६ फूट अंतर घेऊ शकतो. ३ फुटांपेक्षा कमी व ६ फुटांपेक्षा जास्त अंतर ठेवू नये.

क) जोड ओळ पद्धत
यामध्ये दोन झाडांमधील अंतर कमी असते तर एका बाजूकडील ओळीचे अंतर जवळ तर दुस-या बाजूकडील ओळीतील अंतर दूर असते. जसे ५x२x२ फूट किंवा ५४२४३ फूट याप्रमाणे. ज्यामुळे एकरी झाडांची संख्या वाढते. मात्र, कापूस तीन बाजूंनी दाटतो. फक्त एकच बाजू मोकळी राहते व त्यामुळे नैसर्गिक गळ होते व मशागतीससुद्धा अडचणी निर्माण होतात. ज्यामुळे उत्पादन वाढीसाठी या पद्धतीचा फारसा फायदा होत नाही.

ड) सरी वरंबा पद्धत
यामध्ये दीड ते दोन फूट उंच वरंबा करून वरंब्यावर कापसाची लागवड करतात. मात्र, यामध्ये झाडांची वाढ झाल्यानंतर उपटून पडण्याची भीती असते. आंतरमशागत कठीण असते. फक्त चिभाड जमिनीमध्ये हमखास पाणी व ठिबक सिंचन असल्यास या पद्धतीचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो


वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास बी.टी. कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सर्वांत चांगली विषम अंतर पद्धतच आहे. खालील तक्त्यामध्ये विविध अंतर पद्धतीतील झाडांची संख्या दर्शविली आहे. ज्यामुळे तुम्हाला एकरी झाडांच्या संख्येमध्ये पडणारा फरक लक्षात येईल.



अंतर ठरवताना आपल्या शेतात कापूस किती वाढतो, आपण कोणती जात लावणार, खते किती देणार, पाण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींचा विचार करून स्वतः अंतर ठरवावे, प्रत्येक शेतामध्ये सारखे अंतर नसू शकते.

No comments:

Post a Comment