कापसाची पूर्वमशागत
उत्कृष्ट नियोजनाशिवाय फायद्याची शेती करणे कठीण आहे. पूर्वी शेतात मजूर
पाठवून शेतमालक बियाणे खरेदी करायला जात असे, म्हणजे लागवड चालू होईपर्यंतसुद्धा
कोणत्या शेतामध्ये काय लावायचे याचे नियोजन नसे. आता मात्र असे प्रकार घातक ठरतील.
आपण यंदाचे पीक निघाल्याबरोबर पुढच्या वर्षीचे शेतीनुसार पिकांचे क्षेत्र ठरवावे.
शक्यतोवर पिकांचा फेरपालट करावा. कोणत्या शेतात कोणते पीक घ्यायचे. त्याचे कोणते
वाण लावायचे ते वाण कुठे सहज व स्वस्त मिळेल. त्यासाठी खत, कीटकनाशके, मजुरी कधी व
किती लागेल, पिकांचे क्षेत्र ठरवताना एका वर्षाच्या उत्पादनाचा किंवा
बाजारभावाच्या अनुभवाऐवजी जास्त वर्षांचा अनुभव घेऊन ठरवणे बरे. या सर्वच
गोष्टींचा विचार करून नियोजन करणे जरूरी आहे. सर्व गोष्टींचे नियोजन व त्यानुसार
व्यवस्थापन करून फायद्याची शेती करण्याला व्यापारी दृष्टिकोन म्हणतात.
कापूस लागवड तंत्रामध्ये सुरुवात होते ती पूर्वमशागतीपासून. त्यामध्ये
साधारणतः खालील बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. आपण जरी या सर्व गोष्टी
वर्षानुवर्षे करत आलो आहोत तरीसुद्धा यांचे शास्त्रीय महत्त्व काय आहे. यापासून
काय फायदे होतात. हे नक्की कधी व कसे करावे. याबद्दल थोडक्यात माहिती पुढे दिली
आहे.
अ) नांगरणी
मागील वर्षीचे पीक काढल्यानंतर ज्या शेतामध्ये कापसाची लागवड करायची ते शेत
नांगरणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे जमिनीचा थर खालीवर होतो. घट्टपणा कमी होतो,
तणांचे नियंत्रण होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, कापसाची मुळे खोलवर जाऊ
शकतात. किडींच्या कोषांचा नायनाट झाल्यास किडींचा उपद्रव कमी होतो. या व इतर अनेक
कारणांसाठी नांगरणी महत्त्वाची आहे.
काही शेतक-यांच्या म्हणण्यानुसार चोपड्या जमिनीमध्ये कापूस चांगला येतो.
मात्र, सुरुवातीला कमी पाऊस असला तरच नांगरणीपेक्षा चोपड्या शेतात सुरुवातीची वाढ
चांगली दिसते; पण पुढे जसे पिकाचे वय वाढते तसतसे चोपड्या शेतापेक्षा नांगरलेल्या
शेतातील कापूस जोमाने वाढतो. मुळांना सहजतेने अन्नद्रव्ये मिळतात. नांगरणी
केल्याने जमीन तापते व जमिनीचे निर्जंतुकीकरण होते. शक्यतोवर पीक निघाल्याबरोबर
ताबडतोब नांगरणी केल्यास पिकाचा पालापाचोळा जमिनीमध्ये दबतो व सेंद्रिय कर्बाचे
प्रमाण वाढते तसेच भरपूर ऊन मिळाल्याने निर्जंतुकीकरण होऊन फायदा होतो. त्यामुळे
शक्य तेवढ्या लवकर नांगरणी आटोपावी. जास्त खोलवर नांगरणी करू नये व जमीनीत थोडा
ओलावा असताना नांगरणी केल्यास सेंद्रिय घटक कुजण्याची प्रक्रिया सुरळीत होते.
ब) वखरवाही
जमीन चांगली तापल्यानंतरच आडवी-उभी वखरवाही करावी. त्यामुळे ढेकळे मोकळे
होतील. वखरवाहीसाठी जास्त घाई करू नये. काही शेतकरी नांगरणी झाली की ताबडतोब
वखरवाही करतात, हे चुकीचे आहे. या दोन्हीमध्ये चांगले अंतर असावे. पेरणीपूर्वी एक
वखरवाही (जांभूळवाही) दिल्यास तणांचा उपद्रव २० टक्क्यांपर्यंत कमी होतो.
क) शेणखताचा वापर
शेणखताचा उकंडा
उकंडा हा सर्वांत दुर्लक्षित भाग. आधीच शेणखत, सेंद्रिय खते मिळत नाहीत,
त्यातही जे आहे त्यांची व्यवस्थित निगा घ्यावी, नसता अन्नद्रव्ये वाहून जाऊन
त्यामध्ये फक्त चोथा राहील. उकंड्याचा आकार ३ फूट खोल, ४ फूट रुंद व पाहिजे तेवढा
लांब असावा. हा फार खोल किंवा फार उथळ नसावा. उतारावर नसावा. त्यामध्ये पाणी साचून
वाहून जाऊ नये. फक्त पाहिजे तेवढेच पाणी त्यामध्ये साचावे. उकंड्याच्या बाजूला
गाजर गवत किंवा इतर तणे नसावीत. उकंड्यामध्ये शेण, पालापाचोळा, काडीकचरा,
जनावरांचा शिल्लक कडबा व इतर कुजू शकेल असे सर्व घटक टाकावेत. बाजारामध्ये
डिकंपोजर (सेंद्रिय घटकांना कुजवणारे जिवाणू) मिळतात. उकंडा लवकर व चांगला
कुजवण्यासाठी आपण त्यांचा वापर करू शकतो. चांगले कुजवल्याशिवाय शेतात हे सेंद्रिय
घटक वापरू नयेत.
शेतामध्ये शेणखताच्या वापराला फारच महत्त्व आहे. पूर्वी फक्त शेणखते वापरून
चांगले उत्पन्न मिळत असे. आता अनेक कारणांमुळे जनावरे कमी झाली व शेणखत दिसेनासे
झाले. विकत मिळत असल्यास व काही घरचे जमेल तेवढे शेणखत चांगली प्रक्रिया करून
योग्य पद्धतीने वापरावे. त्यामुळे उपलब्ध खतापासून जास्त फायदा मिळेल.
बरेच शेतकरी उन्हाळा सुरू झाल्याबरोबर शेणखत शेतात पसरवून देतात. ज्यामुळे शेणखतातील
उपयुक्त जिवाणू कडक उन्हामुळे नष्ट होतात. शेणखत शेतात नेऊन सावलीमध्ये साठवावे.
त्यामध्ये साधारणतः एक ट्रॅक्टर शेणखतासाठी १ किलो ट्रायकोडर्मा + १२ किलो
अझाटोबॅक्टर + १/२ किलो पी.एस.बी. + १/२ किलो के.एस.बी. सर्व फ्रेश व चांगल्या
गुणवत्तेचे जिवाणू लिक्वीड स्वरूपात मिळाल्यास प्रमाण अर्धे करावे. २०० लिटर
पाण्यामध्ये मिसळून हे सर्व जिवाणूमिश्रित पाणी अंदाजे एक ट्रॉली शेणखतामध्ये समान
टाकायचे. शेणखत हलवून घ्यायचे व अजून पाणी टाकून त्याला ओले करायचे. शक्य झाल्यास
काही काळाने परत ओलावा राहण्यासाठी शेणखतामध्ये पाणी सोडावे. ही प्रक्रिया केल्यास
अर्धवट व न कुजलेले शेणखत कमी काळातच चांगले कुजेल. नत्र, स्फुरद व पालाश
विरघळणा-या व पिकास उपलब्ध करून देणा-या जिवाणूंची संख्या वाढेल. शेणखताची
उपयुक्तता मोठ्या प्रमाणात वाढेल, घातक बुरशी नष्ट होईल. या सर्व प्रक्रियेला मोठा
खर्च नाही; पण याचा फायदा मात्र खूप मोठा होतो. आता वाढलेल्या रासायनिक खतांच्या
किमती पाहता शेणखताचा वापर व त्याची उपयुक्तता वाढवणे हा चांगला पर्याय आहे.
जिवाणू खते मात्र चांगल्या गुणवत्तेची व फ्रेश मिळणे महत्त्वाचे आहे.
ऊन कमी झाले किंवा मृगछाया आली म्हणजे हे कुजलेले शेणखत शेतात पसरवावे.
जास्त प्रमाणात शेणखत उपलब्ध नसल्यास किमान लागवडीच्या तासामध्ये किंवा फुलीच्या
बाजूला तरी टाकावे. रासायनिक खतांची उपयुक्तता वाढवण्यासाठी चांगले कुजलेले व
बारीक झालेले शेणखत त्या खतांमध्ये मिसळून टाकावे. दरवर्षी शेणखत दिल्यास रासायनिक
खतांची मात्रा ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. शेणखताच्या वापरामुळे जमिनीमध्ये
सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. जमिनीची सुपीकता वाढून पाणी धरून ठेवण्याची
क्षमता वाढते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धतासुद्धा वाढते. अर्धवट
कुजलेल्या, शेणाच्या गोव-या वापरल्यास एकतर जास्त पाण्यामध्ये हे वाहून जाते किंवा
त्याला कुजवण्यासाठी जमिनीतील जिवाणूंची शक्ती खर्च होते. ह्युमणी अळी व वाळवी (उधळी)सुद्धा
वाढते.
ड) जमिनीचे सपाटीकरण
पूर्वमशागतीमध्ये नांगरण, वखरण, शेणखतानंतर, सपाटीकरणही महत्त्वाची गोष्ट
आहे. जमिनीचे सपाटीकरण करताना वखर उलटा करून त्यावर उभे राहून किंवा डिस्क
हॅरोच्या साहाय्याने ढेकळे फोडून जमिनीचे सपाटीकरण करावे. त्यामुळे चांगली फुली
पाडता येते. पाणी देणे सोपे होते व आंतरमशागत व्यवस्थित होते.
इ) निचराव्यवस्थापन
चोपण किंवा चिभाड जमिनीमध्ये निचरा होत नसल्याने पाणी साचून राहते अशा
ठिकाणी पिकाची चांगली वाढ होत नाही. तणांचा फार त्रास होतो. रासायनिक खते
पाण्याबरोबर वाहून जातात, या सर्व अडचणी चर काढल्यास दूर होतात. त्यासाठी अशा
शेतामध्ये चर (नाली) काढणे फार फायद्याचे आहे.
पाणी साचून राहणा-या, चोपण किंवा चिभाड जमिनीमध्ये कापूस लागवडीची शिफारस
नाही. मात्र, तरीसुद्धा बरेच शेतकरी अशा जमिनीत कापसाची लागवड करतात. त्यासाठी अशा
जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा. साधारणतः ५ ते १० क्विंटल जिप्सम प्रतिएकर
वापरल्यास अशा जमिनीमध्ये फायदा होतो व त्यायोग्य जातीची निवड करावी तसेच उताराला
आडवा चर काढून पाणी शेताबाहेर काढावे. यामुळे फायदा होईल. चर हा दीड ते दोन फूट
रुंद व तेवढाच खोल असावा व लागवडीपूर्वीच खोदावा. त्यामध्ये जास्तीचे पाणी झिरपून
जमा होईल व शेताबाहेर जाऊन शेतात वापसा राहील. अशा शेतामध्ये विहीर असल्यास जास्त
पावसाळ्यामध्ये या विहिरीचे पाणी सतत उपसून दूर नाल्यामध्ये सोडावे. यामुळेसुद्धा
वापसा स्थिती राहण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment