जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय
उत्पादन वाढीच्या
शर्यतीमध्ये आपण जमिनीचा विचार केलाच नाही. आता पूर्वीसारखी जमीन सुपीक राहिली
नाही. कारण तिच्याकडून फक्त घेणेच चालू आहे. तिला दिला जाणारा मोबदला जसे शेणखत,
सेंद्रिय खत, हिरवळीचे खत इत्यादी हे अत्यल्प किंवा देणे बंदच झाले. फक्त जास्तीत
जास्त उत्पादन कसे काढावे याचेच समीकरण आपण बांधत आहोत. पूर्वी ज्या जमिनीमध्ये
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १% पर्यंत असायचे ते आता ०.६५% पर्यंत आलेले आहे. याच
प्रकारे भविष्यातही आपण जमिनीची काळजी घेतली नाही, तर कितीही रासायनिक खत दिले तरी
उत्पादन येण्याची खात्री नाही. कारण दिलेले रासायनिक खत त्याच स्वरूपामध्ये
पिकांना मिळत नाही. त्याचे स्वरूप बदलून देण्याचे काम जिवाणू करतात व त्या
जिवाणूंचे खाद्य सेंद्रिय पदार्थ आहेत. हे सेंद्रिय पदार्थ शेणखत, हिरवळीचे खत,
गांडूळ खत, सेंद्रिय खत, निंबोळी पेंड इत्यादींमध्ये आहे. त्यामुळे यापैकी
कुठल्याही सेंद्रिय पदार्थांचा वापर करून आपण जमिनीची सुपीकता वाढवू शक्यतो. खालील
काही पर्याय दिले आहेत त्यापैकी आपणास शक्य तो पर्याय निवडून जमिनीच्या सुपीकतेकडे
व रासायनिक खतांच्या उपलब्धेकडे लक्ष द्यावे.
१) पिकाची फेरपालट (एकच पीक सतत एकाच शेतात न घेता
त्या ठिकाणी पिकाचा फेरपालट करावा.)
२) पालापाचोळा, कचरा, पीकाचे अवशेष ओलाव्यात गाडणे.
(शेतातील पिकाचे अवशेष जसे पालापाचोळा, पन्हाट्या व इतर जमिनीमध्ये ओलावा असताना
गाडावा.
३) शेणखताचा रासायनिक खतासोबत वापर. (शक्य होईल तेवढे
चांगले कुजलेले शेणखत वापरण्याचा प्रयत्न करावा. नसता किमान थोडे तरी शेणखत
रासायनिक खतासोबत वापरावे. त्यामुळे रासायनिक खतांची उपलब्धता वाढते.)
४) रासायनिक खतांच्या मात्रा जास्त भागांमध्ये
विभागून देणे. (दिलेले रासायनिक खत हे ५०% पेक्षा जास्त उपलब्ध होत नाही. त्याची उपलब्धता
वाढवण्यासाठी खत हे जास्त भागामध्ये विभागून द्यावे.)
५) चांगल्या गुणवत्तेच्या ह्युमिक अॅसिडचा खतासोबत
वापर. (ह्युमिकअॅसिडमध्ये ह्युमस नावाचा घटक असतो. ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते
व पांढ-या मुळांची संख्या वाढते. चांगले गुणवत्तेचे ह्युमिक अॅसिड पिकांना द्यावे.)
६) जिवाणू खतांचा वापर. (बाजारामध्ये वेगवेगळ्या
नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जिवाणू मिळतात. त्यातील
चांगल्या गुणवत्तेच्या व फ्रेश जिवाणूंचा वापर सर्व पिकांसाठी दरवर्षी करावा.)
७)रासायनिक खतांचा संतुलित वापर. (रासायनिक खतांची
उपलब्धता वाढविण्यासाठी संतुलित खतांचा वापर करावा.)
८) विद्राव्य खतांचा वापर. (गरजेनुसार योग्य
ग्रेडच्या विद्राव्य खतांचा वापर करावा.)
खतांच्या वापराबाबतचे महत्त्वाचे मुद्दे
खते विकत घेताना दर किलो
पोषक द्रव्याला काय किंमत पडते ते पाहणे आवश्यक आहे. ज्या खतात हा खर्च कमी येईल
ते विकत घेणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल. चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम
सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराचसा नत्र हवेत उडून जातो,
म्हणून ही अथवा इतर नत्रयुक्त खते जमिनीत टाकल्यास ती मातीत मिसळावीत. तसेच चुनखडी
जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर टाळावा. त्याऐवजी डी ए पी किंवा इतर खते
वापरावीत व पीक पिवळे होत असल्यास झिंक सल्फेट व फेरस सल्फेट एकरी ५ किलो
पेरणीसोबत द्यावे. पाऊस सुरू असताना युरियाऐवजी अमोनियम सल्फेट देणे अधिक फायदेशीर
ठरते. खते बियाण्यासोबत मिसळून पेरल्यास बियाण्याला अपाय होण्याची शक्यता असते,
म्हणून ती बियाखाली व बियांच्या बाजूला ५ सें.मी. खोल पेरून द्यावीत. बी
उगवल्यानंतर त्याची मुळे खतापर्यंत पोहोचतात व खतातील अन्नद्रव्यांचे शोषण करतात.
नत्रयुक्त खते एकदाच न देता अर्थी मात्रा पेरताना व उरलेली अर्थी मात्रा वरखत
म्हणून पेरणीनंतर एक किंवा दोन हप्त्यांत विभागून शिफारशीप्रमाणे द्यावी. वरखते
पिकाच्या ओळींमधून अथवा रोपाभोवती द्यावीत. मातीपरीक्षण केल्यानंतर विदर्भ व
मराठवाड्यातील बहुतांश जमिनीमध्ये पालाशचे भरपूर प्रमाण आढळते. हा पालाश उपलब्ध
स्वरूपात नसल्यामुळे आपणास पालाश वरखताच्या माध्यमातून देणे गरजेचे आहे.
कम्पोस्ट खड्याची (उकंड्याची) जागा व त्याचा आकार
खताच्या खड्याची जागा
शक्यतो जनावरांच्या गोठ्याजवळ उंच असावी. पावसाचे पाणी खड्यात जाऊन परत बाहेर जाऊ
नये. त्यासाठी खड्याभोवती १०-१५ सें.मी. उंचीचा बांध घालणे चांगले. कचरा कुजण्याचीक्रिया
सूक्ष्म जिवाणूद्वारे होत असते आणि त्यांची वाढ होण्याकरिता आवश्यक तो ओलावा व
उष्ण तापमान लागते. त्यासाठी गरजेनुसार जवळच पाणी उपलब्ध असावे. पावसाळ्यात
पावसाचे पाणी खताच्या खड्यात जाऊन त्यातून वाहू नये याची काळजी घ्यावी. वर्षात दोन
वेळेस खड्यात पाणी भरल्यास कुजण्यास मदत होते.
सर्वसाधारणपणे कंपोस्ट
खड्डा किंवा उकंडा २ मीटर रुंद, १ मीटर खोल असावा. लांबी मात्र आवश्यकतेनुसार ५ ते
१० मीटरपर्यंत ठेवावी. २ खड्यामध्ये २ मीटर अंतर असावे. खड्याचा तळ व बाजू थोड्या
ठोकून टणक कराव्यात.
गांडूळ खत
रासायनिक खताला पर्याय
आणि जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी गांडूळ खताचा वापर करणे योग्य आहे.
गांडूळ खत (व्हर्मी कंपोस्ट) म्हणजे काय?
यामध्ये गांडुळाची
विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाचे अंडीपुंज (ककुन्स), त्यांच्या
बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो.
गांडूळ खत तयार करण्याची सुलभ पद्धत
गांडूळ खत तयार
करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी शेतात किंवा गोठ्याच्या आवारात तात्पुरते
छप्पर उभारून जमिनीवर गादी वाफे तयार करून त्यात मोठ्या प्रमाणात गांडूळ खताची
निर्मिती करता येते. यामध्ये आयसोनिया फिटिडा किंवा युड्रिलस युजेनिया या
पृष्ठभागावर कार्य करणाच्या गांडुळाच्या जातींचा वापर करण्यात येतो.
सामुग्री : या पद्धतीमध्ये
हवेशीर; परंतु गांडुळाचे उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी साध्या
गवती किंवा बांबूच्या ताट्यांपासून तयार केलेल्या तात्पुरते छप्पराची आवश्यकता
असते. पावसाळ्यात आत पाणी शिरू नये म्हणून छप्पराला प्लास्टिक किंवा ताडपत्री
लावणे आवश्यक
आहे. त्याचप्रमाणे गांडूळ खत निर्मितीसाठी
गांडुळाचे आवडते खाद्य उदा. गुराढोरांचे शेण, बकन्या आणि मेंढ्यांच्या लेंड्या,
घोडा-गाढवांची लीद, शेतातील निरुपयोगी सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा, भाज्या आणि
फळांचे टाकाऊ भाग तसेच वाचलेले अन्नपदार्थ इत्यादी जमा करावेत, ही पूर्वतयारी
केल्यानंतर गांडूळखत निर्मितीसाठी खालील पद्धत अमलात आणावी.
१) गांडुळासाठी गादी वाफे (बेड) तयार करणे
तात्पुरते छप्पर
उभारल्यानंतर त्याखालील जागेवरील माती ५ ते ६ सें.मी. खोदून मोकळी करावी. त्यावर ७
ते १० सें.मी. उंचीचा पाऊण ते एक मीटर रुंद आणि आवश्यकतेनुसार लांबीचे एक किंवा
अनेक गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये साधारणपणे ३० सें.मी. अंतर ठेवावे.
गादी वाफा तयार करण्यासाठी उसाची वाळलेली पाने, चिपाड, वाळलेले गवत, पालापाचोळा
किंवा शेतातील इतर टाकाऊ सेंद्रिय पदार्थ यांचा प्रथम ५ ते ६ सें.मी. जाडीचा थर
द्यावा. त्यावर कुजलेल्या शेणखताचा पातळ थर द्यावा. अशा त-हेने तयार केलेले गादी
वाफे वर्षभर वापरता येतील.
२) गांडुळासाठी खाद्यपदार्थांचे मिश्रण तयार करणे
हे मिश्रण छपराच्या बाहेर मोकळ्या जागेत तयार
करावे. त्यासाठी ४ ते ५ दिवसांपूर्वी गोळा केलेले गुराढोरांचे शेण किंवा इतर
प्राण्यांची विष्ठा अर्धा भाग आणि घरादारांतील किंवा शेतातील टाकाऊ सेंद्रिय
पदार्थ अर्धा भाग घेऊन ते फावड्याच्या साहाय्याने एकत्र मिसळावे. त्यावर थोडे पाणी
टाकून,गोवाया थापता येतील इतपत खाद्यमिश्रण मऊ करावे.
३) खाद्यपदार्थांचे मिश्रण गादी वाफ्यावर टाकणे
तयार केलेले खाद्यमिश्रण
लहान घमेल्याच्या साहाय्याने गादी वाफ्यावर टाकावे. त्यासाठी प्रथम दोन घमेले
वाफ्यावर पालथे घालून, हे दोन्ही ढीग एकमेकाला जोडून राहतील याची काळजी घ्यावी.
त्यानंतर पुन्हा एक घमेले दोन्ह ढिगांच्या मधोमध वरील बाजूला टाकून तिसरा ढीग
टाकावा. अशा रीतीने लांबीच्या दिशेने खाद्यमिश्रण टाकत जावे.
४)
खाद्यमिश्रणावर गांडूळ किंवा ताजे गांडूळ खत टाकणे
साधारणपणे प्रत्येक पाच
घमेले खाद्यमिश्रणावर १०० गांडूळे किंवा १ किलो ताजे गांडूळ खत (अंडी/पिल्लेयुक्त)
टाकावे.
५)
खाद्यमिश्रणावर गवत किंवा जुनाट पोत्याचे आच्छादन टाकावे
गादी वाफ्यावर
खाद्यमिश्रण टाकून झाल्यावर त्याच्या सर्व बाजू झाकण्यासाठी वाळलेले गवत किंवा
जुनाट पोत्याचा वापर करावा. त्यामुळे मिश्रण ओलसर राहील आणि पक्ष्यांपासून
गांडुळांना संरक्षण मिळेल. हे
आच्छादन मधूनमधून बाजूला सारून खाद्यमिश्रणात
गांडुळाची वाढ होते किंवा नाही हे पाहावे. शिवाय आत गांडुळाचे नैसर्गिक शत्रू
(उदा. बेडूक, उंदीर, साप, पाली वगैरे) आढळल्यास त्यांचा बंदोबस्त करावा.
६) खाद्य : खाद्यमिश्रण माफकपणे
ओलसर ठेवण्यासाठी उन्हाळ्यात किमान दोन वेळा (सकाळी व संध्याकाळी) आणि इतर दिवसांत
एक वेळा झारीने (आच्छादनावर) पाणी घालावे. हे पाणी वाफ्याच्या आजूबाजूला उतरणार
नाही याची काळजी घ्यावी.
७) गांडूळ खत तयार झाल्यानंतर त्यापासून गांडूळ वेगळे करणे
या पद्धतीप्रमाणे गांडूळ
खत तयार होण्यासाठी सुरुवातीला ४० ते ४५ दिवस लागतात. पुढे हा कालावधी कमी होतो.
शेवटच्या ४ ते ५ दिवसांत खाद्यमिश्रणावरील आच्छादन बाजूला काढून पाणी टाकणे बंद
करावे. जसजसे गांडूळ खत कोरडे होत जाईल तसतसे गांडूळ गादी वाफ्यात शिरतील.
त्यानंतर कोरडे खत गोळा करून ते रेती गाळण्याच्या चाळणीने (२.५ मि.मी.) गाळून
घ्यावे. चाळणीवर जे गांडूळ जमा होतील त्यांचा पुन्हा खत निर्मितीसाठी वापर करावा.
गांडूळ खताचा विविध पिकांसाठी जोरखत म्हणून उपयोग करावा.
हिरवळीचे खत
जमिनीची उत्पादकता
टिकविण्यासाठी सेंद्रिय खताची फार गरज आहे; परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस
दुर्मिळ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागविण्यासाठी
हिरवळीची खते शेतीला व शेतक-यांना वरदान ठरू शकतात. हिरवळीच्या खतांचे पीक शेतात
मिश्र किंवा एखाद्या मुख्य पिकात आंतरपीक म्हणून किंवा हिरवळीचे मुख्य पिक
म्हणूनही घेतले जाते व पीक फुलो-यावर असताना जमिनीत गाडले जाते. हिरवळीचे खत
म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती किंवा पानांसह कोवळ्या फांद्या जमिनीत
गाडणे होय. ही पिके जमिनीत अन्नपुरवठ्याबरोबरच तिचे भौतिक व रासायनिक गुणधर्म
सुधारण्यास मदत करतात.
हिरवळीच्या खताचे प्रकार
हिरवळीच्या खताचे प्रकार
१)
हिरवळीच्या खताचे पीक
शेतात वाढवून फुलो-यापूर्वी ते जमिनीत गाडणे. (उदा. ताग/बोरू, धैंचा, चवळी
इत्यादी)
२)
हिरवळीच्या खताचे पीक
शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने
शेतात आणून जमिनीत मिसळणे/ गाडणे. (उदा. गिरीपुष्प, सुबाभूळ, शेवरी इत्यादी)
बोरू
बोरू हे पीक उत्कृष्ट
हिरवळीचे खत आहे. हे पीक शेंगवर्गीय द्विदल वर्गातील असल्यामुळे त्याच्या मुळावर
असंख्य नत्र शोषण करणाच्या जिवाणूच्या गाठी असतात. या झाडांची उंची १२ ते ३.० मीटर
असून, बुंध्याची जाडी २.० सें.मी.पर्यंत असते. झाडाला भरपूर पाने असतात. फुले
पिवळ्या रंगाची असतात. हे फारच जोमाने वाढते.
पीक जमिनीत गाडल्यानंतर
कुजन हेक्टरी ५० ते ६० किलो नत्राचे स्थिरीकरण होते. झाडाच्या सेंद्रिय पदार्थात
०.८% नत्र, १% स्फुरद व ०.५% पालाश असते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे पानासहित
संपूर्ण झाड लवकर कुजते.
लागवड तंत्र
लागवड तंत्र
खरीप व बागायती असल्यास रबी व उन्हाळ्यात पेरू
शकतो.
मशागत : शेतीची मुख्य पिकासाठी नेहमीप्रमाणे खोल नांगरट करून वखराच्या
पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
पेरणीची वेळ : कोरडवाहू परिस्थितीत पहिला पाऊस पेरणीयोग्य झाल्यानंतर ताबडतोब
पेरणी करावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये उशिरा करू नये; अन्यथा मुख्य पिकास उशीर
होऊ शकतो. जमिनीत पुरेसा ओलावा अत्यंत आवश्यक आहे.
पेरणी पद्धत : पेरणी सरत्याने किंवा तिफणीने करावी. दोन ओळींमध्ये अंतर ३०
सें.मी. ठेवावे. बी जमिनीत ३ ते ४ सें.मी. खोलीवर पेरावे. पेरणी उताराला आडवी
करावी. फेकीव पद्धतीने पेरणी टाळावी. ओलिताची उपलब्धता असल्यास चांगले ओलित
देऊनसुद्धा पावसाळ्यापूर्वी लागवड करता येते.
बियाण्याचे प्रमाण : पेरणीसाठी एकरी १० ते १५ किलो बियाणे वापरावे.
पेरणीसाठी जुने बी वापरू नये. बियाण्यास रायझोबियम जिवाणू खताची बीजप्रक्रिया
केल्यास उत्तम.
खतव्यवस्थापन : सेंद्रिय शेती पद्धतीत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरू नये.
एकात्मिक अन्नद्रव्यव्यवस्थापन पद्धतीत पेरणीच्या वेळी एकरी २५ किलो डी ए पी
दिल्यास मुळांची व त्यावरील गाठींची योग्य प्रमाणत वाढ होऊन पीक जोमाने वाढते.
आंतरमशागत व ओलितव्यवस्थापन : या पिकास विरळणी, आंतरमशागत व तणनियंत्रण
करण्याची आवश्यकता नाही. सहसा खरीप हंगामात ओलिताची गरज भासत नाही.
बोरू जमिनीत गाडणे/दाबणे : पीक फुलो-यात येण्यास सुरुवात झाल्यानंतर किंवा
पेरणीपासून ४० ते ५० दिवसांनी नांगराने किंवा ट्रैक्टर जमिनीत चांगल्या प्रकारे
गाडले जाईल या पद्धतीने दाबावे. झाड लुसलुशीत असल्यामुळे एका आठवड्यात जमिनीत
कुजते.
ढेंच्या
ढेंच्याशेंगवर्गीय द्विदल
वर्गातील पीक असून, ते जलद वाढते. त्याच्या मुळ, खोड व फांद्यांवर गाठी असतात व
त्या हवेतील नत्र स्थिरीकरणाचेकाम करतात. हे पीक बोरूच्या तुलनेत विविध प्रकारच्या
जमिनीत घेतायेते.
पेरणीची वेळ : पेरणीसाठी योग्य पाऊस पडल्यानंतर (५०-६० मि. मी.) ओलावा फायदा
मिळविण्यासाठी ताबडतोब पेरणी करावी. बागायतीमध्ये रबीतसुद्धा घेऊ शकाल.
पेरणीची पद्धत : पेरणी सरत्याने करताना त्यात माती किंवा बारीक रेती मिसळावी. दोन
ओळीतील अंतर ३० सें.मी. राखावे. बी खोलीवर पेरू नये. पेरणी उताराला आडवी आणि
शक्यतो पूर्व-पश्चिम दिशेने करावी.
बियाण्याचे प्रमाण : पेरणीसाठी एकरी १० ते १५ किलो बियाणे वापरावे.
खतव्यवस्थापन : ऊँचाची पेरणी करताना डी ए पी २५ किलो एकरी खताची मात्रा द्यावी.
त्यामुळे पिकांची मुळे चांगल्या प्रकारे वाढल्याने पीक जोमाने वाढते.
आंतरमशागत व ओलितव्यवस्थापन : पेरणीनंतर १५ दिवसांनंतर हे पीक जलद व जोमाने
वाढत असल्यामुळे तणव्यवस्थापनासोबत विरळणी, आंतरमशागतीची आवश्यकता नाही.
बैंचा जमिनीत गाडणे व दाबणे : पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांत बैंचाची सर्वसाधारण वाढ होते. ते १०० ते १२५ सें.मी. उंच वाढल्यानंतर नांगराच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने त्यास जमिनीत गाडावे.
No comments:
Post a Comment