Search This Blog

रोगव्यवस्थापन


रोग व्यवस्थापन

चुकीची माहिती किंवा अज्ञान किंवा चुकीच्या प्रचारामुळे लाखो शेतक-यांचा फवारणी खर्च विनाकारण वाढत आहे. कापसावर शेवटी येणारा दह्या रोग व एखाद्या वेळेस फारच नुकसान होत असेल तर अल्टरनेरिया सोडला तर इतर नुकसान करणारे रोग आपल्या भागात फार आढळत नाहीत; परंतु काही लोकांच्या शिफारशीमुळे बरेच शेतकरी कापसाला गरज नसताना (काही शेतकरी प्रत्येक फवारणीत) बुरशीनाशकांचा विनाकारण वापर करून आपला खर्च वाढवत आहेत. पानावर लाल ठिपके म्हणजे अल्टरनेरिया व बोंडे पक्व झाल्यानंतर पानाच्या मागच्या बाजूला पडणारे पांढरे ढब्बे म्हणजे दह्या याव्यतिरिक्त आर्थिक नुकसान करणारे रोग सध्या तरी नसल्याने विनाकरण बुरशीनाशके वापरू नयेत.

दह्या (ग्रे मिल्ड्यू)
हा रोग बुरशीमुळे होतो. कापसाचे वय साधारणतः ८० दिवस झाल्यानंतर अन्नद्रव्यव्यवस्थापनामध्ये कमतरता असेल, झाडावर फुले-फळांचा जास्त भार असेल, रोगास पोषक वातावरण असेल, झाड अशक्त असल्यास व प्रतिबंधात्मक बुरशीनाशकांची फवारणी नसल्यास अशा ठिकाणी दह्याचा प्रसार जोरात होतो. सुरुवात खालच्या पानांपासून होते. पानांवर दही शिंपडल्यासारखे पांढरे डाग पडतात. हे डाग नंतर वरच्या पानांवर पडतात व बुरशीनाशकांची फवारणी न केल्यास सर्व झाडावर रोग पसरून पाने-फळे गळतात. पाने पांढरे होऊन नंतर लाल होतात व गळून जातात. दह्याची सुरुवात ही धुव्यावरील गोखरू व इतर तणांवर आधी दिसते. हा रोग खूप जोरात पसरतो. त्यामुळे सुरुवात होण्याचा अंदाज दिसताबरोबर किंवा याआधी प्रतिबंधात्मक बुरशीनाशकाची फवारणी करावी. रोगाचे अस्तित्व दिसल्यावर ताबडतोब बुशीनाशके फवारावीत. शेंड्यापर्यंत बोंडे पक्व झाली असल्यास नंतर दह्या आला तर फार काळजी करण्याची गरज नसते. कारण या पक्व बोंडांना पानांद्वारे अन्नद्रव्यांची आवश्यकता नसते. तेव्हा हे पाने पडल्यास नवीन पाने किंवा फरदड लवकर येण्यास मदत होते.
मात्र, लवकर दह्या आल्यास त्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करावा. यासाठी जास्त महागडे बुरशीनाशक वापरू नये.
हेझाकोनॅझॉल, सल्फर, प्रोपीकोनॅझॉल, फ्युझीलँझील, हेग्झाकोनॅझोल + कॅप्टन (सुखई, कॉन्टाप प्लस, कोसावीट, टील्ट, न्यू स्टार, ताकद यापैकी कोणतेही एक) व गरज असल्यास आठ दिवसांनी दुसरे बुरशीनाशक फवारावे.

दह्याची कारणे
हा एक बुरशीजन्य रोग आहे. याचा प्रसार हवेतून व जमिनीतून ही होतो. याला मिळालेल्या योग्य हवामानामध्ये प्रसार जास्त होतो. जेव्हा रात्री पाऊस पडतो व दिवसा प्रखर ऊन असते, अशा वातावरणात सप्टेंबरच्या दुस-या पंधरवड्यात याचा प्रसार जोरात होतो. पाऊस थांबून दव पडायला सुरुवात झाली की दह्या वाढतो. ज्या जमिनीत पाणी साचून राहते किंवा अन्नद्रव्यांची वा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे अशा जमिनीत याची सुरुवात लवकर होते.

दह्या कसा ओळखाल
झाडाच्या जमिनीलगतच्या खालच्या पानांवर पीठ सांडल्यासारखे डाग पडतात. ही पावडर जोरात झटकल्यास त्याखाली लाल धब्बे दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यानंतर पाने पिवळी व लाल पडून पानझड चालू होते. खालच्या पानांवर सुरुवात झालेला हा रोग नंतर शेंड्यापर्यंत जातो.

रोगाचा प्रसार
हस्त नक्षत्रात पाऊस पडला व वातावरणामधील आर्द्रता वाढली तर याचा प्रसार फार जोरात होण्याची शक्यता आहे. रात्री पाणी व दिवसा प्रखर सूर्यप्रकाश हे रोगाचा प्रसार होण्यास अनुकूल आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
बुरशीच्या बिजाणूपासून रोगाचा प्रसार होतो. यामध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास प्रतिबंध होऊ शकतो जसे -
·        मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर असल्यास झाड सशक्त राहते व त्यावर रोगाचा प्रसार होत नाही.
·        शेतात पाणी न साचू देणे.
·        बुरशीनाशकांची योग्यवेळी फवारणी करावी.
·        सहनशील जातींची लागवड करावी.

दह्याच्या नियंत्रणासाठी
हेग्झाकोनेझॉन -(सुखई, कॉन्टाफ प्लस, रिझल्ट, जिलकॉन)-२५ मिली
किंवा
फ्युझीलॅझोल - (न्यू स्टार) - ५ मिली प्रतिपंप
किंवा
हेग्झाकोनॅझॉल + कॅप्टन (ताकद) - २५ ग्रॅम प्रतिपंप
यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक फवारावे. काही कंपन्या फार महागडी बुरशीनाशके कापसावर फवारण्याची शिफारस करतात. मात्र, त्यांचा कापसावरील रोगाशी काहीही संबंध नसतो. हिरवेपणा वाढवणे, पातेगळ कमी करणे हे त्या कंपन्या बुरशीनाशकाचे फायदे आहेत असे सांगतात. शेतक-यांनी अशा लोकांपासून सावध राहावे. बुरशीनाशकाचे मुख्य काम पिकाला रोगापासून वाचवणे हे आहे. इतर फायद्यासाठी या एवढ्या महाग बुरशीनाशकांची आवश्यकता नाही.

अणुजीवी करपा
हा रोग अणुजीवामुळे होतो. रोगामुळे प्रथम पानावर कोनात्मक, तेलकट स्वरूपाचे व नंतर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. पानाच्या शिरा व झाडाच्या फांद्या काळ्या पडतात. कालांतराने पाने गळून पडतात. बोंडांवर तेलकट काळपट डाग पडतात. बोंडे उमलत नाहीत. कापूस पिवळा पडून प्रत खालावते; पण साधारणतः दरवर्षी सर्वच शेतांमध्ये पानावर बोंडांवर लाल डाग पडतात. याचे प्रमाण कमी असल्यास बुरशीनाशकाच्या फवारणीची गरज नाही. जर प्रमाण जास्त असेल तरच खालीलप्रमाणे फवारणी करावी.
या रोगाच्या नियंत्रणासाठी १ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन + २५ ग्रॅम कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड + १० लिटर पाणी, अशी फवारणी करावी. रोगाचे प्रमाण व तीव्रता आटोक्यात न आल्यास १० ते १५ दिवसांनी परत एकदा फवारणी करावी.
    
मर
अनेक शेतांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साचून राहते व मुळांना प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे मुळे सडतात व झाडे सुकायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये नुकत्याच सुकत असलेल्या झाडांना प्रतिलिटर पाण्यामध्ये ३ मिली ह्युमिक अॅसिड + ३ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड + ३ ग्रॅम कार्बोडायझीम टाकून अशा झाडांच्या बुडाशी काडीने छिद्र करून टाकावे व शेतातील पाणी बाहेर काढून द्यावे.

फुले चिकटणे
जेव्हा सतत २,३ दिवस दिवसांतून एकदा तरी पाऊस पडतो, तेव्हा पावसाचे पाणी उमललेल्या पांढ-या फुलात काही प्रमाणात साचते. ते फुलातून निघून न गेल्यास परागीकरण बरोबर होत नाही. फुलाचे जेव्हा छोटे बोंड तयार होते तेव्हा ज्या फुलामध्ये पाणी साचून आहे अशी फुले बोंडावर चिकटून राहतात व त्या ठिकाणी बुरशीची वाढ होते. त्यामुळे लहान बोंडे चिकटलेल्या फुलासह गळून पडतात. पाऊस असेल तर गळ मोठ्या प्रमाणात होते. ऑगस्टमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात आढळतो, असे असल्यास बोंडासहित फुलगळ रोखण्यासाठी कॉपर हायड्रॉक्साईड (कोसाईड) ३० ग्रॅम प्रतिपंप किंवा स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम प्रतिपंपाची फवारणी करावी.
काही शेतकरी बुरशीनाशकांचा अवास्तव वापर करतात. प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरतात. याची आवश्यकता नाही. जर फुले चिकटून गळत असल्याचे प्रमाण जास्त असेल तर एखादा फवारा व दह्याची सुरुवात झाल्याबरोबर एक बुरशीनाशकाचा फवारा घ्यावा. जर दह्या थांबला नाही. जास्त वाढत चालल्यास परत एखादी फवारणी घ्यावी. मात्र, आवश्यकता नसताना विनाकारण बुरशीनाशकांचा वापर करू नये. कापसावर बुरशीनाशकांची फवारणी फुले चिकटून बोंडे गळणे, दह्या व करपा असल्यासच करावी.
याप्रमाणे कापसावर रोगाचे प्रमाण असून गरज असेल तरच बुरशीनाशक फवारावे. विनाकारण प्रत्येक फवा-यात बुरशीनाशक वापरण्याची गरज नसते. काम पडल्यास एक किंवा दोन फवायांतच याचा वापर करून खर्च टाळावा.



No comments:

Post a Comment