Search This Blog

कीडव्यवस्थापन


कीड व्यवस्थापन

कापसावरील एक प्रमुख खर्च म्हणजे कीटकनाशकाचा. कापसाचे किडीमुळे ३० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. आपल्या देशात पिकाखाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी पाच टक्के क्षेत्र कापसाखाली आहे; परंतु देशात वापरल्या जाणा-या एकूण कीटकनाशकांपैकी ४० टक्के कीटकनाशके ही फक्त कापसावर वापरली जातात.
शेतक-यांनी फक्त एकच काळजी घेतली तरी कीटकनाशकावरचा खर्च बराच कमी होऊ शकतो. ती काळजी म्हणजे किडींची ओळख व आर्थिक नुकसानीची पातळी माहीत असणे. आपण वर्षानुवर्षे शेती करतो. रोज शेतात जातो. पिकावर कीड आहे हेसुद्धा जाणवते; पण तिचे नाव, कार्यप्रणाली, तिच्यावर उपाय याची जाणीव आपणास नसते. मग आपणास । कोणीतरी ज्ञानी सांगतो हे फवारा मस्त रिझल्ट आहे.
ही परिस्थिती बदलावी लागेल. आता वेड्याचे सोंग घेऊन चालणार नाही, असे केल्यास आपणास फसवणारे तयारच आहेत. त्यात फक्त त्यांचाच दोष आहे असे नाही. त्यासाठी आपले अज्ञानसुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे किमान आपण लावतो त्या पिकांवरील कीड, रोग, उपाय या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. फवारणीचा निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण शेतातील १५२० झाडे निवडून त्यांना खुणा करून घ्याव्यात. ही झाडे संपूर्ण शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी निवडावीत व नेहमी याच झाडांचे निरीक्षण करावे.आठवड्यातून एक वेळ जरी या झाडांचे बारकाईने निरीक्षण केले तरी संपूर्ण शेतात काय परिस्थिती आहे हे समजते. अशा प्रकारे किडींनी आर्थिक पातळी ओलांडल्यासच फवारणी करून कीटकनाशकावरील अतिरिक्त खर्च टाळता येऊ शकतो.
बरेच शेतकरी शेजा-याने फवारले म्हणून फवारतात. काही जण महागडी कीटकनाशके मोठेपणा म्हणून फवारतात. काही महागडी बुरशीनाशके कापसावर गरज नसताना फवारतात व दुःख म्हणजे त्या कंपन्यासुद्धा त्याचा प्रचार करतात. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वेड्याचे, अज्ञानीपणाचे सोंग घेऊन चालणार नाही, असे केल्यास आपल्याला फसवणारे तयारच आहेत. त्यामुळे किमान कीड रोग ओळखणे व त्यासाठीच्या उत्तम फायदेशीर उत्पादनांची ओळख महत्त्वाची आहे. प्रत्येक फवारणीच्या प्रतिपंप औषधांचा खर्च काढावा. सर्व औषधी मिळून सुरूवातीला तो ५० रु. व शेवटचे २-३ फवारे १०० रु. प्रतिपंप पेक्षा जास्त नसावा. ज्यामध्ये कीटकनाशके, संजीवके, विद्राव्य खते सर्वांचीच किंमत यावी. असे न झाल्यास या पांढ-या सोन्याचे एक दिवस अस्तित्वच संपू शकते.
कापसाच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रीड लावलेले असल्याने चांगल्या वातावरणामध्ये लागवडीपासून ४० ते ४५ दिवस कीड कमी असते. मात्र, बरेच शेतकरी सुरूवातीला गरज नसताना फवारतात व नंतर गरज असताना फवारत नाहीत. शेजारच्या शेतक-यांनी फवारले, गावातील ब-याच लोकांचे दोन फवारे झाले म्हणून फवारणारे शेतकरीसुद्धा बरेच आहेत. हे चुकीचे आहे. प्रत्येक पिकावर हानिकारक किडींसोबत मित्र कीडीसुद्धा असतात. आपण गरज नसताना कीटकनाशक फवारल्यास हानिकारक किडींसोबत मित्र किडीसुद्धा मरतात. ज्या मित्र किडी आपल्या पिकाला हानिकारक किडींपासून वाचवतात त्यांना आपण विनाकारण मारतो. त्यामुळे सुरुवातीला गरज असेल तर फवारा. खोट्या मोठेपणामध्ये जाऊ नका. फवारायचेच असेल तर कीटकनाशक न वापरता पीक पोषके फवारा.
बरेच शेतकरी फवारणीच्या वेळा ठरवून घेतात. आठ, दहा, पंधरा दिवसांनी फवारणी झालीच पाहिजे असा समज ठेवतात; परंतु आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्याशिवाय फवारणी करणे योग्य नाही. त्यासाठी ही पातळी व किडींची ओळख दोन्ही गोष्टी माहीत असणे जरूरी आहे. योग्य वेळ, योग्य कीटकनाशक व योग्य प्रमाणात वापरल्यास कमीत कमी खर्चामध्ये कीड नियंत्रण करणे शक्य आहे. कापसावरील किडींची आर्थिक नुकसानीची पातळी खालीलप्रमाणे आहे.

मावा : सरासरी दहा मावा कीटक प्रतिपान किंवा १५ ते २० टक्के प्रभावग्रस्त झाडे. 
तुडतुडे : सरासरी दोन ते तीन तुडतुडे प्रतिपान. 
पांढरी माशी : सरासरी ८ ते १० प्रौढ माशा.
फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रतिपान.

प्रमुख किडींची ओळख
     ठिपक्याची बोंडअळी : अळीचा रंग करडा असून डोके गर्द रंगाचे असते. अंगावर बरेच काळे व बदामी ठिपके असतात. कपाशीला पात्या येण्याच्या अगोदर ही अळी प्रथम कोवळ्या शेंड्यांना छिद्र पोखरून खाते. त्यामुळे असे शेंडे सुकून नंतर वाळतात. पात्या आल्यावर अळी पात्या, कळ्या, फुले आणि बोंडांना नुकसान पोहोचविते. त्यामुळे त्यांची गळ होते.

हिरवी बोंडअळी : अळी रंगाने हिरवट असून, तिच्या कडेला तुटक गर्द करड्या रेषा असतात. लहान अळ्या पात्या व कळ्यांना नुकसान पोहोचवितात. मोठ्या अळ्या बोंडांना छिद्र पाडून आतील भाग खाऊन पोकळ करतात. या अळीने केलेली छिद्रे अनियमित गोल व तुलनात्मकदृष्ट्या मोठी असतात. बरेचदा अळीचा अर्धा भाग बोंडाच्या बाहेर असतो. प्रादुर्भावग्रस्त पात्या व लहान बोंडे गळून पडतात. प्रादुर्भावग्रस्त मोठी बोंडे जी झाडावर राहतात ती पावसाच्या पाण्यामुळे सडतात व त्यातील रुईची प्रत खालावते.

गुलाबी बोंडअळी : अंड्यातून निघालेली अळी रंगाने पांढुरकी तर पूर्ण वाढलेली अळी गुलाबी रंगाची असते. अळी फुले व हिरव्या बोंडांना नुकसान पोहोचविते. ज्या फुलांमध्ये ही अळी असते, अशी फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. यालाच 'डोमकळी' म्हणतात. या अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर छिद्र बंद होते. त्यामुळे बोंडाचे वरून निरीक्षण केल्यानंतरसुद्धा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही. अळी अवस्था बोंडामध्ये पूर्ण झाल्यानंतरच ही अळी कोषावस्थेत जाण्यासाठी बोंडाला छिद्र करून बाहेर पडते. अशी प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच फुटतात. त्यामुळे कापसाची प्रत बिघडते. गुलाबी बोंडअळी बोंडात राहून सरकीचेही नुकसान करते. त्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती आणि तेलाच्या प्रमाणात घट होते.

मावा : मावा रंगाने फिक्कट हिरवा किंवा पिवळसर असून आकाराने अंडाकृती असतो. जास्त हालचाल न करता एका जागी पानाच्या मागील बाजूस चिकटून तो कोवळ्या पानांमधून रस शोषण करतो. अशी पाने कोकडतात. खालच्या बाजूने वाकतात. माव्याच्या विष्ठेमुळे पाने चिकट होतात. तेव्हा आपण चिकटा आला असे म्हणतो. मावा ही कीड आहे. कोकडा व चिकटा कीड नसून, ती माव्याच्या प्रादुर्भावाने झालेली विकृती व परिणाम आहे. म्हणून कोकडा, चिकटा रोग आला असे न म्हणता मावा ओळखून माव्याचा प्रादुर्भाव आहे असेच म्हणा, असे म्हणण्याने आपणास किडींबद्दल ज्ञान आहे असे समोरचा जाणेल व योग्य कीटकनाशक मिळेल. मावा ही कीड नियंत्रणास सोपी आहे. हिच्या नियंत्रणासाठी आपण यापैकी कोणतेही एक कीटकनाशक वापरू शकतो. रिहांश, एक्टारा, मोनोक्रोटोफॉस, रोगोर, रोगोबुस्ट, मेटासिस्टॉक्स, असिफेट पैकी कोणतेही एक व काही वेळेस काळा मावा जास्त प्रमाणात वाढल्यास या कीटकनाशकासोबत कराटे, रिवा, प्रोफेनोफॉस यापैकी एखादे कीटकनाशक मिसळावे.

तुडतुडे : तुडतुडे हे फिक्कट हिरव्या रंगाचे असून, ते नेहमी तिरपे चालतात. हेसुद्धा पानाच्या मागच्या बाजूने राहून रस शोषतात. त्यामुळे प्रथम पानांच्या कडा पिवळ्या, मग लाल व नंतर करपल्याचे दिसते. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव पानांच्या कडांवरूनच ओळखू शकतो. झाड हलवल्यानंतर हे तुडतुडे उडतात व दुसरीकडे बसतात. बरेच शेतकरी यांना हिरवे घोडे असेसुद्धा म्हणतात. तुडतुड्यांची ओळख त्यांचा फिक्कट हिरवा रंग, तिरपे चालणे व पानांच्या कडांवरील परिणामामुळे ताबडतोब होते. माव्याप्रमाणेच तुडतुड्याचे नियंत्रण करणे फार कठीण नाही. कमी प्रमाणात असल्यास थायोमिथाक्झोन (रिहांश), असिफेट, मोनोक्रोटोफॉस पैकी कोणतेही एक वापरावे. जास्त प्रादुर्भाव असल्यास सोबत सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन, क्लोरोपायरिफॉस यापैकी एक वापरावे.

फुलकिडे : फुलकिडे फिक्कट पिवळसर रंगाचे असून, आकाराने फार लहान असतात. त्यामुळे दुरून दिसत नाहीत. हेसुद्धा पानांच्या मागच्या बाजूनेच असतात. कोवळे पान तोडून डोळ्याजवळ धरून मागची बाजू पाहिल्यास एक पिवळसर रंगाचा चपळ किडा, सारखा धावपळीत दिसतो. तो म्हणजे फुलकिडा. आकाराने लहान असल्याने सहज दिसत नसल्याने याने केलेले नुकसानच ब-याच वेळा दिसते. ते म्हणजे झाडे निस्तेज दिसतात. पानांवर पांढुरके व नंतर तपकिरी चट्टे आढळून येतात व झाडांची वाढ खुटते. पानांचे बारीक निरीक्षण न केल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही. हल्ली मागील ३ ते ४ वर्षांपासून रसशोषण करणा-या किडींमध्ये फुलकिड्यांचे प्रमाण जास्त वाढत आहे. याबद्दल शेतक-यांनी जागरूक राहावे व कमी प्रादुर्भाव असल्यास खालीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावे. मोनोक्रोटोफॉस, रोगोबुष्ट किंवा रोगर, मेटासिस्टॉक्स प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन (सरेंडर/प्रोफेक्स सुपर) जास्त प्रादुर्भाव असल्यास सोबत लॅम्डा सायहेलोथ्रीन किंवा ट्रायझोफॉस + डेल्टामेथ्रीन (हॅकर/शिकारी/ डेलफॉस) यापैकी एक वापरावे. गरज असल्यास पुन्हा ८ ते १० दिवसांनी औषध बदलून फवारावे.

पांढरी माशी : माशी म्हटले की आपल्या समोर घरातल्या माशांचा आकार येतो; पण ही पांढरी माशी आकाराने खूपच लहान असून पंख पांढुरक्या रंगाची असतात. हे अत्यंत लहान आकाराचे किडे झाड हलल्या किंवा हलवल्यानंतर उडतात व शक्यतोवर परत त्याच झाडावर, फांदीवर बसतात. पांढ-या माशीचा प्रादुर्भाव हा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून तो नोव्हेंबरपर्यंत आढळून येतो. ही कीड जास्त वाढल्यानंतर नियंत्रित करण्यास त्रासदायक आहे. पांढ-या माशीचे शंभर टक्के नियंत्रण करणारे कुठलेच रसायन बाजारात उपलब्ध नाही. जास्त दाट लागवड, नत्राचा जास्त वापर यानेही पांढ-या माशीचा प्रादुर्भाव वाढतो. पांढरी माशीचे पिले हे ८० ते ९०% नुकसान करतात व प्रौढ माशी जी उडणारी आपणास दिसते ती फक्त १०% पर्यंतच नुकसान करते. त्यामुळे पांढ-या माशीच्या पिलांचे नियंत्रण महत्त्वाचे आहे. बाजारातील काही महागडी उत्पादने फक्त प्रौढ उडणा-या पांढ-या माशीचे नियंत्रण करतात व ८ ते १० दिवसांनी परत तेवढाच प्रादुर्भाव दिसतो. उडणा-या पांढ-या माशीचे नियंत्रण करण्यासाठी एवढ्या महागड्या कीटकनाशकाऐवजी आंतरमशागत करताना, फवारताना पिवळ्या रंगाचे कपडे किंवा प्लास्टिक वापरून त्याला तेल किंवा ऑईल लावल्यास ही माशी त्याला चिकटते. पिलांचे नियंत्रण महत्त्वाचे आहे. त्यासाठी नवीन आलेले लॅनो कीटकनाशक पांढ-या मार्शीच्या पिलांना व अंड्यांना संपवते व त्यामुळे २५ ते ३० दिवस नियंत्रण मिळते. मात्र, उडणारी माशी याने मरत नसल्याने सोबत ट्रायझोफॉस / डेल्टामेथ्रीन / प्रोफोनोफॉस + सायपरमेथ्रीन/ असिटामाप्रीड घ्यावे.

कोळी : या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः सप्टेंबरच्या सुरुवातीला आढळतो. लाल व पिवळ्या रंगाचे कोळी पानांच्या मधून रस शोषतात. फुलकिड्यांप्रमाणे चपळ व सतत धावपळ करतात. प्रादुर्भावामुळे पाने वरील बाजूंनी पांढुरके व निस्तेज दिसतात. कोळी ही कापसावरील मुख्य कीड नाही; परंतु मागील काही वर्षांत काही भागामध्ये या किडीने बरेच नुकसान केले आहे. यासाठी या किडीची ओळख असणे गरजेचे आहे. साधारणतः ज्या शेतात किंवा शेजारी भेंडी, वांगे, मिरची ही भाजीपाला पिके असतात तिथे कापसावर ही कीड प्रामुख्याने जाणवते. कोळी किडीच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक वापरावे.
डायकोफॉल, ऑक्सिडेमेटॉन मिथाईल, इथिऑल, डायमेथोएट

मिलीबग (पिठ्याढेकूण) : मागील तीन-चार वर्षांमध्ये ही कीड कापसावर काही भागात काही प्रमाणात आली आहे. या किडीला बहसंख्य शेतकरी ओळखतात. कारण हिच्याबद्दल आपण जागरूक राहिलो तसेच इतर किडींबद्दलसुद्धा जागरूकता दाखवल्यास त्यांचे नियंत्रण करणे फार सोपे होईल. मिलीबग ही कीड ढेकणाच्या आकाराची तसीच किंचित गोल व मऊ पांढ-या रंगाची असते. शक्यतोवर झाडाच्या किंवा फांदीच्या शेंड्यावर समूहामध्ये वास्तव्य करणे. प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुटते. या किडीचे प्रमाण फक्त काही झाडांवरच असेल तर तेवढ्याच झाडांवर फवारा घ्यावा. खाली बुडातसुद्धा जमिनीवर फवारावे व जास्त प्रमाणात असल्यास असे झाड उपटून जाळावे. मिलीबगच्या फवारणीसाठी कीटकनाकासोबत स्टीकर किंवा निरमा पावडर अवश्य वापरावे व कीटकनाशकांचे मिश्रण अंतरप्रवाही + स्पर्शविष वापरावे जसे इमिडाक्लोप्रीड, असिटामाप्रीड, थायोमिथाक्झम, डायमेथोएट, मोनोक्रोटोफॉस यापैकी कोणतेही एक व सोबत क्लोरोपायरिफॉस, प्रोफेनोफॉस, डायक्लोरोव्हास, सायपरमेथ्रीन पैकी एक असे मिश्रण वापरावे.
इमिडाक्लोप्रीड, असिटामाप्रीड, थायोमिथॉक्झाम हे क्लोरोनिकोरानाइल ग्रुपमधील कीटकनाशकांच्या भरमसाट वापराने किडींची प्रतिकारशक्ती वाढली आहे व यांचे प्रमाण वाढवूनसुद्धा पाहिजे तसे नियंत्रण मिळत नसल्याने यांचा सतत वापर करू नये. त्याऐवजी जुनी कीटकनाशके जशी डायमेथोयट, मोनोक्रोटोफॉस, असिफेट, प्रोफेनेफॉस, ट्रायझोफॉस, प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन, ट्रायझोफॉस + डेल्टामेथ्रीन, ऑक्सिडेमेटॉन मिथाईल यांचा वापर मध्ये मध्ये करावा.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी
·     सध्या शेतकरी बयाच प्रकारचे फवारणीचे पंप वापरत असल्याने आम्ही  सांगितले प्रतिपंप औषधाचे प्रमाण हे १५ लिटरचा हातपंप किंवा १० लिटरचा पेट्रोलपंपा करिता समजावे. २० किंवा २२ लिटरचा चायना किंवा बॅटरी पंपासाठी पाणी २०/२२ लिटर पाणी वापरत असल्यास औषधाचे प्रमाण त्यानुसार बदलावे.
·        फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
·        फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
·        शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
·        फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस आल्यास या फवारणीचा फायदा होत नाही.
·        औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
·        फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी ४ नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
·        तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
·        एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते. कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
·        फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
·        फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
(पुढील प्रकरणामध्ये एक सर्वसाधारण कापूस फवारणी वेळापत्रक दिले आहे, ज्याची आपणास मदत होऊ शकेल.)

No comments:

Post a Comment