दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
पिकांना लागणा-या १६ आवश्यक अन्नद्रव्यांपैकी १२ अन्नद्रव्ये जमिनीतून
मिळतात व ४ अन्नद्रव्ये पाणी व हवेतून मिळतात. या १२ पैकी जास्त प्रमाणात लागणारी
३, मध्यम प्रमाणात लागणारी ३ व कमी प्रमाणात लागणारी ६ अन्नद्रव्ये आहेत.
अ) जास्त प्रमाणात
लागणारी (मुख्य अन्नद्रव्ये) :
नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस), पालाश (पोटॅश) ज्याबद्दल
सविस्तर माहिती आपण मागील प्रकरणामध्ये दिली आहे.
ब) मध्यम प्रमाणात
लागणारी (दुय्यम अन्नद्रव्ये)
चुना (कॅल्शिअम), मॅग्नेशिअम, गंधक (सल्फर)
क) कमी प्रमाणात
लागणारी (सूक्ष्म अन्नद्रव्ये) :
लोह (आयर्न), मॅगनीज, जस्त (झिंक), बोरॉन, तांबे, मोलीबंडीनम.
हे सर्वच घटक जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या असतात व पिकाला मिळतात. मात्र,
संकरित उत्पादनक्षम जातींचा वापर, सिंचन शेती, एकाच जमिनीमध्ये अनेक पिके,
उत्पादनाची स्पर्धा, यामुळे काही ठिकाणी जमिनीतील दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची
कमतरता दिसून येत आहे. त्यातच दिवसेंदिवस सेंद्रिय खतांचा कमी वापर, शेणखत व इतर
अरासायनिक खतांचा कमी वापर, यामुळे दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसत आहे.
सामान्यतः महाराष्ट्रातील जमिनींमध्ये मॅग्नेशिअम, जस्त व काही जमिनींमध्ये
बोरॉनची कमतरता दिसून आली आहे. जमिनीमध्ये कोणत्याही एका अन्नद्रव्याची कमतरता
असल्यास उत्पादन घटू शकते.
आपण दरवर्षी जास्त उत्पादन घेत
असाल व शेणखत किंवा सेंद्रिय खतांचा वापर कमी असेल किंवा आपल्याला विक्रमी उत्पादन
घ्यायचे असल्यास दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर शिफारशीनुसार करावा.
प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकांमध्ये वेगवेगळे कार्य आहे. जसे मुख्य
अन्नद्रव्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये गंधक हे हरितद्रव्ये निर्मिती करते,
स्फुरद पिकांना शोषण्यास मदत करते व तेलाचे प्रमाण वाढवते, गंधकाचा वापर दाणेदार
सल्फर एकरी ५ ते १० किलो वापरून आपण करू शकतो किंवा सल्फर डब्ल्यूडीजीचे ड्रेचिंग
करू शकतो. मात्र, आपण रासायनिक खतांमध्ये सुपर फॉस्फेट किंवा २०:२०:००:१३
वापरल्यास यामध्ये सल्फर असल्याने वाढीव सल्फर देण्याची आवश्यकता भासत नाही.
मॅग्नेशिअम झाडांच्या पानांमध्ये क्लोरोफिल वाढवून हिरवेपणा कायम ठेवते. साधारणतः
पिकाच्या वाढीच्या काळामध्ये व परिपक्वता अवस्थेमध्ये मॅग्नेशिअमची कमतरता असल्यास
मॅग्नेशिअम सल्फेटचा फवारणीतून किंवा जमिनीतून वापर करावा. मात्र, हिरवेपण कमी
होण्यास किंवा पानांमध्ये पिवळसर रंग येण्यास फक्त मॅग्नेशिअमची कमतरताच कारणीभूत
नाही. इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळेसुद्धा पिवळेपणा येऊ शकतो किंवा इतर
कारणांमुळेसुद्धा येऊ शकतो. तेव्हा नेमके कारण शोधावे. कॅल्शिअम झाडातील टणकपणा व
रोगप्रतिकारशक्ती वाढवून पेशी विभाजनामध्ये मोठा सहभाग घेते. यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे
काम पुढीलप्रमाणे आहे जस्त वाढीसाठी उपयुक्त हरित द्रव्यांचे प्रमाण वाढवते. लोह
या अन्नद्रव्याची वनस्पतीला हरितद्रव्य तयार करण्यास मदत होते. शक्तीबदलाच्या
क्रियतेही लोहाची मदत होते. मॉलिबडेनम - पिकांना नायट्रोजन घेऊन पचविण्यास मदत
होते. जमिनीतील नत्राचे स्थिरीकरण होते. तांब्यामुळे वनस्पतीत अस्कार्बिक आम्ल
याची क्रिया वाढविली जाते. मॅगनीजमुळे पानातील हरित द्रव्य तयार होण्यास मदत होते.
पेशीतील श्वसनाचे कार्य व्यवस्थित चालण्यास मदत होते. बोरॉन परागीकरणास सहकार्य
करणे याच्या अभावी फुलो-यावर आलेल्या वनस्पतीची वाढ थांबते.
शास्त्रीयदृष्ट्या अन्नद्रव्यांची आवश्यकता पाहण्यासाठी जमिनीची तपासणी
करतात. पिकाची वाढ पाहतात व पिकाची तपासणी करतात. पिकांची पाने किंवा इतर भागांचे
पृथक्करण केल्यावर कोणते अन्नद्रव्य कमी आहे हे समजते. कापसाचे उत्पादन वाढीसाठी
शेतक-यांचे प्रयत्न चालू झाले. दोन पैसे नफा मिळाल्यामुळे या पिकावर खर्च करण्याची
तयारीसुद्धा शेतकरी दाखवू लागले व दिवसेंदिवस सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या शेकडो
कंपन्यांची बाजारात गर्दी झाली. त्यातील ब-याच संधिसाधू कंपन्यांनी शेतक-यांना
चुकीचे ज्ञान देऊन फसवणूक केली. शेतक-यांनासुद्धा काय वापरायचे? कधी वापरायचे? कसे
वापरायचे हे पक्के न समजल्याने खर्चाचा पूर्ण मोबदला मिळत नसे.
साधारणतः दुय्यम अन्नद्रवे जसे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सल्फर जमिनीतून व
सूक्ष्म अन्नद्रव्ये हे जमिनीतून व फवारणीद्वारे अशा दोन्ही पद्धतीने पिकाला देता
येतात. कॅल्शिअम नायट्रेट व सल्फर एकत्र करून नंतर दुस-या डोसला मॅग्नेशिअम देऊ
शकतो. एकत्रित दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये पहिल्या किंवा दुस-या
खताच्या मात्रेसोबतच द्यावीत.
सूक्ष्म अन्नद्रव्ये मात्र एक एकाची कमतरता ओळखून तेवढेच देणे कठीण आहे.
त्यासाठी साधारणतः चांगल्या कंपनीचे एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य जसे भू-परिस,
बोरेकॉल, अॅग्रिकॉल, बी.एस.एफ.१२, स्टारकॉल, वसुंधरा, शक्ती हायझिंक, फायटोकेअर
जमिनीतून खताच्या पहिल्या किंवा दुस-या मात्रेसोबत एकरी १० किलो द्यावे. भरपूर
पाते-फूल असेल व झाडाची वाढ समाधानकारक असल्यास एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्यांची
फवारणी करावी. फवारणीद्वारे वापरल्यास ते पिकाला ताबडतोब मिळून त्याचे कार्य चालू
होते. जमिनीतून ही सूक्ष्म अन्नद्रव्ये न दिल्या गेल्यास फवारणीतून द्यावीत.
फवारणीसाठीचे एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे परिस स्पर्श, न्युट्रॉक्स,
अॅग्रोमीन मॅक्स, चिलमिक्स, कीसाईट, मिंगल ब-याच क्षेत्रांतील मातीपरीक्षणातून
आढळून आल्यानुसार जस्त व बोरॉनची कमतरता आहे, ती दूर करण्यासाठी दुस-या किंवा
तिस-या फवान्यामध्ये बुस्ट, झिंग व बुस्ट बोरॉन किंवा तत्सम फवारावे.
साधारणतः कापसासाठी महाराष्ट्रातील जमिनीसाठी कमी खर्चामध्ये आपण वेगवेगळे
खालील घटक लागवडीपासून ५० दिवसांच्या आत दिल्यास फायदा दिसतो.
एकरी प्रमाण जमिनीमधून
मॅग्नेशिअम सल्फेट - १० किलो + झिंक सल्फेट - २
ते ३ किलो + बोरॉन - १ किलो + सल्फर दाणेदार - ५ किलो किंवा सल्फर WDG - १ किलो
सोबत रायझर-जी किंवा चांगल्या गुणवत्तेचे ह्युमिक अॅसिड ६% - ५ किलो
दिल्यास पांढ-या मुळांचा विकास होऊन खतांची उपयुक्तता वाढते.
बरेच शेतकरी फक्त कापूस हिरवा होतो म्हणून एकरी २५ ते ५० किलो फक्त
मॅग्नेशिअम सल्फेट वापरतात, हे चुकीचे आहे. दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचेसुद्धा
संतुलन बिघडल्यास उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. कमी खर्चाच्या हिशोबाने वरील
दिलेले पर्याय जमिनीतून देणे हे फायद्याचे ठरतील, जे एकत्रित सूक्ष्म
अन्नद्रव्यांच्या किमतीपेक्षा स्वस्त व जास्त प्रमाणात मिळतील.
जमिनीमध्ये शेणखत किंवा
सेंद्रिय खते मुबलक असल्यास दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता भासत नाही,
अशा वेळेस हा खर्च टाळलेला बरा.
चुनखडी जमीनीमध्ये झिंक व फेरसचे प्रमाण कमी असते. त्यासाठी एकरी ५ किलो
झिंक सल्फेट व ३ किलो फेरस सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा एकत्रित सूक्ष्म
अन्नद्रव्ये एकरी १० किलो द्यावे. भरपूर फुले पाते असताना एकत्रित सूक्ष्म
अन्नद्रव्ये जसे परिस स्पर्शचा फवारणीतून वापर केल्यास फायदा होतो व मॅग्नेशिअम,
पालाश व सल्फरयुक्त बिग-बी शेवटच्या दोन फवारण्यांमध्ये वापरावे.
याप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व अन्नद्रव्यांचा पिकाचा गरजेनुसार पुरवठा
याला आपण अन्नद्रव्यव्यवस्थापन म्हणू. उत्पादन वाढीसाठी जे शेतकरी
अन्नद्रव्यव्यवस्थापन करू शकतील, त्यांना निश्चित यश मिळेल. आपण
अन्नद्रव्यव्यवस्थापन शिकल्यास कमी खर्चामध्ये उत्पादन वाढेल, त्यासाठी हा विषय
फार महत्त्वाचा आहे.
No comments:
Post a Comment