नागपुरी संत्र्यांची लागवड
लेखक - प्रा. बी.डी. शेळके
(बागायततज्ज्ञ), निवृत्त प्रा. डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला।
नागपुरी संत्री हा त्यांच्या
विशिष्ट रंग आणि चवीमुळे प्रसिद्ध आहेत. संत्र्यापासून दरवर्षी भरपूर आणि दर्जेदार
उत्पादन मिळू शकते. बागांचे जर योग्य व्यवस्थापन नियमितपणे केले तर बागा अधिक काळ टिकतील
तसेच बागायतदारांना नियमित फळांचे उत्पादन मिळेल. अलीकडे संत्र बागांमध्ये अनेक समस्या
भेडसावत आहेत. त्यामध्ये कधी-कधी या बागांना बहर न येणे, फळांची अतोनात गळ होणे, झाडे
पिवळी पडणे, झाडावर दरवर्षी सल जास्त येणे, बागा अल्पायुषी होणे, योग्य प्रतीची फळे
न मिळणे या आहेत. या समस्यांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. त्यासाठी
विकसित संत्री तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक आहे.
लागवड
संत्र्याची कलमे ही रंगपूर
लिंबाच्या खुटावरील उंच बांधणीची २५ ते ३० सें.मी. असावीत. रोपवाटिकेमध्ये डिंक्या
(फायटोप्थोरा) रोगाची लागण नसावी. त्यासाठी कलमे तपासूनच घ्यावीत. रोपवाटिकेची व कलमांची
निवड फार चांगली असावी. कलमे ही ७५ ते १०० सें.मी. उंचीची पक्व असणे गरजेचे असते. कलमांना
भरपूर प्रमाणात गारवा असावा. रोपवाटिका ही शासकीय, कृषी विद्यापीठांची किंवा पंजीधारक
असणे आवश्यक आहे. अलीकडे जंबेरी खुटावरील संत्र्याची कलमे लागवडीकरिता मोठ्या प्रमाणात
वापरतात. संत्र्याच्या लागवडीपूर्वी जमिनीची तपासणी करावी. लागवड ही ६ x ६ मीटर किंवा
६.५ x ६.५ मीटर अंतरावर २x२x२ फूट आकाराचे खड्डे खोदूनच करावी. लागवड नियमित पाऊस सुरू
झाल्यानंतर करावी, ओलावा कमी असल्यास लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावे. बागेकरिता ठिबक
सिंचनाचा वापर फायदेशीर राहील. कलमांच्या खोडाजवळ पाणी थांबू देऊ नये. खोडावर येणारे
नवीन फुटवे (चिकी) २५-३० सें.मी. सारखी काढावीत म्हणजे मुख्य कलमांची वाढ सतत सुरू
राहील.
संत्र्याच्या वाढीसाठी त्याच्या वयाप्रमाणे खतांची मात्रा (ग्रॅम)मध्ये द्यावी
संत्र्याच्या वाढीसाठी त्याच्या वयाप्रमाणे खतांची मात्रा (ग्रॅम)मध्ये द्यावी
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात
शेणखताबरोबर ४०-५० ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि पी.एस.बी. प्रतिझाड द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्याचे
गरजेप्रमाणे १५० ते २०० ग्रॅम प्रतिझाड मिश्रण दरवर्षी वापरावे. त्यायोगे झाडांची वाढ
चांगली होईल व फळांचे उत्पादन समाधानकारक मिळेल.
झाडावर येणारे पाणसोट वेळोवेळी
काढावेत. वर्षामध्ये एक वेळा डिसेंबर-जानेवारीमध्ये खोडाला बोर्डो मलम अडीच ते ३ फुटांपर्यंत
लावावा. झाडाच्या खोडापासून तीन ते साडेतीन फूट दूर पाणी द्यावे. पावसाळ्यामध्ये उताराच्या
दिशेने २ खोल सारे (दांड) करून ठेवावेत म्हणजे जास्तीचे पाणी बाहेर निघून जाईल आणि
मुळांची वाढ सुरूच राहील. झाडांच्या मुळ्या जमिनीमध्ये १० सें.मी.पर्यंत ८०-८५ टक्के
असतात, त्याचप्रमाणे मुख्य खोडापासून १२० सें.मी.पर्यंत ७५-८० टक्के अन्नद्रव्ये शोषणाच्या
मुख्य मुळ्या असतात. त्यामुळे खते किंवा पाणी हे त्याच परिसरात देणे योग्य ठरेल.
संत्र्यावर पाने खाणारी अळी,
मावा, मिलीबग, सायला, फुलकिडे, कोळी, खोड पोखरणारी अळी, फळावरील पतंग, माशी, शंख या
किडी आणि फूट रॉट, फायटोप्थोरा, मूळसड, डिप्लोडिया, कोळशी, देठसड इत्यादी रोग प्रामुख्याने
दिसून येतात. या किडी आणि रोग यावर वेळोवेळी नियंत्रण करणे गरजेचे आहे. फळांची गळ कमी
करण्यासाठी प्लॅनोफिक्स, जिब्रेलिक अॅसिड, २-४ डी इत्यादी संजीवके उपयोगी आहेत. त्यांचा
योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर करावा. पावसाळ्यामध्ये बागेमध्ये वाढणारी गुळवेल,
वासमवेल तसेच चाँदवेल वेळीच काढून नष्ट करावी. अलीकडे संत्र्याच्या झाडावर शंख ही कीड
दिसून येत आहे. त्यासाठी खोडावर लिंडेन (६.५ डब्ल्यूपी) ५ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे
फवारणी करावी; त्याचप्रमाणे खोडाजवळ तण ठेवू नये. संत्र्याच्या झाडावर ३५ ते ४० हजार
चांगली पाने असावीत. एक उत्तम प्रतीचे फळ तयार होण्यासाठी ५०-६० पाने लागतात म्हणजे
दर्जेदार फळे मिळतील.
बहरासाठी आवश्यक बाबी
१) बहर घेण्यापूर्वी पाण्याचे नियोजन अतिशय आवश्यक आहे.
२) जमिनीचा प्रकार कसा आहे यावरही बहराची प्रक्रिया अवलंबून
असते.
उदा. भारी काळी कसदार जमीन, मध्यम, हलकी जमीन इत्यादी.
३) पूर्वीचा बहर आणि त्यापासूनचे फळांचे उत्पादन.
४) झाडांची परिस्थिती, पाने, रोगराई
५) पूर्वीच्या बहराच्या फळांची तोड आंबियाची तोड ३० नोव्हेंबरपर्यंत
तर मृग बहराच्या फळांची तोड ही ३० मार्चपूर्वी करावी. फळे जास्तअसल्यास २ टप्प्यांत
फळे तोडावीत.
६) बहराच्या वेळी बाग मशागत न केलेली असावी, त्यामुळे योग्य
ताण बसू शकतो.
बहराच्या वेळी पाणी बंद करावे
लागते. त्यामुळे झाडांना विश्रांती घेण्यासाठी मदत होते. यालाच बागेला ताण देणे असे
म्हणतात. ताण दिल्यामुळे नवीन वाढीसाठी अन्नरस खर्च न होता फांद्याच्या डोळ्यांमध्ये
जास्तीत जास्त संचय होतो. बागेचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमित बहार घेण्यास
सुरुवात होते. जमिनीचा प्रकार, झाडांची एकूण वाढ, पाणीपुरवठा, बाजारात फळांची मागणी
व मिळणारा भाव, किडी व रोग, फळांची प्रत इत्यादी बाबींचा विचार करूनच आंबिया किंवा
मृग बहर घ्यावा.
आंबिया बहर
सर्वसामान्यपणे हिवाळ्यात
नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात तापमान ८ ते २५° सेल्सियसच्या दरम्यान असते. अशा तापमानात
झाडावर नवीन वाढ होत नसल्यामुळे झाडातील अन्नरस खर्च न होता फांद्यांमध्येच संचय होतो.
अशा नैसर्गिक क्रियेमुळे जेव्हा तापमानात जानेवारी-फेब्रुवारीत वाढ होते. तेव्हा झाडावर
नवी पालवी आणि फुले येतात त्यालाच आंबिया बहर म्हणतात. आंबिया बहर घेण्यासाठी जमिनीनिहाय
माफक ताण द्यावा लागतो.
आंबिया बहराची फळे शेवटपर्यंत
४-५% पर्यंत टिकून राहतात. तोडणीपूर्व गळ ब-याच मोठ्या प्रमाणात होते. पावसाळ्यामध्ये
भारी जमिनीत या बहराची फळे अधिक गळतात, तसेच ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत रस शोषण करणा-या
पतंगामुळेसुद्धा फळगळ होऊ शकते. सर्वसामान्यपणे ४० ते ६० दिवसांपर्यंतचा ताण देता येईल.
मृग बहर
मृग बहराच्या बागेला एप्रिल-मे
महिन्यांत ताण द्यावा. कारण उन्हाळ्यामध्ये झाडांची पाने जास्त कार्यक्षम नसतात आणि
झाडे विश्रांती घेतात. त्यायोगे झाडांच्या फांद्यांमधील डोळ्यांमध्ये अन्नद्रव्याचा
संचय होतो. मृग बहराचा ताण जमीन, झाडांची स्थिती, पूर्वीच्या हंगामाचे फळांचे उत्पादन
या बाबींवर प्रामुख्याने अवलंबून असते. सर्वसामान्यपणे ३० ते ५० दिवसांपर्यंतचा ताण
देऊ शकतो. वाजवीपेक्षा जास्त दिवसांचा ताण देऊ नये. चुकून ताण जास्त झाल्यास झाडे वाळण्याची
शक्यता असते. मृग बहर हा काही अंशी निसर्गावर अवलंबून असतो. कारण पावसाची शक्यता कमी-जास्त
असू शकते. म्हणूनच मृग बहराला देवी बहर असे म्हणतात. मृग बहर हा अधिक ताण बसल्यामुळे
अति जास्त येतो आणि फळे जास्त असल्यामुळे फळांचा आकार लहान राहून त्याला योग्य किंमतही
मिळत नाही. शिवाय दुस-या वर्षी झाडांच्या बहरावरसुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो. मृग
बहराच्या बागेमध्ये फळांचे नियोजन अतिशय महत्त्वाचे ठरते. अति जास्त आलेली फळे झाडावरून
कमी करावीत आणि योग्य प्रमाणातच फळे झाडावर ठेवावीत. म्हणजे योग्य प्रतीची फळे मिळून
झाडेही अधिक काळ टिकून भरपूर उत्पादन देतील.
संत्र्याच्या बहराची घ्यावयाची
काळजी
१) बागेचे पाणी टप्प्याटप्याने बंद करावे.
२) भारी जमिनीला जास्त दिवसांचा आणि मध्यम ते हलक्या जमिनीला
कमी दिवसांचा ताण द्यावा.
३) ताण सुरू झाल्यानंतर झाडावरची सल संपूर्ण काढावी, जमा
करावी आणि जाळून टाकावी, बागेमध्ये सल जमा करून ठेवू नये.
४) संपूर्ण बागेमधील सल काढल्यानंतर झाडावर बोर्डो मिश्रणाची
फवारणी करावी. (१%)
५) झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावावी. (३ ते ४ फुटांपर्यंत)
६) झाडांच्या खोडावर येणारे जाळे काढून छिद्रामध्ये पेट्रोलचा
बोळा आत कोंबावा आणि छिद्र चिखलाने व्यवस्थित बंद करावे.
७) खोडामधून डिंक वाहत नसेल तर त्या ठिकाणची साल पटाशीने
काढून त्या ठिकाणी १ टक्का पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम निर्जंतुक करावी आणि
त्यावर बोर्डो मलम लावावा. अशा झाडावर रिडोमिल किंवा एलिएट ०.२ टक्का द्रावणाची फवारणी
करावी
८) भारी जमिनीमध्ये मशागत लवकर करू नये. मात्र, मध्यम ते
हलक्या जमिनीत मशागत लवकर करण्यास हरकत नाही, म्हणजे झाडांना योग्य प्रकारे ताण बसू
शकेल.
९) मशागतीच्या वेळी किंवा मशागतीनंतर प्रतिझाड १ ते दीड किलो
सुपर फॉस्फेट झाडाभोवती टाकावे आणि योग्य प्रकारे मिसळून घ्यावे.
१०) खोडाजवळ मातीचा उंचवटा करावा जेणेकरून खोडाला पाणी लागणार
नाही याची दक्षता घ्यावी.
११) झाडाभोवती ३०-४० किलो चांगले कुजलेले शेणखत टाकावे तसेच
निंबोळी ढेपसुद्धा टाकावी. ताण तोडताना किंवा पाणी देण्यापूर्वी झाडाला १,००० ते १,२००
ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद आणि ४०० ग्रॅम पालाश द्यावे. या खतापैकी अर्धे नत्र फळे
वाटाण्याएवढी झाल्यानंतर द्यावीत. फळांची प्रत चांगली राहण्यासाठी १५०-२०० ग्रॅम सूक्ष्म
अन्नद्रव्य द्यावे. तसेच रायझर २० मिली व परिस ८८८ - ३ मिली प्रतिझाड ड्रेचिंग करावे.
रासायनिक खते दिल्यानंतर १०-१५ दिवसांनी ४० ते ५० ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि ४०-५० ग्रॅम
पी.एस.बी. शेणखतामध्ये मिसळून द्यावे.
१२) बाग ताणामध्ये असताना पाऊस आल्यास किंवा भारी जमिनीत
बागेला ताण बसत नसेल तर झाडावर १,००० पी.पी.एम.सायकोसीलची फवारणी करावी. त्यायोगे झाडाला
बहर येईल.
१३) खताची मात्रा दिल्यानंतर आणि ताण पूर्ण बसल्यानंतर झाडांना
| पहिले हलके ओलित करावे. दुसरे ओलित लवकर करावे. त्यानंतर ठराविक अंतराने जमिनीच्या
मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. दोन पाण्याच्या पाळ्यांत ठराविक अंतर ठेवावे. कमी-जास्त
अंतर ठेवू नये. फळांची गळ होऊ शकते. बागेला ठिबक सिंचन पद्धतीने ओलित करावे.
१४) सुरुवातीला सिला, मावा, फुलकिडे, कोळी या किडीकरिता योग्य
त्या कीडनाशकाची आणि रोगासाठी रोगनाशकांची फवारणी करावी. फळांची सुरुवातीची गळ कमी
व्हावी म्हणून १० ते १५ पी.पी.एम.एन.ए.ए. या संजीवकाची फवारणी करावी.
१५) पावसाळ्यापूर्वी उताराच्या दिशेने दोन झाडांच्या मध्ये
दोन खोल सारे (दांड) पाडून घ्यावेत म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्तीचे पाणी बाहेर निघून
जाईल आणि फळांवर आणि झाडावर विपरीत परिणाम होणार नाही. पावसाळ्यात बागेमध्ये ठेंच्या
किंवा बोरू टाकावा आणि फुलांवर येताच जमिनीत गाडावा.
१६) पावसाळ्यामध्ये पावसाचा खड पडल्यास पाणी देण्याची व्यवस्था
करावी तसेच पावसाळ्यानंतर बागेला पाणी देण्याची व्यवस्था करावी.
१७) फळे वाढीच्या काळामध्ये फळांची अधिक वाढ व्हावी त्यासाठी
पोटॅशियम नायट्रेट, जी.ए. किंवा पोटॅशियम डायहैड्रोजन फॉस्फेट अधिक युरिया व परिस ८८८
यांची फवारणी करावी.
१८)
झाडावर आवश्यकतेपेक्षा म्हणजे १२०० ते १५०० फळांच्या वर फळे असल्यास काही लहान, करंडा
असणारी, शेंडाफळे कमी करावीत आणि मर्यादितच फळे ठेवावीत म्हणजे दर्जेदार फळे मिळतील.
अशाप्रकारे संत्र्याच्या बहराचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास दर्जेदार फळांचे उत्पादन मिळेल आणिबागासुद्धा चांगल्या राहू शकतील, अशा बागांपासून दरवर्षी समाधानकारक उत्पादन मिळेल.
अशाप्रकारे संत्र्याच्या बहराचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास दर्जेदार फळांचे उत्पादन मिळेल आणिबागासुद्धा चांगल्या राहू शकतील, अशा बागांपासून दरवर्षी समाधानकारक उत्पादन मिळेल.
No comments:
Post a Comment