रासायनिक खतांचा संतुलित वापर
पहिल्या हरितक्रांतीमध्ये अन्नधान्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी उत्पादनवाढ
हाच एक सर्वांत महत्त्वाचा उद्देश ठेवण्यात आला. त्यामुळे संकरित वाणांचा प्रसार
झाला. ज्यांची उत्पादन क्षमता जास्त होती. मात्र, जास्त उत्पादन घेण्यासाठी
(वरखते) रासायनिक खते द्यावी लागली व त्यामुळे देशात भरपूर अन्नधान्य पिकले.
उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागेल. जेवढी खते संतुलित व जास्त
प्रमाणात दिली तेवढे उत्पादन वाढेल. म्हणजेच खतांचा सरळ संबंध उत्पादनाशी आहे.
रासायनिक खतांवर आतापर्यंत भरपूर सबसिडी होती जी कमी केल्याने खतांचे भाव
खूप वाढले आहेत. आपण एकदम खतांचा वापर कमी केल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होईल.
त्यासाठी हळूहळू जमिनीची सुपीकता वाढवणे गरजेचे आहे व उपलब्ध रासायनिक खतांचा
जास्तीत जास्त फायदा करून घेणे महत्त्वाचे आहे.
अन्नद्रव्यांचा अभ्यास –
मुख्य अन्नद्रव्ये - नत्र, स्फुरद, पालाश
१) नत्र (नायट्रोजन) :
योग्य पुरवठा असल्यास - पिकाची वाढ उत्तम होते, पीक हिरवेगार राहते, स्फुरद व पालाश घेण्याची
शक्ती वाढवते.
अपुरा पुरवठा असल्यास - झाडाची खालची पाने हळूहळू पिवळी पडू लागतात, मुळांची व वरील वाढ थांबते,
झाडाला नवीन फूट होत नाही, फुले कमी लागतात, दाणे व फळे पूर्ण पक्व होत नाहीत.
जास्त पुरवठा झाल्यास - नत्र जास्त दिल्यास झाडाची भरमसाट वाढ होऊन झाड ठिसूळ बनते. झाडे जास्त
पालेदार व लसलसीत झाल्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. तुलनात्मक फळधारणा
कमी होते.
नत्र कशातून देता येते - युरिया - ४६% नत्र, अमोनियम सल्फेट - २१% नत्र.
२) स्फुरद (फॉस्फरस)
योग्य पुरवठा असल्यास - मुळांची वाढ चांगली होते. खोड मजबूत होते. फळे, फुले, दाणे भरपूर येतात.
नायट्रोजनचे प्रमाण जास्त झाल्यास स्फुरद जास्त देऊन दुष्परिणाम टाळता येतात.
अपुरा पुरवठा असल्यास - पाने हिरवट-जांभळी होऊन गळतात. पिकाची वाढ खुटते, उत्पादन घटते. मुळांची
व खोडाची योग्य वाढ होत नाही. पानांच्या मागे जांभळे धब्बे दिसतात.
जास्त पुरवठा झाल्यास - झाडाची वाढ खुटून वाढीवर व उत्पन्नावर परिणाम होतो. सेंद्रिय खतांबरोबर
स्फुरदयुक्त खते दिल्यास स्फुरदाची उपलब्धता चांगली राहते.
स्फुरद कशातून देता येते - सुपर फॉस्फेट - १६% स्फुरद, डी. ए.पी. - ४६% स्फुरद, १२:३२:१६ - ३२%
स्फुरद, १४:३५:१४ - ३५% स्फुरद, अमोनियम फॉस्फेट - २०% स्फुरद.
३) पालाश (पोटॅश)
योग्य पुरवठा असल्यास - वनस्पतीतील प्रथिने व पानातील अन्न तयार होण्यास पालाशची मदत होते. पिके
लोळत नाहीत. रोगप्रतिकारशक्ती वाढते. पिष्ठमय पदार्थ व प्रथिने वाढतात.
अपुरा पुरवठा असल्यास - पानांच्या कडा तांबटसर होऊन पानांवरही तांबडे ठिपके पडतात. पाने निळसर
हिरवी होतात. मुळांची वाढ होत नाही. खोड आखूड होते. शेंडे जळतात.
पालाश कशातून देता येते - पोटॅश - ६०% पालाश.
पूर्वी नॉनबीटी कापसाला १००:५०:५० नत्र, स्फुरद व पालाश प्रतिहेक्टरी, अशी
शिफारस होती. मात्र, बीटीमध्ये उत्पादकता वाढल्याने या मात्रेमध्ये वाढ करावी
लागेल. ही वाढ आपल्या उत्पादन घेण्याच्या इच्छेनुसार बदलावी लागेल. यामध्ये
साधारणतः हेच प्रमाण थोडे बदलून १००:५०:६० नत्र, स्फुरद व पालाश आपण एका एकरात,
दीड किंवा अडीच एकरात देऊ शकतो. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जेवढे खत जास्त वापरले
जाईल तेवढा त्याचा संबंध उत्पादकतेशी राहील; पण त्या जमिनीमध्ये सेंद्रिय
घटकसुद्धा असावेत. त्याशिवाय अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होणार नाही.
अ) खत देण्याच्या वेळा
आतापर्यंत कोरडवाहू कापसाला खते दोन वेळेस व बागायती कापसाला तीन किंवा चार
वेळेस विभागून देण्याची शिफारस होती. मात्र, वाढलेल्या भावांमुळे खते देण्याच्या
वेळेमध्ये थोडा बदल आवश्यक वाटतो. त्यानुसार कोरडवाहू कापसाला ठरविलेले खत तीन
वेळेमध्ये विभागून थोडेथोडे द्यावे व बागायती कापसाला चार किंवा पाच भागांमध्ये
विभागून खते द्यावीत. ज्यामुळे खतांचे लिचिंग, फिक्सेशन कमी होईल व ते जास्त
प्रमाणात पिकाला उपलब्ध होतील. सोबतच पहिल्या मात्रेसोबत चांगले कुजलेले शेणखत
वापरल्यास उपलब्धता वाढते.
ब) खते देण्याच्या पद्धती
लागवडीआधी फुली पाडताना सरत्याने खत पेरण्यास चालते. शेवटच्या वखरवाहीपूर्वी
५ ते ७ दिवस स्फुरद व पालाश शेतात फेकण्यास योग्य आहे. लागवडीसोबत खत बियाण्याच्या
चार बोटे बाजूला देण्यासही हरकत नाही. यापैकी कोणत्याही पद्धतीने खताची पहिली
मात्रा द्यावी. दुसरी व तिसरी मात्रासुद्धा सरत्याने पेरून द्यावी. खत सरत्याने
पेरल्यामुळे मजुरीत बचत होते व झाकून पडते. झाडाला रिंगणच करावे असा काही मान
नसतो. बरेच शेतकरी एकदम खोडाजवळ खते देतात. जणू काही झाडाला घास भरवतात. ही पद्धत
चुकीची आहे. याने झाडाची साल खराब होऊन झाड मरण्याची शक्यता असते. झाडाची सावली
दुपारी १२ वाजता जेवढ्या भागामध्ये पडते तेवढ्या सर्व भागात पांढरी मुळे असतात.
त्यापैकी कुठेही खत दिल्यास ते झाडांना मिळते. सर्वच डोज सरत्याने पेरल्यास जास्त
फायद्याचे ठरते. स्फुरद व पालाश जास्त हालचाल करत नसल्यामुळे कोणत्याही पिकाला
देताना जमिनीमध्ये झाकून मुळांच्या कक्षेतच द्यावी. वर टाकू नये.
क) खतांचा प्रकार
१००:५०:६० नत्र, स्फुरद व पालाश देण्यासाठी साधारणतः आपणास कोणती खते
वापरावी लागतील याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तो असावा. एक वेळ खत देण्याच्या वेळा
ठरवल्यानंतर त्या-त्या वेळेला उपलब्ध खते द्यावीत.
खताच्या ५० किलोच्या पोत्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाशाचे किलोमध्ये प्रमाण.
मुख्य अन्नद्रव्यांसोबतच काही खतांमध्ये दुय्यम घटकसुद्धा असतात. जसे सुपर
फॉस्फेटमध्ये स्फुरदासोबतच सल्फर व कॅल्शिअम आहे. २०:२०:०:१३ मध्येसुद्धा सल्फर
आहे. युरियाची बाजारात उपलब्धता नसल्यास अमोनियम सल्फेटचा त्या प्रमाणात वापर
करावा.
खत देण्याची वेळ, प्रकार व प्रमाण
खतांच्या भाववाढीमुळे दिलेली खते वाया जाऊ नयेत. ती जास्तीत जास्त प्रमाणात
पिकांना मिळावीत व केलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळावा यासाठी आम्ही
खालीलप्रमाणे संतुलित खतांची शिफारस करीत आहोत. आपणास जे उपलब्ध असेल ते खत वापरून
संतुलन करावे.
कोरडवाहूसाठी खताच्या तीन मात्रा द्याव्यात व बागायतीसाठी चार किंवा पाच
मात्रा द्याव्यात. दोन मात्रांमध्ये २०-२५ दिवसांपेक्षा जास्त अंतर ठेवू नये.
थोडेथोडे खत जास्त वेळेस दिल्यास त्यापासून जास्त फायदा होतो. खत देण्यासाठी
मजुरांची अडचण आपण डवन्याला सरते बांधून खते सरत्याने पेरून दिल्यास दूर होईल.
खत देण्याचा प्रकार व प्रमाण
पर्याय १ - युरिया ३० किलो
+ सुपर फॉस्फेट ५० किलो + पोटॅश २० किलो किंवा
पर्याय २ - युरिया २५ किलो
+ डी.ए.पी. २० किलो + पोटॅश २० किलो किंवा
पर्याय ३ - युरिया २५ किलो
+ १०:२६:२६- ३५ किलो किंवा
पर्याय ४ - युरिया १० किलो
+२०:२०:०० ५० किलो + पोटॅश २० किलो
वरील पर्याय आपल्या
सुलभतेसाठी दिले आहेत. वरीलपैकी कोणताही उपलब्ध किंवा आवडीचा पर्याय आपण वापरू
शकता. खतांचे मिश्रण करताना यापैकी कोणताही एक निवडावा व कोरडवाहू कापसाला पहिला,
दुसरा व बागायती कापसाला पहिला, दुसरा व चौथा डोज याप्रमाणे द्यावा. इतर युरियाची
मात्रा तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे द्यावी.
खते देण्याच्या वेळा, प्रमाण एकर (कोरडवाहू/बागायती)
खते देण्याच्या वेळा, प्रमाण एकर (कोरडवाहू/बागायती)
पर्याय १, २, ३, ४ हे
संतुलनासाठी प्रतिएकर सुचविले आहे. आपणास जास्त उत्पादन घ्यायचे असल्यास खताच्या
मात्रा वाढवाव्यात. मात्र, पर्यायामधील खतांच्या वजनामध्ये बदल
करू नये. जास्त/कमी पावसामुळे एखादी मात्रा देण्यास जास्त उशीर झाल्यास नंतरच्या
दोन्ही मात्रा सोबतच द्याव्यात. याव्यतिरिक्त दुसरी खते द्यायची असल्यास संतुलन
करून द्यावे. बागायतीसाठी दुसरी मात्रा
दुप्पट करावी.
रासायनिक खतांची पहिली मात्रा ही लागवडीपूर्वी किंवा
लागवडीबरोबरच द्यावी. ज्यामुळे रोपट्यांची सुरुवातीपासून सुदृढ वाढ होते. या
मात्रेला जेवढा उशीर होईल तेवढे उत्पादन घटते. खते देताना
ती मातीत झाकतील याची काळजी घ्यावी. उपलब्ध खतांमध्ये नत्र झाडांना ताबडतोब मिळते.
मात्र, स्फुरद व पालाश पिकांना उपलब्ध होण्यासाठी बराच कालावधी लागतो. खतांचा संतुलित व वेळेवर वापर केल्यास
उत्पादनात मोठी वाढ होते. खतांचा अवास्तव व अतिरेकी वापर टाळावा.
मुख्य
अन्नद्रव्यासोबत पहिल्या व तिस-या खताच्या मात्रेमध्ये एकरी ५ किलो रायझर-जी
वापरावे. गरज असल्यास दुस-यामात्रेमध्ये एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य वापरावे.
सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची सविस्तर माहिती पुढील प्रकरणामध्ये दिलेली आहे.
No comments:
Post a Comment