Search This Blog

योग्य वाणाची निवड


योग्य वाणाची निवड

कापसामध्ये कालावधीनुसार दोन प्रकारची वाणे असतात. एक तर लवकर येणारे व दुसरे उशिरा येणारे वाण. आज बाजारामध्ये शेकडो कंपन्या आहेत व त्यांच्या कापसाच्या अनेक जाती आहेत. प्रत्येक कापसाच्या जातीमध्ये काही ना काही फरक असतो. त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे शेतक-यांच्या गरजेनुसार वैशिष्ट्ये असलेली जात त्यांना आवडते; परंतु साधारणतः कापसाच्या चांगल्या वाणामध्ये खालील गुणधर्म असावेत।
१) कीड व रोगास सहनशीलता. २) पुनर्बहर क्षमता. ३) मध्यम ते मोठा बोंडाचा आकार. ४) धाग्याची लांबी, मजबुती व इतर गुणधर्म. ५) दोन फळफांद्या व दोन बोंडांतील अंतर कमी. ६) हवामानातील बदलास सहनशील.
वरीलपैकी महत्त्वाचे गुणधर्म असलेल्या जाती आपल्या जमिनीनुसार, पाण्याच्या उपलब्धतेनुसार हलक्या मध्यम जमिनीत लवकर येणारी जात व मध्यम भारी व भारी जमिनीत उशिरा येणारी जात निवडावी. बाजारात अनेक उत्तामोत्तम जाती आहेत. आपला अनुभव किंवा विश्वास पात्र माणसाच्या शिफारशीनुसार जातीची निवड करावी. 
फक्त कापसाची चांगली जात निवडून उत्पादन वाढत नाही तर उत्पादन वाढीसाठी ज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातीची निवड. आपणास अनुभव असलेली किंवा प्रत्यक्ष पाहिलेली किंवा तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या जातींची लागवड करावी. आज बाजारात भरपूर कंपन्यांच्या ब-याच चांगल्या जाती उपलब्ध आहेत. कोणत्या एखाद्या जातीसाठी अवाजवी रक्कम देणे किंवा ती मिळत नाही म्हणून त्याच जातीचा आग्रह धरणे फायद्याचे नाही. अशा जातींना पर्यायी जाती अगोदरच शोधून ठेवाव्यात. प्रत्येक जातीला ती न मिळाल्यास पर्याय तयार असल्यास वेळेवर धावपळ होत नाही व अवास्तव, अवाजवी व अनिश्चित किंमत द्यायची वेळ येत नाही; पण जातींचा विचार हा लागवडीच्या ब-याच आधी व्यवस्थित करावा. बरेच शेतकरी ऐकीव माहितीवर किंवा दुस-यांनी घेतली म्हणून काही जाती निवडतात. काही शेतकरी तर बियाणे घेण्यास दुकानावर आल्यानंतर आपला निर्णय बदलतात. याला नियोजनाचा अभावच म्हणावा. काही विक्रेते किंवा कंपनी अधिकारी काही जातींबद्दल फुगीव माहिती सांगतात तेव्हा विश्वासपात्र व्यक्तींवरच भरवसा ठेवावा.
बरेच शेतकरी एकाच शेतात भरपूर जाती लावतात. अशा वेळेस काही जाती लवकर येणा-या, काही उशिरा येणा-या, काही किडीस सहनशील, काही बळी पडणा-या असू शकतात. मग गरज नसताना सहनशील जातींवर फवारा होतो. गरज नसताना उशिरा येणाच्या जातीला पाणी द्यावे लागते. या व इतर अनेक गोष्टींमध्ये खर्च वाढतो. त्यामुळे एका शेतामध्ये शक्यतोवर एकच किंवा तिच्यासारखी दुसरी जात लावावी. जास्त जाती लावू नयेत दुस-या शेतामध्ये एखाद-दुसरी जात लावावी. कंपन्यांच्या जाहिरातीला बळी न पडता स्वतः डोळ्याने पाहिलेली मध्यम व्यवस्थापनातही उत्कृष्ट उत्पादन देईल अशी एखादी नवीन व काही जुन्या अनुभवी जाती निवडाव्यात. आता हेट्रोसिसचे लिमिट झाल्याने फारच वेगळी जात भविष्यात निघणे शक्य वाटत नाही.




No comments:

Post a Comment