Search This Blog

भुईमूग व्यवस्थापन


भुईमूग व्यवस्थापन


भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे पीक आहे. काळाच्या ओघात ते अन्नपीक म्हणूनसुद्धा वाढीस लागले आहे. या पिकात निरनिराळ्या हवामानांत जुळवून घेण्याची क्षमता आहे. तसेच हे पीक फेरपालट, आंतरपीक, जमिनीची सुपीकता वाढवणे व जनावरांचा उत्तम चारा यासाठीसुद्धा फार उपयुक्त आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतक-यांनी काही प्रमाणात तरी याची लागवड करण्यास सुरुवात करावी.

वाण: टीएजी-२४, टी.जी.-२६, एस.बी.-११, जे.एल.-२६ यापैकी किंवा अनुभवातील खात्रीचे वाण लावावे.
बियाण्याचे प्रमाण : सर्वसाधारणपणे एकरी ४० ते ५० किलो बियाणे पेरणीकरिता लागते.
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी कार्बडायझीम किंवा मेन्कोझेव ३ ते ५ ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करून नंतर ट्रायकोडर्मा ६ ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

पेरणीची वेळ :
खरीप : जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लवकरात लवकर किंवा धूळपेरणी करावी.
रबी : सप्टेंबर शेवटचा आठवडा ते १५ ऑक्टोबरपर्यंत.
उन्हाळी : जानेवारीमध्ये १५ तारखेच्या आसपास थंडी कमी झाल्याबरोबरपेरणी करावी. 

पेरणीची पद्धत : पेरणी लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने किंवा सरी-वरंबा पद्धतीनेच करावी. ३० x १० किंवा ३० x १५ किंवा ४५ x १० सें.मी. अंतरावर वाणपरत्वे एका ठिकाणी एकच बी टाकून करावी.

खाडण्या भरणे : शक्यतो खाडण्या पडणार नाहीत असे पाहावे; पण असल्यास उगवणीनंतर ताबडतोब १० दिवसांच्या आत खाडण्या भराव्यात.

आंतरमशागत : पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे ६ ते ७ आठवड्यांपर्यंत आंतरमशागत करून शेत भुसभुसीत ठेवावे. एक-दोन वेळा निंदणी करावी. शेवटच्या डवरणील पिकाला मातीची भर द्यावी किंवा ८-९ आठवड्यांचे पीक झाल्यानंतर पिकावर ड्रम फिरवावा. आच्या सुटल्यानंतर आंतरमशागत करू नये.

तणव्यवस्थापन : निंदणी करून ६ ते ७ आठवडे शेत तणविरहित ठेवावे किंवा तणनाशकाचा वापर करावा. पेरणीनंतर ४८ तासांच्या आत स्टॅम्प किंवा गोलपैकी एक तणनाशक शिफारशीत मात्रेने जमिनीवर फवारावे किंवा तण १-२ इंचाचे असताना इमॅझिथायपर (परस्यूट) २५० मिली प्रतिएकर जमिनीत ओल असताना सोबत शॉक-अब एकरी ५०० मिली वापरावे. 

ओलितव्यवस्थापन :
खरीप : नाजूक अवस्थेमध्ये पावसाचा खंड पडल्यास ओलित करावे. पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांचा काळ फार नाजूक असतो.
बी : एकंदर जमिनीनुसार पाण्याच्या ८ ते १० पाळ्या लागू शकतात.
उन्हाळी : जमिनीच्या मगदुराप्रमाणे यथायोग्य अंतराने पाण्याच्या१५-१७ पाळ्या लागतात. पेरणीनंतर लगेच ओलित करावे. संपूर्ण उगवण झाल्यानंतर पीक फुलो-यात येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा.

रासायनिक खताची मात्रा, वेळ : साधारणपणे एकरी २ ते ३ बॅग सुपर फॉस्फेट पेरणीपूर्वी फेकावे व पेरणीसोबत एकरी एक बॅग डी.ए.पी. अर्धी बॅग पोटॅशसोबत ५ किलो झिंक सल्फेट व १ किलो बोरॅक्स अधिक १० किलो रायझर-जी वापरावे. ५०% फुलोरा अवस्थेत एकरी २०० किलो जिप्सम दिल्यास फायदा होतो.

किडी व रोगव्यवस्थापन : भुईमुगावर मुख्यतः पाने पोखरणारी/पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आढळतो.

फुलकिडे : कोवळ्या शेंड्यात तसेच पानांवर आढळतात. पानांचा पृष्ठभाग ओरखडल्यामुळे पानावर वरच्या बाजूस पांढरे, पिवळसर फिक्कट चट्टे पडतात व खालचा भाग तपकिरी रंगाचा होऊन चमकतो.

तुडतुडे : पानांमधील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. तुडतुडा व फुलकीड दोन्हींच्या नियंत्रणसाठी डायमेथोयेट (रोगार) ३० मिली किंवा मिथाईल डेमेटॉन (मेटासिस्टॉक्स) किंवा प्रोफेक्स सुपर फवारावे.

पाने गुंडाळणारी किंवा पाने पोखरणारी अळी : ही अळी पाने पोखरते व गुंडाळते. नियंत्रणासाठी प्रोफेक्स सुपर/ क्लोरो सायपर/ट्रायझोडेल्टा यापैकी एक ४० मिली प्रतिपंप फवारावे.
भुईमुगावर मर, मूळकूज, खोडकूज, तांबेरा हे रोग आढळतात. तांबेरा हा टिक्का नियंत्रणासाठी डायथेन एम-४५ - ४० ग्रॅम प्रतिपंप व मर, मूळकूज, खोडकूज नियंत्रणासाठी मँकोझेब ५ ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चाळून बीजप्रक्रिया करावी.

No comments:

Post a Comment