फरदड व्यवस्थापन व आंतरमशागत
कापसाच्या फरदड पिकाबद्दल अनेक व्यक्तींची वेगवेगळी मते व समज आहेत. मात्र,
माझ्या अनुभवानुसार फरदड हे फार कमी खर्चामध्ये, कमी मशागतीमध्ये, कमी वेळेत
कापसाची पहिल्या पिकाएवढीच उत्पादन देणारी पद्धत आहे. होय, सुरुवातीला किंवा
पहिल्या बारात कापसाचे जेवढे एकरी उत्पादन झाले जवळपास तेवढे किंवा त्याच्या ८०
टक्क्यांपर्यंत फरदडचे उत्पादन घेणे शक्य आहे. त्यासाठी पाण्याची व्यवस्था असावी.
करण्याची जिद्द व वातावरणाची साथसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. एखाद्या वर्षी
थंडीचे प्रमाण जास्त असून, दीर्घकाळपर्यंत थंडी राहिल्यास अपेक्षित फरदडचे उत्पन्न
येत नाही.
कापसाच्या उत्तरार्धात त्याला पाणी दिले व युरिया फेकला म्हणजे फरदड आली
असासुद्धा बरयाच शेतक-यांचा समज आहे. फरदडीपासून ख-या अर्थाने भरपूर नफा पाहिजे
असल्यास खालील बाबींचा अवलंब करावा.
१) पहिला कापूस पूर्ण वेचून घ्यावा. तेव्हा शेवटी कापसाचे पाणी बंद असावे.
२) कापसाला पाण्याचा चांगला ताण द्यावा व या वेळेत शक्य झाल्यास डवरून, निंदून
शेत साफ करून घ्यावे.
३) लागवडीबरोबर देतो तशी खते नत्र, स्फुरद व पालाश तीनही घटक पहिल्या पाण्याबरोबर
द्यावीत.
४) आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. जास्त पाणी देऊ नये. नसता फक्त पाने, फुलेच
दिसतात. बोंडे तयार होत नाहीत.
५) पहिल्या खताच्या मात्रेनंतर १ महिन्याने खताची दुसरी मात्रा द्यावी. त्यामध्ये
फक्त युरिया द्यावा.
६) गरज व आवश्यकतेनुसार दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके कीटकनाशकांचा
वापर करावा.
७) पानांचा व बोंडांचा आकार वाढण्यासाठी जी.ए.ची दोन वेळेस फवारणी करावी.
या सर्व गोष्टी केल्यास कमी खर्चात फरदडपासून फार चांगले उत्पादन आपणास
मिळू शकते. फरदड पाणी असल्यास फायद्याचे आहे; परंतु फक्त पाणी आणि युरिया देऊन
फरदड होत नसते. त्यासाठी वरील बाबींची आवश्यकता आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव
असल्यास फरदड घेऊ नये.
आंतरमशागत
आंतरमशागत
कापसात आंतरमशागत कशी करावी हे वर्षानुवर्षे शेती करणा-या शेतक-याला मी
सांगणे फार सयुक्तिक वाटत नाही. आपले बापदादे ज्या पद्धतीने आंतरमशागत करीत आले
त्याच पद्धतीने पुढेही चालू देऊ. मात्र, काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या
नमूद कराव्याशा वाटतात. त्यात सर्वांत जास्त महत्त्व कापसाला मातीची भर देण्यास
आहे. आता ही भर आपण कापूस ४०, ४५ दिवसांचा झाल्यानंतर कधीही देऊ शकतो. प्रत्येक
डवरणीला दिली तरी फायदाच आहे. किमान दोन वेळा भर दिली तरी चांगलेच आहे आणि शक्यच
झाले नाही तर कमीत कमी शेवटच्या डवरणीला कापसाला भर दिली गेलीच पाहिजे.
मातीची भर देण्याची पद्धत
साधारणतः कापसाच्या खोडापासून ठराविक अंतर सोडून आपण डवरणी करतो. भर
देण्यासाठी जे डवरे आपण वापरणार ते अजून थोडे लहान असावे. त्याला खाली दोरी
गुंडाळावी व भर द्यावी. मात्र, परत त्याच तासात दोरी सोडून मोकळे डवरे चालवणे
तेवढेच महत्त्वाचे आहे. भर दिल्यानंतर दोरी सोडून डवरे चालवल्यासच त्या दिलेल्या
भरीचा फायदा होतो. तासातली माती मोकळी करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. तसे न
केल्यास कडकपणा येऊन मातीला भेगा पडतील व फायद्याऐवजी नुकसान होईल.
भर देण्याचे फायदे
१) मुळांवर माती पडल्याने सावली राहील व ओलावा जास्त दिवस टिकेल. त्यामुळे
पाण्याचा ताण लवकर जाणवणार नाही.
२) मोकळी माती बाजूला लागल्याने थोडा पाऊस जरी पडला तरी पाणी आत शोषले जाईल.
थोडा पाऊस पडल्यास पाणी वाहून जाणार नाही. मात्र, जास्त पाऊस पडल्यास दांड तयार झालेले
असल्याने पाणी शेताबाहेर काढण्यास मदत होईल.
३) संरक्षणात्मक ओलित करण्यास सोपे.
४) छोटे गवत मातीखाली बुजून सडून जाईल. निंदणाचा खर्च कमी होईल.
कोरडवाहू कापसासाठी तर मातीची भर हे एक पाणी देण्याबरोबर आहे. कमी खर्चातला
हा उपाय सर्व कापूस उत्पादक शेतक-यांसाठी फायदाचा आहे.
डवरणी करताना घ्यावयाची काळजी
बरेच शेतकरी डवरणी करताना तण वाचूच नाही यासाठी कापसाच्या एकदम जवळून व खोल
डवरणी करतात. खोडापासून अंतर न सोडता डवरतात. यामुळे पांढरी मुळे तुटून झाडाला इजा
होते. जास्त जवळून व खोल डवरणी केल्यास सूक्ष्म व पांढरी मुळे तुटतात. ब-याच वेळेस
डवरणीनंतर जो फायदा दिसायला पाहिजे त्याऐवजी कापूस सूक्ष्म निस्तेज दिसतो. त्याचे
हेच कारण असू शकते. बी.टी. कापसाची मुळे जास्त खोल जात नसल्याने डवरणी खोडापासून
थोडे अंतर सोडूनच करावी. फार जवळून करू नये व जास्त खोलवरसुद्धा करू नये.
जमिनी कडक होणे
मागील बरयाच वर्षांत असा अनुभव आहे की, पाऊस थांबल्यानंतर एकदम जमिनी कडक
झाल्या, पातेगळ, पानगळ झाली, पाने लाल झाली व जमिनीला भेगा पडल्या. पाऊस अचानक
थांबल्यानंतर असेच होते. यासाठी थोडे नुकसान झाले. झाडांची मोडतोड झाली. तरी शेत
कडक होण्यापूर्वी डवरणी करून मातीची भर द्यावी व थोडा युरिया द्यावा. जमिनी कडक
झाल्यास होणारे नुकसान भरून न निघणारे आहे. त्यामुळे त्याची सर्वांनी विशेषतः
कोरडवाहू शेतक-यांनी काळजी घ्यावी.
छोटा ट्रॅक्टरचलित रोटॅव्हीटर कापसामध्ये फार उपयुक्त ठरत आहे. तसे पाहता
हा छोटा ट्रेक्टर डवरणी, फवारणी, लागवड उकरणी या सर्वच गोष्टींसाठी उपयुक्त आहे.
सध्याच्या मजुरांच्या समस्येवर हा एक चांगला उपाय आहे.
जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरण्यासाठीच्या उपाययोजना
१) उताराला आडवी कास्तकारी केल्यामुळे शेतातून सरळ वाहून जाणारे पाणी
प्रत्येक ठिकाणी अडवले जाते व जागच्या जागी पाणी मुरते. कोणत्याही पिकामध्ये
उताराला आडवी कास्तकारी शक्य असल्यास करायलाच हवी. त्यामुळे जमिनीत जास्तीत जास्त
पाणी मुरते, जमिनीची धूप होत नाही.
२) पेरणीनंतर ३० दिवसांनी कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर या पिकांमध्ये एक
किंवा दोन तास सोडून सध्या काढल्यास कमी पाणी पडल्यास पाणी सरीमध्ये मुरून
राहण्यास व जास्त पाणी झाल्यास सरीमधून वाहून जाण्यास मदत होते. यामुळे
उत्पादनामध्ये निश्चित वाढ होते.
३) उताराला आडवी कास्तकारी शक्यच नसल्यास किमान उताराला उभ्या कास्तकारीत
पहिली डवरणी झाल्याबरोबर डवन्याच्या पासीला दोरी गुंडाळून तुटक सन्या काढाव्यात.
म्हणजे पाणी मुरण्यास व धूप रोखण्यास त्याचा चांगला फायदा होईल.
कापसाला पाणी देण्याची पद्धत
कापूस हे कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे पीक आहे. याला फार जास्त
पाण्याची गरज नाही तसेच याला पाणी देताना खालील गोष्टींचा प्रामुख्याने विचार
करावा.
१) जास्त ताण बसू देऊ नये. (आपण नेहमीच उशीर करतो)
२) थोडा ताण जाणवताच पाणी सुरू करावे. (जास्त ताणाने पातेगळ होते)
३) पाणी सन्यांमध्ये साचेल एवढे देऊ नये.
४) एकसरी आड हलके पाणी द्यावे.
५) सुरक्षित ओलित करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा.
No comments:
Post a Comment