Search This Blog

कापूस तणनाशकांचा वापर

कापूस तणनाशकांचा वापर

शेती करताना आज सर्वांत मोठी अडचण जर कोणती असेल जिथे सर्व गोष्टी असूनसुद्धा शेतमालक हतबल होतो ती म्हणजे मजुराची. सध्या मजुरांना एक दिवस काम केलेल्या पैशामध्ये १० ते १५ दिवसांचे धान्य येत असल्याने तो जास्त काम न करता आळसी होत चालला आहे आणि त्यामुळे मजुरापायी कामे वेळेवर होत नाहीत. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. कापसामध्ये किमान दोन निंदणाचे फेर द्यावे लागतात. मग वेळेवर निंदण न झाल्यास तण वाढते व ते मुख्य पिकाशी शर्यत करून त्याच्या हिश्श्याचे अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश इत्यादी घेते. पूर्वी कापसाच्या समान अंतर पद्धतीमध्ये डवन्याचे फेर आडवे-उभे होत असत व फक्त फुलीवर तण असे ते काढणे सोईचे होते. मात्र, आता विषम अंतर पद्धतीमध्ये दोन्ही बाजूंनी डवरणी चालत नसल्याने तासातील तण नियंत्रण करणे थोडे कठीण झाले आहे. मग त्यासाठी आपण लागवड पद्धत बदलू शकत नाही. कारण तसे केल्यास एकरी झाडांची संख्या कमी होऊन उत्पादन घटण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये हतबल न होता तणनाशकांचा वापर करून तणनियंत्रण करणे सोईचे असते.
आतापर्यंत कापसात तणनाशके वापरण्याची हिंमत ब-याच शेतक-यांची होत नसे. मात्र, २०१० च्या पावसाने ही हिंमत करण्यास भाग पाडले. तरीसुद्धा तणनाशकांचा वापर हा खूपच काळजीपूर्वक करावा. त्यासाठी तणनाशकाचा अभ्यास असणे गरजेचे आहे. नसता पिकाला नुकसान होऊ शकते किंवा पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत. साधारणतः कापसामध्ये उपलब्ध तणनाशकापैकी सध्या एक निवडक तणनाशक व दुसरे अनिवडक तणनाशक, असे दोन गट आहेत. निवडक तणनाशकामध्ये पायरेथयरीबॅक सोडियम व्यापारी नाव हीटवीड हे द्विदल तण जसे की गाजरगवत, दुधी, केणा रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी उगवणीपूर्वी व उगवणीनंतर दोन इंचाचे तण असेपर्यंत वापरतात. हे निवडक असल्याने पिकास धोका नसतो व कापसावर पडले तरी कापूस खराब होत नाही. मात्र, फवारताना जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे गरजेचे आहे. कमी ओलावा असताना फवारल्यास किंवा जास्त प्रमाणात वापरल्यास कापसाला थोडा झटका लागल्यासारखे होते. पिवळेपणा येतो व थोडी वाढ खुटू शकते. याचा वापर प्रमाणशीर करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापसामध्ये आंतरपीक तूर, सोयाबीन, मूग असल्यास हे तणनाशक वापरू नये. हिटवीडचे प्रतिपंप प्रमाण ३० मिली घ्यावे व मध्ये डवरणी केली असल्यास फक्त तासातच फवारावे.
तसेच कापसातील गवतवर्गीय तणांसाठी जसे हराळी, शिंपरू इत्यादीसाठी काही शेतकरी क्विझालोफॉप इथाईल व्यापारी नावे टरगासुपर, व्हीपसुपर हे तणनाशक प्रतिपंप ४० मिली वापरतात. मात्र, अशी शिफारस नाही; परंतु त्यांना याचे परिणाम चांगले दिसतात. तसेच काही शेतकरी हीटवीड व टरगासुपर ही दोन्ही तणनाशके एकत्रित कापसामध्ये फवारतात. त्यामुळे रुंद व गवतवर्गीय दोन्ही प्रकारच्या तणांचे एकाच वेळी नियंत्रण होते. वरील तणनाशके फवारताना जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे गरजेचे आहे. आंतरपीक नको व हीटवीडचे प्रमाण एकरी ३०० मिली, टरगासुपर किंवा व्हीपसुपरचे प्रमाण एकरी ४०० मिली तंतोतंत वापरावे. डवरणी करून फक्त तासातच फवारल्यास औषधाचे एकरी प्रमाण कमी लागते.
हीटवीड, टरगासुपर ही निवडक तणनाशके वापरताना कापसाला लागणारा शॉक कमी करण्यासाठी आपण यांचेसोबत शॉक-अबचा वापर ४० ते ५० मिली प्रतिपंप करू शकतो.

पेंडामिथिलीन (स्टॉम्प एक्स्ट्रा)
हेसुद्धा एक तणनाशक कापसामध्ये वापरायला चालेल. याचा वापर तण उगवणीपूर्वीच करावा लागतो. तण उगवल्यानंतर याचा फायदा होत नाही. जमीन तयार केल्यानंतर लागवडीच्या आधी कोरड्या मातीमध्ये पाऊस येण्यापूर्वी किंवा सिंचन करण्यापूर्वी जमिनीवर फवारावे. हे तणनाशक फवारल्यानंतर साधारणतः १ ते १० दिवसांच्या आत पाऊस पडायला पाहिजे किंवा सिंचन केले पाहिजे म्हणजे याची परिणामकारकता चांगली दिसते. उभ्या कापसात शेवटची फवारणी झाल्यानंतर जमिनीवर स्टॉम्प एक्स्ट्रा फवारून पाणी देऊ शकतो.
प्रमाण - एकरी - ७०० मिली
पाण्याची मात्रा - २०० लिटर
नोझल - फ्लडजेर किंवा प्लॅट फैन
     नियंत्रित होणारी तणे - शिंपी, पाथरचाटा, घोळ, दुधाणी, माठ, शिप्पी, चिमणचारा, चंदन बटवा
नियंत्रित न होणारी तणे - लव्हाळ, हराळी, विंचू, गाजरगवत, केणा इत्यादी
या तणनाशकाचा पूर्ण अभ्यास करूनच वापरावे. आपल्या शेतात नियंत्रित होणारी तणे जास्त असल्यास याचा खबरदारीने उपयोग करावा.नियंत्रित न होणारी तणे असल्यास यांचा वापर करू नये.
भारतीय बाजारात कापसासाठी भविष्यामध्ये अजून नवीन व चांगली तणनाशके येतील, अशी अपेक्षा आहे. या सर्व तणनाशकांचा वापर हा चांगला समजून-उमजून करावा. चुकीच्या पद्धतीने करून नुकसान झाल्यास आपणच या नुकसानाला जबाबदार असाल.
कापसामध्ये दुसया प्रकारचे तणनाशक वापरतात त्याला नॉनसिलेक्टिव्ह असे म्हणतात. म्हणजे हे तणनाशक कापसावर पडले तर कापूससुद्धा भाजेल. ज्या हिरव्या वनस्पतीवर हे तणनाशक पडेल, पीक असो वा तण ते जळेल याला नॉनसिलेक्टिव्ह तणनाशक असे म्हणतात. पॅराकॉट डायक्लोराईड व ग्लाइफोसेट, अशी दोन प्रकारची तणनाशके आहेत. ग्लाइफोसेटची व्यापारी नावे - ग्लाइसेल, राऊंड अप व पॅराक्वॉट. डाइक्लोराईडची व्यापारी नावे - ग्रामोग्झोन, पॅराक्वाट आहेत. पॅराकॉट डायक्लोराईड फवारल्यानंतर तण २४ तासांच्या आत तण जळून जाते; परंतु मोठे तण मुळापर्यंत जळत नसल्याने काही दिवसांनी परत उगवून वाढू शकते. ग्लाइफोसेट फवारल्यानंतर ५ ते १० दिवसांत तण सुकते व मुळापर्यंत निकामी करण्यास १८ ते २० दिवस लागतात; परंतु एकदा फवारल्यानंतर ते तण परत उगवत नाही. ही दोन्ही तणनाशके फवारताना मुख्य पिकावर उडणार नाही यासाठी पीक झाकावे किंवा हूड लावून फवारावे. नॉनसिलेक्टिव्ह तणनाशके पिकाच्या हिरव्या पानांवर पडायला नकोत. मातीवर पडल्यास ती निष्क्रिय होत असल्याने काही नुकसान होत नाही. कापसावर ही तणनाशके उडू नयेत म्हणून काही शेतकरी खालील प्रकारे कापसाचे संरक्षण करतात.
  
  १) अगदी लहान कापूस असताना त्या रोपट्यांवर प्लास्टिकचे ग्लासठेवायचे व मध्ये फवारणी करायची. मात्र, ग्लास जमा करताना एकात एक घालून जमा न करता वेगवेगळे जमा करून परत दुस-या रोपांवर ठेवावेत. ग्लास एकात एक घातल्यास आतल्या भागाला तणनाशक लागेल व ते रोपांना लागेल.
   २) कापूस थोडा मोठा झाल्यानंतर झाडांच्या दोन्ही बाजूंनी खतांच्यापोत्याचे थपड पकडायचे व त्याच्या मधल्या भागात फवारायचे म्हणजे झाडांवर तणनाशक उडत नाही. 
  ३) ओळीमध्ये टीनपत्रे दोन्ही बाजूंनी धरून समोर पंपासोबत चालत राहिल्यास यापासूनसुद्धा संरक्षण होते.
   ४) हवा नसताना फ्लडजेट किंवा फ्लफॅन नोझल लावून किंवा हूड लावूनस्वतः लक्ष घालून कापसावर न पडता फक्त तणावरच फवारावे.
     अशा प्रकारे कापसावर उडू न देता तणांवर या नॉनसिलेक्टिव्ह तणनाशकाची फवारणी केल्यास चांगले तणनियंत्रण होते. तणनाशकाच्या वापराने जमीन खराब होते हा गैरसमज आहे. तणनाशके वापरताना स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यामध्ये तणनाशकांचा परिणाम दिसत नाही. शेवटी तणनाशकांचा कोणत्याही पिकांमध्ये वापर करताना तणनाशकाची निवड योग्य असावी, ते वापरण्याची वेळ योग्य असावी, त्याचे प्रमाण बरोबर वापरावे व त्याची इंत्यभूत माहिती असावी तरच तणनाशक वापरा. यापैकी काहीही चुकले तरी नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



No comments:

Post a Comment