कापसाचा लाल्या
लाल्या या शब्दाची महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतक-यांनीच नव्हे तर इतर
शासकीय-अशासकीय व सर्व संबंधितांनी मोठी दखल घेतली आहे. कापसाची पाने लाल झाली
म्हणजे लाल्या आला, असा शेतक-यांचा समज आहे; परंतु कापसाची पाने लाल होण्याची अनके
कारणे आहेत. लाल्या हा रोग नसून कशाचे लक्षण आहे ते ओळखून त्यावर उपाय करणे गरजेचे
आहे. पाने लाल झाली म्हणजे हताश होऊन खचून न जाता त्याच्या सुरुवातीलाच लक्षण
ओळखून उपाय केल्यास पुढील लाल होणे थांबवता येते किंवा प्रतिबंधात्मक उपाय करून
लाल्या होणारच नाही याची काळजी निश्चित घेता येते.
लाल्या येण्याची (पाने लाल होण्याची प्रमुख कारणे)
अन्नद्रव्यांची कमतरता : बरेच वेळेस सगळीकडे ९०% कापूस अचानक लाल ल्याचा दिसतो. जसे २०१६ मध्ये झाले, जास्त व जोराच्या पावसाने दिलेली बरीच खते वाहून गेली, झाडावरील फळधारणेच्या तुलनेत खते कमी दिलेली असल्यास व खते देऊन बराच काळ गेला असल्यास प्रामुख्याने पोटॅश व मॅग्नेशिअमची कमतरता जाणवते व सर्व झाड लाल होते. असे बरयाच वेळेस जाणवते; परंतु शेतक-यांना नेमके कारण माहिती नसल्याने लाल्या म्हणून शेतकरी उपाय करणे सोडतात. अशा परिस्थितीत ताबडतोब पोटॅशिअम शोनाईट (बिग-बी) १५० ग्रॅम प्रतिपंपाचा फवारा दिल्यास खराब झालेली पाने गळून जातात व नवीन हिरवी पाने येतात. फळधारणा जास्त असल्यास फवारणीनंतर जमिनीतूनसुद्धा खताचा डोस द्यावा. त्यामध्ये युरिया, पोटॅश व मॅग्नेशिअम वापरावे.
परिपक्वता/कालावधी - पातेगळ, बोंडगळ न झाल्यास लवकरच झाडावर भरपूर बोंडे लागतात. खताचे हप्ते
लवकरच आटोपलेले असल्यास नवीन चालसुद्धा दिसत नाही व झाड पक्वतेकडे जाते. त्याचा
कालावधी संपला म्हणजे जुनी पाने लाल होणे सुरू होते.
रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे पानांच्या कडा प्रथम लाल होतात व जास्त
प्रमाण असल्यास सर्व पान लाल होते. तसेच फुलकिड्याचा प्रादुर्भाव असल्यास पाने
निस्तेज होतात व कालांतराने लाल होतात. त्यासाठी शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी
करावी. सविस्तर माहिती कीड नियंत्रण या प्रकरणामध्ये दिली आहे.
पानांवरील ठिपके
यातील पहिला प्रकार म्हणजे अणुजिवी करपा. ज्यामुळे पानावर कोनात्मक, तेलकट
स्वरूपाचे व नंतर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. जास्त प्रमाणात वाढल्यास
पानांचा बहुतांश भाग तपकिरी दिसतो. अशा वेळेस स्ट्रेप्टोसायक्लिन + कॉपर
ऑक्सिक्लोराईडची फवारणी करावी. दुसरा म्हणजे बुरशीजन्य रोगाने पानावर लाल डाग
पडतात. अशा वेळेस मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
ग्रे मिल्ड्यू (दह्या)
कापसावरील सर्वांत घातक रोग म्हणजे ग्रे मिल्ड्यू (दह्या) पानांवर आधी
पांढरे ठिपके व नंतर लाल डाग पडतात. वेळीच उपाययोजना न केल्यास सर्व कापूस लाल
होतो. सविस्तर माहितीसाठी रोग नियंत्रण हे प्रकरण वाचावे.
आनुवंशिक गुणधर्म
काही जातींमध्ये ठराविक काळानंतर पाने लाल होण्यास सुरुवात होते किंवा काही
जातींना जास्त फळधारणा झाल्यास त्यांची पाने लाल होतात. अशा जातींची लागवड करू
नये. हा या जातींचा आनुवंशिक गुणधर्म असल्याने तो बदलणे शक्य नाही.
वरील सर्व बाबींपैकी कोणत्याही एक किंवा अनेक कारणांमुळे कापसाची पाने लाल
होतात व आपण लाल्या आला असे म्हणतो. याला रोखण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन
करण्याची गरज आहे. उपचारात्मक उपायापेक्षा प्रतिबंधात्मक गोष्टींचा जास्त फायदा
होतो.
No comments:
Post a Comment