Search This Blog

संजीवके, संप्रेरके यांचे कार्य, वापर व फायदे

 संजीवके, संप्रेरके यांचे कार्य, वापर फायदे

          संजीवके, संप्रेरके, पीक पोषके व टॉनिक्स शासनाच्या बंधनात नसल्याने त्यासाठी कुठला कायदा नाही. परिणामी, शेकडो संधिसाधू कंपन्या निकृष्ट उत्पादने शेतक-यांच्या माथी मारत आहे व दुःखाची गोष्ट म्हणजे अनेक पटींनी किंमत वाढून आपले काही कृषी व्यावसायिक याची सर्रास विक्री करत आहेत. यामुळे अशा गुणवत्ताशून्य संजीवक संप्रेरकावरील शेतक-यांचा विश्वास कमी होत चालला आहे.
यांच्या वापराने निश्चित फायदा होतो. मात्र, गुणवत्ता चांगलीच असावी व किंमतसुद्धा परवडणारी असावी यासाठी ही सर्व उत्पादने तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा चांगल्या विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानेच वापरावीत. यामध्ये बदल करू नये. आपण मागितलेलीच उत्पादने मिळण्यासाठी आग्रही असावे. कोणतीच दोन उत्पादने सारखी नसतात किंवा एकमेकांसारखी शक्यतोवर नसतात. त्यांच्या वापरामध्ये बदल करावयाचा असल्यास स्वतःच्या जबाबदारीवर करावा. फक्त झाड हिरवे होणे म्हणजेच चांगले रिझल्ट आले असे नाही. 

लिव्होसीन (क्लोरोमेकॉट क्लोराईड)
लिव्होसीन या रसायनाचा उपयोग पिकाच्या कायिक वाढीचे रूपांतर फळधारणेमध्ये करण्यासाठी करतात. हे फवारल्यानंतर पिकाच्या फांद्या, उंची, पाने यांचा आकार व संख्या कमी वाढून मिळालेल्या अन्नद्रव्याचा वापर हा पाते, फुले लागण्यासाठी अन्नद्रव्य पानांमध्ये साठवण्यासाठी केला जातो. ज्यामुळे पिकाच्या अवास्तव वाढीवर नियंत्रण येते व त्याचा फायदा जास्त फूल, फळधारणेमध्ये होते. वेगवेगळ्या पिकांमध्ये लिव्होसीनचा वापर वेगवेगळ्या प्रकारे व वेगळ्या प्रमाणात होतो.
कापसाला लिव्होसीनचा वापर फवारणीद्वारे करतात. यामध्ये दोन पद्धती आहेत. एक म्हणजे पीक ७५ दिवसांचे असताना एकाच फवारणीत लिव्होसीन ३ मिली प्रतिपंप वापरायचे. दुसरी म्हणजे पीक ५० दिवसांचे असताना १ मिली, ६० दिवसाला २ मिली व ७० दिवसाला ३ मिली प्रतिपंप वापरायचे. पहिल्या पद्धतीमध्ये फवारणीनंतर झाडाची वाढ थांबून जाईल व फळधारणा होईल व दुस-या पद्धतीमध्ये झाडाची वाढ हळूहळू मंदावेल व तेवढ्याच प्रमाणात जोरात पाते, फुले लागतील. आपल्याला हवी तशी वाढ आपण ठेवू शकू. ज्या ठिकाणी भरपूर अन्नद्रव्ये देतात व ज्या शेतात कापूस खूप वाढतो अशा ठिकाणी दुसरी पद्धत वापरतात. एखाद्या वेळेस खत जास्तच दिलेले असेल व ७० दिवसाला कापूस दाटण्याची शक्यता असल्यास ३ मिलीऐवजी ४ मिली लिव्होसीनचा वापर करावा. जसे सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद, मूग या व इतर अनेक पिकांमध्ये लिव्होनीसनचा वापर पीक कळी अवस्थेत असताना करावा. त्यानंतर वापरल्यास त्याचे परिणाम दिसत नाहीत व या पिकांसाठी याप्रमाणेसुद्धा जास्त शिफारशीत आहे.
क्लोरोमेकॉट क्लोराडटचे व्यापारी नावे लिव्होसीन व व्हॅमसी आहेत. यांचा वापर चुकूनही ४ मिली प्रतिपंप यापेक्षा जास्त करू नये.
रॉयल्टी नावाच्या संजीवकामुळेसुद्धा वाढ नियंत्रित राहून भरपूर पाते, फुले लागतात व हिरवेपणा जास्त काळ टिकून राहतो. तसेच चांगल्या गुणवत्तेचे बायोस्टिमुलंट जसे झेप, धमाका, भरारी यांची मात्रा वाढवून फवारल्यास झेप १३ मिली प्रतिपंप किंवा भरारी ७ मिली प्रतिपंप वरीलप्रमाणेच परिणाम दिसतात. तसेच रॉयल्टीमुळे इतरही अनेक फायदे होतात. झेप किंवा भरारी जास्त प्रमाणात वापरल्यास असंख्य पाते-फुले लागतात, त्यावेळेस मुबलक खत पाणी असल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ होते, असे दिसून आले आहे.
ब-याचदा काही प्रमाणात पातेगळ झालेली असते व कापसाची वाढसुद्धा रोखण्याची गरज असते. अशा वेळेस वाढ रोखण्यासाठी लिव्होसीन वापरण्याची इच्छा होते. मात्र, जास्त फुले लागावीत व पाते गळाल्या ठिकाणी परत दुसरे पाते यावे यासाठी चांगले बायोस्टिमुलंटसुद्धा वापरण्याची इच्छा होते. मात्र, लिव्होसीन व काही बायोस्टिमुलंट एकत्र वापरणे चुकीचे आहे. यासाठी अशा परिस्थितीमध्ये जेव्हा काही प्रमाणात वाढीवर नियंत्रण करून मोठ्या प्रमाणात पाते, फुले लागण्यासाठी रॉयल्टी या उत्पादनाचा चांगला फायदा होतो. 

स्टिमुलंट
पिकामधील अनेक प्रकारच्या गतिविधी वाढवण्यासाठी व पिकास उत्तेजक प्रेरक म्हणून स्टिमुलंटचा वापर करतात. ज्यामुळे पात्यांच्या व फुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. झाडाची सर्वांगीण वाढ जोरात होऊन बोंडांचा आकार वाढतो, पानांचा आकार वाढतो. झाडाची भूक वाढते आणि या सर्व परिणामांमुळे खूप कमी खर्चात मोठा फायदा म्हणजेच मोबदला मिळतो. बाजारामध्ये शेकडो प्रकारचे स्टिमुलंट अनेक नावाने उपलब्ध आहेत; पण त्यातील विश्वासपात्र व्यक्तीने शिफारस केलेले वापरावे. स्टिमुलंटचा वापर करताना जमिनीमध्ये ओलावा व अन्नद्रव्ये असावीत याची काळजी घ्यावी. ओलावा कमी असेल किंवा खतांचा वापर मोजकाच असेल तर स्टिमुलंटचा वापर टाळावा. कापसासाठी झेप, भरारी किंवा इलिग्झर यापैकी एक स्टिमुलंट पाते लागलेले असताना एक फवारा व त्यानंतर १० ते १५ दिवसांनी दुसरा फवारा घेतल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ होते. इतर पिकांसाठी जसे सोयाबीन तूर, हरभ-यासाठी फुलोरा अवस्थेत वरील स्टिमुलंटचा वापर करावा. 
बायोस्टिमुलंटचे वेगवेगळे प्रकार, कार्ये व प्रमाण आहे. ब-याच शेतक-यांना फवारल्यानंतर पीक हिरवे झाले म्हणजे, समाधान होते व वापरले ते फार चांगले असे वाटते. मात्र, ही महागाची उत्पादने फक्त हिरवेपणा वाढवण्यासाठी वापरून फायदा नाही, तर असे बायोस्टिमुलंट वापरावे. ज्यामुळे हिरवेपणा वाढेल, पाते, फुलांची संख्या वाढेल. पानाबोंडांचा आकार वाढून पिकाची सर्वांगीण वाढ होईल, तसेच त्यांचे प्रमाण माहीत असावे. काही बायोस्टिमुलंट १० लिटर पाण्यासाठी फक्त २.५ मिली व काही १० लिटर पाण्यासाठी ७ ते १० मिली वापरण्याची शिफारस आहे. झेप, भरारी, इलिग्झर यांची गुणवत्ता चांगली असल्याचे ब-याच शेतक-यांचे अनुभव आहेत. बायोस्टिमुलंट समजून-उमजून खात्रीच्या दुकानांवरून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उच्च गुणवत्तेचे वापरल्यास खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळतो. या उत्पादनांसाठी शेतक-यांनी विक्रेत्याकडे आग्रही असावे. 
ह्युमिक अॅसिड
ह्युमिक अॅसिड म्हटल्यानंतर आपणास हे काहीतरी जहाल औषध असावे असे वाटते. मात्र, हा एक सौम्य असा घटक आहे. शेणखताचे जे काही चांगले गुणधर्म आहेत ते सर्व ह्युमसमुळे आहेत आणि हेच ह्युमस ह्युमिक अॅसिडमध्ये आहे. दिवसेंदिवस शेणखत, सेंद्रिय खतांचा वापर कमी होत चालला; पण याउलट उत्पादन वाढवणे चालूच आहे. मग ही जमीन आपणास जास्त दिवस कशी साथ देईल, जमिनीची सुपीकता कायम राहावी यासाठी ह्युमसचा वापर अनिवार्य आहे. आपण जे जमिनीमधून घेतो याचा काहीतरी मोबदला तिला दिला गेला पाहिजे. जमिनीतील ह्युमस शेणखत, सेंद्रिय खते, गांडूळ खत, हिरवळीचे खत याचा वापर करून वाढवता येते. त्यासाठी शक्य तेवढा याचा वापर करावा व गरज भासल्यास ह्युमिक अॅसिड वापरावे.
ह्युमिक अॅसिडचे महत्त्व म्हणजे हे कोणत्याही पिकाच्या पांढ-या मुळांची जोरात वाढ करते. पिकाला अन्नरस हे पांढरे मुळेच पुरवतात व पांढरी मुळे सक्रिय सक्षम, सशक्त असतील तर आपोआप अन्नद्रव्ये शोधतील व पिकाला पुरवतील. त्यास सक्रिय सशक्त बनविण्याचे काम ह्युमिक अॅसिड करते. रासायनिक खतांची पिकास उपलब्धता वाढण्यासाठी ह्युमिक अॅसिडचा फार फायदा होतो.
आता ह्युमिक अॅसिडचे वापरणे फार कमी खर्चाचे व भरपूर फायद्याचे आहे. मात्र, त्या गुणवत्तेचे ह्युमिक अॅसिड आपणास मिळाले पाहिजे.
साधारणतः तीन प्रकारचे ह्युमिक अॅसिड बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये ६ टक्के प्रमाण असलेले ह्युमिक अॅसिड दाणेदार, १२ टक्के प्रमाण असलेले ह्युमिक अॅसिड द्रवरूप व १२ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण असलेले ज्यामध्ये ९८ टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, ह्युमिक अॅसिड हे दाणेदारमध्ये ६ टक्के व द्रवरूप १२ टक्के या स्वरूपात वापरणे चांगले, असे जाणकारांचे मत आहे. त्यापेक्षा जास्त प्रमाणात टक्केवारी असलेले त्या ह्युमिक अॅसिडची (सोल्युबिलिटी) विरघळण्याची क्षमता असू शकते. रासायनिक खतांचा बराच अंश पिकाला मिळत नाही. बरीच अन्नद्रव्ये जमिनीमध्ये फिक्स होतात व पीक त्यांचे सहज शोषण करू शकत नाही. अशा वेळेस ह्युमिक अॅसिड वापरलेले असल्यास पांढ-या मुळांना शक्ती मिळाल्याने ही अन्नद्रव्ये शोषण्यास मदत होते. ह्युमिक अॅसिडच्या वापराचा सर्वांत जास्त फायदा जमिनीखाली वाढणाच्या पिकांना जसे अद्रक, हळद, कांदा, बटाटा यांना होतो. यासोबतच कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, ऊस यांनासुद्धा याचा फायदा होतो. त्याच्या वापराच्या विविध पद्धतींमध्ये पेरणीबरोबर किंवा खताच्या दुस-या मात्रेबरोबर दाणेदार ह्युमिक अॅसिड एकरी ५ ते १० किलो वापरावे. हे रासायनिक खताम ध्येसुद्धा मिसळून टाकता येते. आपल्या खर्चाच्या नियोजनानुसार एकरी दाणेदार ६% ह्युमिक अॅसिड ५ किलो द्यायचे की १० किलो द्यायचे ते आपण ठरवावे. याचा वापर जास्त केला तरी फायदाच होतो. नुकसान होत नाही. जमिनीमधून वापरल्यानंतर एक वेळेस द्रवरूप ह्युमिक अॅसिड १२% फवारणीमध्येसुद्धा वापरायला चालते. जमिनीतून न वापरल्यास दोन वेळेस फवारणीतून वापरावे. ह्युमिक अॅसिड वापरण्याची तिसरी व सर्वांत फायद्याची पद्धत म्हणजे पीक लहान असताना ठिबक सिंचनामधून किंवा ठिबक नसल्यास पाठीवरच्या पंपात पाण्यात टाकून हे मिश्रण झाडांच्या बुडाशी टाकावे. ठिबकद्वारे किंवा ड्रेचिंगद्वारे एकरी दीड ते दोन लिटर ह्युमिक अॅसिड वापरल्यास खूपच चांगले परिणाम दिसतात.
ह्युमिक अॅसिडचे ड्रेचिंग (बुडाशी टाकणे) करीत असल्यास सोबत १ किलो फवारणीचे सल्फर डब्ल्यूडीजी व २ किलो कॅल्शिअम नायट्रेट एकरी दिल्यास दुय्यम घटकांची गरजसुद्धा यातून पूर्ण होते. जमिनीतून सिंगल सुपर फॉस्फेट वापरले असल्यास सल्फर व कॅल्शिअम नायट्रेट वापरण्याची गरज नाही. अशा प्रकारे ह्युमिक अॅसिड हे शेतक-यांना एक वरदान ठरू शकते. फक्त ते चांगल्या गुणवत्तेचे मिळणे फारच महत्त्वाचे आहे. ह्युमिक अॅसिड जवळपास सर्व रसायनांसोबत फवारणीस योग्य आहे. काही नामवंत ह्युमिक अॅसिडची व्यापारी नावे ६% दाणेदार - रायझर-जी, इकोह्युम-जी, ह्युमिसील-जी १२% द्रवरूप - ह्युमिसील, रायझर, रूटकिंग 
नायट्रोबेंझीन
नायट्रोबेंझीनचा वापर कळीच्या गर्भधारणेसाठी व फुले लागण्यासाठी करतात. याच्या वापरामुळे भरपूर फळधारणा होते. मात्र, फुले लागण्यापूर्वी व फार उशिरा याचा वापर करू नये. वार्डन, बुमफ्लावर किंवा एनब्ल्यू यापैकी किंवा तत्सम कुठलेही चांगले नायट्रोबेंझीन १० लिटर पाण्यात ३० मिली या प्रमाणात फूलधारणेच्या वेळेस फवारणी केल्यास पात्या-फुलांच्या संख्येत वाढ होते. 
जी.ए
जी.ए.च्या वापरामुळे पिकामधील अवयवांच्या पेशींच्या संख्येमध्ये वाढ होते व पेशींचा आकारसुद्धा वाढतो. म्हणजेच पानांवर फवारले असता पानांचा आकार वाढतो. बोंडांवर फवारले असता बोंडांचा आकार वाढतो. वाढ खुटलेल्या झाडांची वाढ व्हावी यासाठी वाढीच्या अवस्थेमध्ये १०० लिटर पाण्यात एक ग्रॅम जी.ए. व ७० टक्क्यांपेक्षा जास्त बोंडे तयार झाल्यानंतर बोंडाचा आकार व वजन वाढण्यासाठी तेवढ्याच प्रमाणात त्या अवस्थेमध्ये जी.ए. फवारतात. जी.ए. पाण्यात विरघळत नसल्याने एकतर असिटोन, ट्राइकंटेनॉल किंवा देशी दारूमध्ये आधी विरघळून घेऊन नंतर ते पाण्यात टाकावे. जी.ए.चा अनावश्यक वापर करू नये. गरज नसताना वापरल्यास पानांचा आकार फार मोठा होतो. फांद्या वाढतात. अनावश्यक वाढीने झाड ठिसूळ होते. पाने, बोंडे गळू शकतात. म्हणून जी.ए. गरज असेल तेव्हाच समजून-उमजून वापरावे. फरदड घेताना नवीन पालवी पाने लहान असताना १ ग्रॅम जी.ए.चा वापर ३ पंपांमध्ये करावा तसेच फरदडच्या बोंडांच्या वाढीसाठीसुद्धा जी.ए. वापरावे. यामुळे फरदडमध्ये भरपूर उत्पादन मिळते. 
ट्राइकंटेनॉल
ट्राइकंटेनॉलचा वापर हा पिकाची प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढावी यासाठी करतात. साधारणतः जेव्हा जास्त दिवस ढगाळ वातावरण असते व प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावून झाडाची वाढ खुटते अशा वेळेस ट्राइकंटेनॉल विपुल, मिरेकल, मिरंकुलॉन १० लिटर पाण्यात २० मिली टाकून फवारल्यास प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये वाढ होते व झाडाची झपाट्याने वाढ होते.       एन.ए.ए
प्लॅनोफिक्सचा वापर पातेगळ व फूलगळ कमी करण्यासाठी करतात. नैसर्गिक गळ जेव्हा मोठ्या प्रमाणात होते अशा वेळेस याचा वापर योग्य प्रमाणात करावा. १० लिटर पाण्यात ५ मिलीपेक्षा जास्त वापरल्यास नुकसानसुद्धा होऊ शकते. पात्याच्या व फांदीच्या जोडावरील पोकळी कमी किंवा नष्ट करण्याचे काम हे करते. मोठ्या गॅपनंतर पावसाचा अंदाज असल्यास वातावरणामध्ये एकदम बदल होणे अपेक्षित असल्यास त्यापूर्वीच प्लॅनोफिक्स वापरावे. 
शॉक-अब
शॉक-अब हे उत्पादन तणनाशकासोबत फवारण्यास वापरतात. जेव्हा निवडक तणनाशके पिकामध्ये फवारले जातात तेव्हा तण नियंत्रित होते. मात्र, तणनाशकामुळे मुख्य पिकालासुद्धा थोडा शॉक लागतो, काही ठिकाणी पिकामध्ये पिवळेपणा येतो. कुठे पिकाची वाढ खुटते, अशा वेळेस मुख्य पिकाला पोषक व तणास घातक ठरेल व तणनाशकाचा परिणाम मुख्य पिकावर जास्त जाणवणार नाही यासाठी तणनाशकासोबत ही उत्पादने वापरतात. तुलनात्मक स्वस्त व दीर्घकालीन परिणामकारक हे उत्पादन ४० ते ५० मि.लि. प्रतिपंप फवारण्याची शिफारस आहे. शॉक-अबचा वापर कापसामध्ये हिटवीड, टरगासुपरसोबत करतात तसेच याचा वापर मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या तणनाशकांसोबत होतो.
अनिवडक तणनाशके जसे की ग्लाइफोसेट पॅराक्वॉट डायक्लोराइड जे सर्वच पीक असो की तण सर्वच संपवते अशा तणनाशकासोबत हे वापरू नये. फक्त उभ्या पिकामध्ये सोयाबीन, कापूस, ऊस फवारल्या जाणा-या तणनाशकासोबत वापरावे.

रिफ्रेश
रिफ्रेश किंवा तत्सम उत्पादनांमध्ये अमीनो आम्ल असते. ज्यामुळे पिकामध्ये हिरवेपणा, ताजेपणा येऊन झपाट्याने वाढ होते. पिकाची वाढ जास्त पावसाने किंवा कमी पावसाने किंवा कुठल्याही कारणाने कमी असल्यास लवकर वाढ होण्यासाठी रिफ्रेशचा वापर प्रतिपंप ४० मिली या प्रमाणात करावा.
या प्रकारे कोणत्याही संजीवकाचा किंवा संप्रेरकाचा वापर हा फार फायद्याचा ठरू शकतो व त्यावर केलेल्या खर्चापेक्षा मोठ्या पटीमध्ये मोबदला मिळू शकतो. मात्र, त्याचा वापर समजून-उमजून किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा व चांगल्या गुणवत्तेचीच शिफारसीत उत्पादने वापरावीत. कोणतीच दोन उत्पादने सारखी नसल्यामुळे आपल्याला हवे असलेल्या उत्पादनासाठी विक्रेत्याकडे आग्रह धरावा. 

No comments:

Post a Comment