Search This Blog

ठिबक सिंचन काळाची गरज


ठिबक सिंचन काळाची गरज

ठिबक सिंचन म्हणजे जमीन, पाणी, हवामान पीक इत्यादी बाबींचा अभ्यास करून कमी दाबाने व नियंत्रित दराने पिकाच्या गरजेनुसार मुळांच्या कक्षेत समप्रमाणात पाणी देणे.
आतापर्यंत शेतक-यांना असे वाटत होते की, ज्यांच्याकडे कमी पाणी आहे त्यांनी किंवा फक्त ज्याच्याकडे फळझाडे आहेत त्यांनीच ठिबक करावे किंवा अशांसाठीच ठिबक फायद्याचे आहे. मात्र, हा पूर्ण गैरसमज आहे. आता ज्याच्याकडे बागायती शेती आहे त्या प्रत्येकाने ठिबक सिंचन करावे. ही काळाची गरज आहे. कारण ठिबकमुळे फक्त पाण्याचीच बचत होत नाही तर सध्याचे ज्वलंत प्रश्न जसे मजुरी, पाणी, इलेक्ट्रिसिटी व मजूर यांचा मेळ एखाद्या वेळेसच बसतो; पण ठिबक असल्यास हे प्रत्येक वेळेस शक्य आहे. नियंत्रित पाण्यामुळे पाहिजे तेवढ्या जागेतच ओलावा व तणे राहतात. इतर अवास्तव तणे वाढत नसल्याने मजुरीत मोठी बचत होते. आतापर्यंत फार महत्त्वाचा न वाटलेला फायदा म्हणजे रासायनिक खतांची बचत. ठिबकद्वारे रासायनिक खते दिल्यास खतांचा खर्च जवळपास ५०% वर येतो. या व इतर अनेक कारणांमुळे ठिबक सिंचन काळाची गरज झाली आहे.

ठिबक सिंचनाचे फायदे
पाण्यात ७०% पर्यंत बचत. २) मजुरीमध्ये ५०% पेक्षा जास्त बचत. ३) खतांमध्ये ५०% बचत. ४) वापसा स्थितीमुळे पिकाची सतत व जोमदार वाढ. ५) चढ-उताराची, मुरमाड, चोपण, क्षारयुक्त सगळ्या प्रकारच्या जमिनीत पाणी देणे सोपे. ६) जमिनीची धूप थांबते. ७) निंदणाचा खर्च कमी लागतो. ८) एकाच वेळेस सगळीकडे पाणी देणे शक्य होते. ९) वेळेवर व पाहिजे तेवढे पाणी दिले जाते.

ठिबक सिंचन संचातील घटक, त्यांचे कार्य व ओळख
ठिबक सिंचन संच कार्यक्षमरीत्या चालवण्याकरिता संचातील प्रत्येक घटकाची कार्यप्रणाली समजून घेणे आवश्यक आहे.
१)      हेडर असेंब्ली : - बायपास, नॉन रिटर्न व्हॉल्व्ह एअर रिलीज व्हॉल्व्हयांची संयुक्त जुळवणी म्हणजे हेडर असेंब्ली.
२)      फिल्टरर्स : - पाणी कितीही स्वच्छ दिसले तरी त्यातील बारीक कचरा ड्रिपरमध्ये अडकून ड्रिपर बंद पडू नये म्हणून आपल्या पाण्याचा स्रोत, गुणवत्ता व गरजेनुसार स्क्रीन फिल्टर, सँड फिल्टर, सँड सेपरेटर इत्यादीपैकी शिफारस केलेले फिल्टर लावावे.
३)   रसायने/खते देण्याची साधने - बरेच शेतकरी हे साधने लावत नाहीत जी अत्यंत महत्त्वाची आहेत. रासायनिक खतांचा वापर याद्वारे केल्यास खर्चात ५०% पर्यंत बचत होते. त्यामुळे हे फारच गरजेचे आहे. व्हेंच्युरी किंवा फर्टिलायझर टॅक ठिबक सिंचन बसवतानाच लावावा.
४)  मेन लाईन - पंपापासून सबमेनपर्यंत पाणी वाहून नेते. यावर ओपनसुद्धा ठेवता येते.
५)      सबमेन - मेनलाईनमधील पाणी सबमेनद्वारे लॅटरलरपर्यंत पोहोचविले जाते.
६)  व्हॉल्व्हज - वेगवेगळे बॉल व्हॉल्व्ह, मेट व्हॉल्व्ह, फ्लश वॉल्व्ह, एअर रिलीज व्हॉल्व्ह
७)      लॅटरल - सबमेनमधील पाणी लॅटरलद्वारे सर्व शेतात जाते.
८)      एमिटर्स - इनलाईन, ऑनलाईन ड्रिपर्स व त्यांच्या आकार डिस्चार्जवर वेगवेगळे प्रकार आहेत.

काही महत्त्वाच्या बाबी
१)    ठिबक सिंचनामध्ये पिकाला लागणाच्या पाण्याची गरज, पीक व पिकाचे वय, जमिनीची प्रत, जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन, पानांवाटे होणारे उत्सर्जन, दोन ओळी व रोपांतील अंतर, वा-याचा वेग व हवेतील आर्द्रता यावर आधारित असते.
२)  ठिबक सिंचन संच बसविण्याआधी कंपनी प्रतिनिधी किंवा विक्रेता पूर्ण शेताचा प्रत्यक्ष सर्वे करून डिझाईन तयार करतो. त्यानुसारच किंवा तांत्रिक माणसाने प्रत्यक्ष पाहणी करून शिफारस केल्याप्रमाणेच सर्व साहित्य वापरावे.
३)     खते देण्यासाठीचा फर्टिलायझर टॅक किंवा व्हेंच्युरी आवश्यक बसवावी. याशिवाय ठिबक संच हा अर्धवट राहतो.
४)  ठिबक सिंचन संच बसविल्यानंतर कंपनी प्रतिनिधी किंवा विक्रेता आपल्याला संचाचे निरनिराळे भाग, त्यांचे कार्य, वैशिष्ट्ये निगा, व्हेंच्युरी किंवा फर्टिलायझर टॅकद्वारे खते कशी द्यावीत. याबद्दल मार्गदर्शन करील तेव्हा आपण स्वतः व नेहमीचा माणूस हजर राहून सर्व समजावून घ्यावे
५)     दररोज फिल्टर बॅकवॉश देऊन साफ करावे व फिल्टर उघडून आठवड्यातून एकदा साफ करावे. पाण्याच्या गुणवत्तेनुसार अॅसिड ट्रीटमेंट व क्लोरिन ट्रीटमेंट करावी.
६) ज्या कंपनीची विक्रीपश्चात सेवा व गुणवत्ता चांगली आहे, अशाच कंपनीचे संच बसवावेत. नेटाफेम, फिनोलेक्स, जैन इत्यादी.
७) व्हेंच्युरी किंवा फर्टिगेशन टॅकमधून सर्व पाण्यात विरघळणारे सर्व घटक जसे विद्राव्य खते युरिया (पांढरा), पोटॅश, लिक्विड, वेटेबल पावडर इत्यादी सर्व देऊ शकतो.
८) पाण्यात पूर्णपणे न विरघळणारे सुपर फॉस्पेट, डी.ए.पी. लाल पोटॅश, १२:३२:१६, १०:२६:२६, २०:२०:०० इत्यादी खते ड्रिपमधून देऊ नयेत. ती जमिनीतूनच वापरावीत.
९) पाणी असल्यास प्री-मान्सून कापसाची लागवड करणे फार फायद्याचे आहे. मात्र, पावसाला उशीर झाल्यास दांडानेसुद्धा मध्ये पाणी द्यावे.

ठिबकद्वारे खते दिल्यास फायदे
१) ठिबकद्वारे दिल्याने नत्र व पालाश (युरिया व पांढरा पोटॅश) व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके अर्धेच लागतात. खतांवरील खर्च अर्धा कमी होतो.
२) पाहिजे तेव्हा अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे उत्पादनामध्ये भरीव वाढ होते.
३) खते देण्याच्या मजुरीमध्ये मोठी बचत होते.
४) खते वाया जात नाहीत, जमीन चांगली राहते.
५) तणांचा उपद्रव कमी होतो, पिकाच्या मुळांच्या कक्षेत सर्व खते मिसळतात

कापसाला ठिबकद्वारे खते देण्याची
सर्वात स्वस्त व सोपी पद्धत
फर्टिगेशन शेड्यूल

अत्यंत कमी खर्चात कापसाला विद्राव्य खते युरिया, पांढरा पोटॅश व संजीवके देण्याचा तक्ता.

ठिबकद्वारे व जमिनीतून खतव्यवस्थापन
जमिनीतून लागवडीसोबत डी.ए.पी. - ५० किलो लागवडीनंतर ३० दिवसांनी डी.ए.पी.-२५ किलो + झिंक सल्फेट - २ किलो द्यावे.



सोबत अवश्य वापरा.
१) एक महिन्याने अंदाजे ३० दिवसाला 
१७:४४ किंवा १२:६१:०० - ५ किलो + रायझर - २ लिटर + सल्फर WDG- १ किलो + कॅल्शियम नायट्रेट - २ किलो
 २) दोन व तीन महिन्यांनी अंदाजे ६० व ९० दिवसाला
   मॅग्नेशियम सल्फेट - ४ किलो + सल्फर WDG - १ किलो + बुस्ट परिस स्पर्श - २५० ग्रॅम
टीप : वरील वेळापत्रक जमिनीतील अन्नद्रव्यांनुसार बदलू शकते. याचा वापर त्यानुसार करावा. या शिफारशी आमच्या प्रयोगांचे निष्कर्ष व प्रगतिशील शेतक-यांच्या अनुभवावरून दिल्या आहेत. या पद्धतीने विद्राव्य खतांपेक्षा फार कमी खर्चात आपण ठिबकद्वारे अन्नद्रव्यव्यवस्थापन करू शकतो.
टीप :
१) नत्र युरियाच्या स्वरूपात व पालाश पांढ-या रंगाच्या पोटॅशच्या स्वरूपात द्यावे. स्फुरद जमिनीमधून डी.ए.पी.च्या स्वरूपात वापरावे.
२) डी.ए.पी. लागवडीबरोबर पहिला हप्ता व ३० ते ४० दिवसांनी दुसरा हप्ता द्यावा.
३) युरिया व पांढरा पोटॅश आठवड्यातून दोन वेळा द्यावा. एखादे वेळेस आठवड्यातून एकदाच दिल्यास प्रमाण दुप्पट करावे.
४) पावसाळ्यातसुद्धा पाण्याची आवश्यकता नसेल तरीही खते देण्यापुरते ठिबक नियमित वापरावे.
५) पाणी दिल्यानंतर शेवटी खते सोडून ५ मिनिटे चालवून ठिबक बंद करावे.
६) खते देताना सर्व भागांत सारखे पाणी मिळेल यासाठी प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी पाहिजे तेवढेच व्हॉल्व्ह सुरू ठेवावेत.
ठिबक सिंचनाचा वापर व्यवस्थित केल्यास एकाच वर्षामध्ये त्याचा खर्च निघून शिल्लक फायदा होतो. शक्य होईल त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर कपाशी व इतर पिकांसाठी अवश्य करावा.

No comments:

Post a Comment