Search This Blog

सोयाबीन लागवड तंत्र


सोयाबीन लागवड तंत्र

     सोयाबीन पिकाची गुणवत्ता लक्षात घेता नियोजनपूर्वक पेरणी केल्यास शेतीत हे एक आशावादी पीक ठरेल. २० टक्के तेलाचे प्रमाण व ४० टक्के प्रथिनांमुळे विविधोपयोगी सोयाबीनला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. विदर्भ व मराठवाड्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे पिकाच्या उत्पादनात झालेली वाढ, रब्बीमध्ये दुसरे पीक घेता येत असल्यामुळे दोन पिके एका हंगामात होतात मजुरांची कमी आवशकता व द्विदल पीक व झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्याने हवेतील नत्र स्थिरीकरण होऊन जमिनीचा पोत सुधारतो, म्हणून सोयाबीनचा बिवड सर्व पिकांसाठी चांगला राहतो व महाराष्ट्राच्या ब-याच जिल्ह्यांमध्ये सोयाबीन घेतले जात असल्यामुळे त्याविषयीचे गैरसमज दूर होऊन सोयाबीनच्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र ब-याच वर्षांपासून उत्पादन घेणा-या भागात आता एकरी उत्पादन कमी झाले आहे.

बीज प्रक्रियेचे महत्त्व
सोयाबीन बियाण्याला बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बियाण्यांद्वारे प्रसार होणा-या बुरशीला नियंत्रित करता येते. त्यासाठी प्रतिकिलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम + एक ग्रॅम कार्बण्डॅझिम या प्रमाणात बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो लावावे. खोडमाशी, चक्रभुंगा व जमिनीतील ह्युमिनी अळी या सर्वांच्या नियंत्रणासाठी प्रतिकिलो बियाण्यास ४ ते ५ मिली रिहांश किंवा स्लेअरप्रो लावावे. सोयाबीन हे द्विदलवर्गीय पीक असल्याने त्याला रायझोबियम जापोनीकम २० ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास पेरणीपूर्वी दोन-तीन तास अगोदर लावून सावलीत सुकवावे. तसेच सोयाबीनच्या शेतात पी.एस.बी., पी.एम.बी. जिवाणूसुद्धा एकरी १ किलो शेणखतामध्ये मिसळून फेकावे. यामुळे स्फुरद व पालाश मिळण्यास मदत होईल. थोडक्यात, प्रतिकिलो बियाण्यास आधी ३ ग्रॅम थायरम व १ ग्रॅम कार्बडायझिम लावल्यानंतर ४ ते ५ मिली रिहांश व शेवटी २० ग्रॅम रायझोबियम लावावे. जिवाणू खते ही चांगल्या गुणवत्तेचीच व फ्रेश असावीत. त्यांच्या वापराने उत्पादन वाढ निश्चित होते.
बीजप्रक्रिया करताना बियाणे जोरात घासू नये. त्याचे टरफल नाजूक असल्यामुळे उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रथम बुरशीनाशकाची व कीटकनाशकांची प्रक्रिया करून नंतर जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. या सर्व बीजप्रक्रियांमुळे बियाण्याद्वारे किंवा जमिनीतून होणा-या बुरशीच्या प्रसारास आळा बसून, रायझोबियममुळे मुळावरच्या गाठींमध्ये वाढ होऊन हवेतील नत्राच्या स्थिरीकरणामध्ये वाढ होते. 

योग्य वाणाची निवड
माझ्या माहितीप्रमाणे सोयाबीनची जेएस-३३५ ही जात आजपर्यंत उत्कृष्ट ठरली आहे तसेच मागील एक-दोन वर्षांमध्ये जे.एस. ९३०५ ही जातसुद्धा शेतक-यांना बयापैकी पसंत येत आहे. याव्यतिरिक्त इतर काही जाती जसे २२८, ७१, १६२ किंवा खाजगी कंपन्यांची संशोधनेसुद्धा आहेत. ३३५ फार जुनी झाल्याने कीड व रोगास बळी पडणे सुरू झालेले आहे. काही क्षेत्रांत इतर जातींची लागवड करून त्यापैकी चांगली जात निवडून पुढे वापरावी.

     एकरी बियाण्याचे प्रमाण
सोयाबीनची एकरी ३० किलो बियाणे पेरणीची शिफारस आहे. काही शेतक-यांचा असा अनुभव आहे. की, ७५ टक्क्यांपेक्षा जास्त उगवणक्षमता असल्यास एकरी २५ किलो बियाणे पेरून उत्पादनामध्ये वाढ होते. घरचे बियाणे वापरायचे असल्यास त्याची उगवणशक्ती घरीच तपासून पाहावी. १ लाख ७० हजारांच्या जवळपास एकरी झाडांची संख्या असावी. घरचे बियाणे ठेवायचे असल्यास ते बियाणे मळणीयंत्राचा वेग कमी करून काढावे किंवा गंजीच्या खालचे दाणे ठेवावेत. बियाणे एखाद्या वेगळ्या जागी ठेवावे. त्याला जास्त हाताळू नये, त्यावर जास्त वजन ठेवू नये. घरचे चांगले बियाणे असल्यास त्याची उगवण शक्ती ७०% पेक्षा जास्त असल्यास पेरण्यास उत्तम आहे. उगवणशक्ती तपासण्यासाठी माती मोकळी करून त्यामध्ये १० बियांच्या १० लाईन म्हणजे १०० दाणे जमिनीत लावून त्याला वेळेवर पाणी टाकावे. त्यापैकी जेवढे दाणे उगवतील तेवढे टक्के बियाण्याची उगवणशक्ती समजावी. उगवणशक्ती तपासण्याच्या इतरही काही पद्धती आहेत. त्यापैकी कोणत्याही पद्धतीने उगवणशक्ती तपासावी. बॅगच्या बियाण्याच्या किमतीमध्ये व घरच्या सोयाबीनच्या किमतीमध्ये जास्त फरक असल्यास घरचे बियाणे पेरणेच फायद्याचे असते. ७०% पेक्षा कमी उगवण असल्यास तेवढे किलो जास्त बियाणे पेरणे हासुद्धा पर्याय आहे. दरवर्षी शक्यतोवर काही प्रमाणात घरचे बियाणे वेगळे काढून ठेवावे.
बाजारातून विकत घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची पिशवी असो वा घरचे बियाणे असो त्याची काळजी घेणे जरूरी आहे. कारण हे आदळल्यास किंवा जास्त हाताळणी झाल्यास टरफल नाजूक असल्याने उगवणशक्ती कमी होऊ शकते.

  खत व्यवस्थापन
एकरी १२ किलो नत्र व ३० किलो स्फुरद वापरण्याची शिफारस आहे. म्हणजेच डीएपी एकरी ६० ते ७० किलो दिल्यास शिफारशीत मात्रा दिली जाते. काही ठिकाणी सुपर फॉस्फेट पेरणीपूर्वी वापरतात. ते चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे. ज्या जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ ही खतेसुद्धा उपयुक्त ठरतात. सोयाबीनला खताची मात्रा पेरतानाच द्यावी, दुस-या पिकांप्रमाणे नंतर नत्राची दुसरी मात्रा देऊ नये. फक्त पेरताना खते दिल्यानंतर दुस-या मात्रेची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे सोयाबीनला एकरी १० किलो सल्फर दाणेदार किंवा १ किलो WDG + ५ किलो ह्युमिक अॅसिड दाणेदार जसे रायझर-जी किंवा ह्युमॉल किंवा ह्युमिसील पेरणीबरोबर दिल्यास विशेष फायदा होतो.
चुनखडी जमिनीमध्ये झिंक व फेरसची कमतरता असते. अशा जमिनीत सोयाबीन पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी पाने पिवळी होतात. त्यातच तणनाशकाची फवारणी केल्यास पाने जास्त पिवळी होऊन जळतात. अशा चुनखडी जमिनीमध्ये सोयाबीन पेरताना एकरी ५ किलो झिंक सल्फेट व ३ किलो फेरस सल्फेटचा वापर करावा व ३० दिवसांनी एकरी १५ किलो युरियासुद्धा द्यावा. पेरताना सोबत झिंक व फेरस न वापरल्यास ३० दिवसांनी फवारणीतून परिस स्पर्श किंवा बुस्ट झिंक व बुस्ट फेरस वापरावे. शक्यतोवर अशा जमिनीत पाने पिवळी झाल्यास त्यामध्ये तणनाशक फवारू नये.

आंतरपीक पद्धत
कोरडवाहू शेतीमध्ये धान्य, चारा व कडधान्याची गरज भागविण्यासाठी व अधिक लाभ मिळवण्याकरिता सोयाबीन + ज्वारी + तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीत ६:२:१, ९:२:१ या ओळींच्या प्रमाणात पेरणी करावी किंवा सोयाबीन + तूर ६:१ किंवा ५:१ अशी पेरणी करावी किंवा तूर प्रकरणामध्ये दिल्यानुसार तुरीमध्ये आंतरपीक घ्यावे.

आंतरमशागत
पीक फुलोरा अवस्थेत असताना मुळीच डवरणी करू नये. पहिली डवरणी १५ ते २० दिवसांनी तणनाशकाच्या फवा-यापूर्वी व दुसरी ३० ते ३५ दिवसांनी किंवा फक्त एकच डवरणी केली तरी चालेल. दुस-या डवरणीच्या वेळेस डवन्याला दोरी बांधल्यास रोपांच्या ओळीवर मातीची भर पडून सया पडतात व पाणी संग्रहित होते किंवा डवरणी करताना तीन ओळीनंतर सरी काढावी किंवा पट्टा पद्धतीने (६ ओळी सोयाबीन व त्यानंतर १ ओळ रिकामी) पेरणी करून नंतर रिकाम्या ओळीत सरी पाडावी. यापैकी कोणतीही एक पद्धत केल्यास पाणी मुरण्यास मदत होते. ५० ते ६० दिवसांनी दोन टक्के युरियाची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.

रासायनिक तणनियंत्रण
दिवसेंदिवस मजुरांची उपलब्धता कमी होत असल्याने तणनाशकाच्या माध्यमातून तणनियंत्रण करणे हा एक चांगला पर्याय आहे. सोयाबीनमधील बरीच तणनाशके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी इमॅझिोंपर या तणनाशकाचा वापर वाढत आहे. 
पेरणीनंतर सात ते २१ दिवसांनी एकरी ३०० मि.लि. इमॅझिपर (परस्यूट किंवा तत्सम) + ३०० मि.लि. अमोनियम सल्फेट + २२५ मि.लि. स्टीकर माहितीपत्रकात दिल्याप्रमाणे तंतोतंत फवारणी करावी किंवा पेरणीपूर्वी फ्लुक्लोरेंलिन ७५० मि.लि. प्रतिएकर किंवा पेरणी झाल्याबरोबर अलाक्लोर दीड लिटर प्रतिएकर फवारावे. स्ट्रॉगआर्म नावाचे नवीन उत्कृष्ट तणनाशक बाजारात आले आहे. त्याचा वापर पेरण्याच्या मागेच किंवा पेरणीच्या पहिला दिवस धरल्यास तिस-या दिवसापर्यंत करू शकाल. मात्र, त्यानंतर त्याचा वापर करू नये. एकरी प्रमाण १२.४ ग्रॅम आहे. १० ग्लास पाण्यात १२.४ ग्रॅम स्ट्राँगआर्म मिसळून एका एकरामध्ये वापरावे. मध्ये तुरीचे आंतरपीक असल्यास १२.४ ग्रॅमचे १२ पंप करावेत. म्हणजेच एक एकराचे औषध साधारणतः सव्वाएकरामध्ये वापरावे. हे उत्कृष्ट तणनियंत्रण करते.
बरयाच शेतांमध्ये तणनाशक फवारल्यानंतर सोयाबीन पिवळे पडते. त्याची वाढ खुटते. त्याला एक प्रकारचा शॉक लागतो. हे टाळण्यासाठी तणनाशकासोबत स्वस्त व परिणामकारक शॉकअब या औषधाचा ४० ते ५० मिली प्रतिपंप वापर करावा. जमिनीमध्ये ओलावा फार कमी असल्यास तणनाशक फवारणे लांबवावे. तणे जास्त वाढल्यास त्यांचे नियंत्रण तणनाशकाने करणे कठीण असते. त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा असताना साधारणतः पेरणीनंतर १५ ते २५ दिवसांमध्ये तणनाशकाचा वापर करावा. नंतर सोयाबीनची चांगली वाढ झाल्यानंतर तणे जोर करत नाहीत. तरी काही कारणास्तव काही भागात तणे वाढल्यास निंदण करावे. दुस-या वेळेस तणनाशक फवारल्यास सोयाबीन पिकाला झटका लागण्याची शक्यता असते.
तणनाशकाचा वापर हा सर्व गोष्टी व्यवस्थित पाळल्यास फायद्याचा ठरतो. छोट्या चुकासुद्धा याच्या परिणामावर फरक पाडतात. त्यामुळे कोणत्याही तणनाशकाचा वापर समजून-उमजून करावा.
पाणी व्यवस्थापन
खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास सोयाबीनला एक किंवा दोन वेळा संरक्षणात्मक पाणी द्यावे. फुलोरा अवस्था व दाणे भरण्याची अवस्था या दोन नाजूक अवस्था असून, फुलोरा अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते.
किडी व त्यांचे व्यवस्थापन
खोडमाशी व गर्डल बिटल (चक्रभुंगा) : मागील दोन-तीन वर्षांत या किडींनी काही भागात ८०% पर्यंत नुकसान केल्याचे आढळते. लवकर सुरुवात झाल्यास झाडे मरतात. पहिली पाने खाऊन नंतर अळी फांदी व खोड पोखरतात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. खोड पूर्ण पोखरत नसल्याने झाड मरत नाही. वाढ चालू राहते. फुले लागतात; पण शेंगांमध्ये दाणे भरताना अन्नद्रव्ये कमी पडतात. त्यामुळे दाणे बारीक व शेंगा पोचट राहतात. शेंगांची गळ होते. किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी उगवण झाल्यानंतर ३५ ते ४० दिवसांपर्यंत शेतातील वेगवेगळ्या ठिकाणची १० झाडे उपटून शेंड्यापासून मुळापर्यंत उभे दोन भाग काप द्यावा. त्यामध्ये दोन किंवा जास्त झाडांच्या खोडात अळी किंवा अळीची विष्ठा किंवा पोखरलेले असल्यास या किडींचे प्रमाण वाढत आहे असे समजावे. या किडीची सुरुवात पेरणीनंतर २५ दिवसांनी होते व पेरणीनंतर ६० दिवसांपर्यंत राहते म्हणून तिचे नियंत्रण या काळातच करावे. बीजप्रक्रियेमध्ये रिहांश ५ मिली प्रतिकिलो वापरल्यास प्रादुर्भाव कमी होतो किंवा होतच नाही. बीजप्रक्रिया न केल्यास तणनाशकाचा २० ते ३० दिवसांदरम्यान फवारा असल्यास त्यासोबतच ट्रायझोफॉस डेल्टामेथ्रीन (हेकर/शिकारी/डेलफॉस) याचा वापर करावा किंवा तणनाशकासोबत न केल्यास २५ ते ४० दिवसांमध्ये प्रादुर्भाव पाहून याचा वापर करावा.

पाने खाणा-या अळ्या

हिरवी उंटअळी : अळी हिरव्या रंगाची असून, चालताना उंटासारखी बाक काढते. लहान अळ्या प्रथम पानांचा हिरवा भाग खरवडून खातात व मोठ्या अळ्या सर्व पाने खातात. जास्त प्रादुर्भावात फक्त शिराच शिल्लक राहतात. अळ्या फुले व शेंगांचेसुद्धा नुकसान करतात.

तंबाखूची पाने खाणारी अळी : ही अळी मळकट, हिरव्या रंगाची असून, तिच्या शरीरावर पिवळसर, नारंगी रेखा आणि काळे ठिपके असतात. अळी पुंजक्याने पानांवर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या पानांचा हिरवा पदार्थ खातात. जाळीदार पानांच्या मागे पुष्कळ लहान अळ्या असतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास झाडाला पाने राहत नाहीत. पानांची चाळणी होते.

केसाळ अळी : अळीची दोन्ही टोके काळी, तर मधला भाग मळकट, पिवळा असतो. तिच्या अंगावर दाट नारंगी केस असतात. पानांच्या मागच्या बाजूला राहून अळ्या पाने खातात. जास्त प्रादुर्भावात झाडाचे खोडच फक्त शिल्लक राहते. 

पाने पोखरणारी अळी : अळी फिक्कट, हिरव्या रंगाची, गर्द डोक्याची असून, सुरुवातीला सोयाबीनची पाने पोखरते. त्यामुळे कीडग्रस्त पान आक्रसते. पुढे अळी पानांची गुंडाळी करून हिरवा भाग खाते. जास्त प्रादुर्भाव असल्यास पूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.
वरील जवळपास सर्व प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी शक्यतो ६० दिवसांपूर्वीचा फवारा असल्यास त्यामध्ये संयुक्त कीटकनाशक जसे ट्रायझोफॉस + डेल्टामेथ्रिन (हॅकर/शिकारी) किंवा प्रोफोनोफॉस + सायपरमेथ्रिन (सरेंडर/प्रोफेक्ससुपर) वापरल्यास खोडमाशी, चक्रभुंगा, पांढरी माशी, तुडतुडा व सर्व अळ्या नियंत्रित होत असल्याने याला प्राधान्य द्यावे व फक्त अळीच असेल किंवा ६० दिवसांनंतरचा फवारा असेल तर इमामेक्टीन / कोराजन/फेम यापैकी एखादे अळीनाशक निवडावे.

रोग व त्यांचे व्यवस्थापन

यलो मोनॅक : हा रोग सर्वांत घातक व झपाट्याने प्रसार होणारा आहे. मागील ४ वर्षांत ब-याच भागांत याचा प्रादुर्भाव आढळला. अचानकच सोयाबीनची पाच दहा झाडे पिवळी होतात. मात्र, पानांच्या शिरा हिरव्या राहतात. दुस-या दिवशी हे प्रमाण १०० वर जाते. तिस-या दिवसी ५०० ते १,००० झाडे पिवळी होतात. या प्रमाणात हा रोग वाढून सर्व शेत पिवळे होते व १००% पर्यंत नुकसान होऊ शकते. हा रोग सोयाबीनव्यतिरिक्त उडीद, मूग, चवळी या पिकांवरसुद्धा आढळतो. हा व्हायरसचा प्रकार असल्याने यावर काहीही उपाय नाही. फक्त याचा प्रसार करणारे किडे जसे- तुडतुडा व पांढरी माशी यांची नियंत्रण ताबडतोब केल्यास या रोगाला रोखता येते. त्यासाठी सतत बारीक निरीक्षण असावे व आधीच सांगितल्याप्रमाणे ६० दिवसांपर्यंत हॅकर/सरेंडर/शिकारी अशा संयुक्त व बहुकीड नियंत्रक कीटकनाशकांचा वापर करावा.

पानांवरील जिवाणूचे ठिपके : झाडाच्या पानांवर तपकिरी व करड्या रंगाचे ठिपके दिसून, त्याभोवती पिवळसर वलय दिसते. नियंत्रणासाठी ३० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड + १ ग्रॅम स्ट्रेट्पोसायक्लिन प्रतिपंप या प्रमाणात फवारावे.

पानांवरील बुरशीजन्य ठिपके : पानांवर, खोडावर तपकिरी रंगाचे, गडद वलय असलेले ठिपके आढळतात. कालांतराने पानांवरील आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बण्डॅझीम ३० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ५० ग्रॅम प्रतिपंप फवारावे.

तांबेरा : पानांच्या मागील भागावर तांबडे किंवा फिक्कट, काळपट, लोखंडी गंजाच्या रंगाचे छोटे डाग पडतात. रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने गळून पडतात. नियंत्रणासाठी स्कोर २० मि.लि. किंवा हेग्झाकोनॅझॉल २५ मि.लि. फवारावे.
वाढनियंत्रण
बयाच जमिनीमध्ये सोयाबीनची फार वाढ होते व नंतर ते दाटते. अशा ठिकाणी कळी अवस्थेत क्लोरोकॉट क्लोराईड (लिव्होसीन) ३५ मि.लि. प्रतिपंप फवारले असता कायिक वाढ कमी होते व त्याचे रूपांतर फूलफळवाढीमध्ये होते.
काही शेतकरी सोयाबीनवर फार महागडे बुरशीनाशके फवारतात. त्यांच्यानुसार सोयाबीन उत्पादन वाढीसाठी त्यांची गरज आहे. मात्र, माझ्या अभ्यासानुसार बुरशीनाशकामुळे बुरशीचे रोग नियंत्रित होतात. हिरवेपणा व दाण्याचे वजन वाढणे हे बुरशीनाशकाचे कार्य नाही. त्यासाठी आपण इतर संजिवके वापरू शकतो.

इतर महत्त्वाच्या बाबी : पेरणीबरोबर सल्फरचा वापर न केल्यास ४० दिवसांच्या आत करावा. तसेच ह्युमिक अॅसिड पेरणीबरोबर न वापरल्यास पहिल्या फवारणीतून द्रवरूप ह्युमिक अॅसिडचा वापर फायद्याचा ठरतो. तसेच फुलोरा अवस्थेमध्ये फुलांची संख्या वाढावी, शेंगांचा आकार, दाण्यांचे वजन शेंगांचे प्रमाण वाढण्यासाठी एखादे चांगले स्टिमुलंट जसे झेप, भरारी किंवा रॉयल्टी फवारावे. वाणाच्या बाबतीत सद्यःस्थितीमध्ये JS-335 हे सर्व दृष्टींनी सोयीचे आहे. तसेच काही शेतक-यांना ९३०५ सुद्धा चांगले वाटत आहे. संशोधनामध्ये भविष्यात एखादे यापेक्षा चांगले वाण मिळू शकेल.
सोयाबीनची काढणी झाल्याबरोबर ताबडतोब पालापाचोळा जमिनीमध्येओलावा असताना गाडा, मोठ्या प्रमाणात सुपीकता वाढण्यास मदत होते. फवारणीमध्ये विद्राव्य खतांचा पिकाच्या अवस्थेनुसारवापर करावा. सोयाबीन पेरताना ज्वारीचे काही दाणे पेरावेत. पक्षी थांबे करावेत.


गरज पडल्यास अळीनाशक किंवा खोडमाशी/चक्रभुंगा/यलो मोनॅकसाठी एखादा फवारा वाढू शकतो.

No comments:

Post a Comment