Search This Blog

बीटी कापसाबद्दल शंकासमाधान


बीटी कापसाबद्दल शंकासमाधान

१)     बीटी कापसामुळे जमिनीची सुपीकता खराब होते का?
-- नाही. उत्पादन वाढ चालूच आहे व जमिनीला दिला जाणारा मोबदला शेणखत    व इतर नगण्य आहे. त्यामुळे कोणतेही पीक घेतले तरी उत्पादन व त्याचा मोबदला याचे संतुलन चुकल्यास सुपीकता कमी होणारच. मात्र, बीटी कापसाचे जमिनीची सुपीकता कमी होत नाही.

२)     कापसावर कापूस लावावा काय?
-- शक्यतोवर नाही. पिकाचा फेरपालट आवश्यक आहे. कापसावर, सोयाबीन, उडीद, मूग खरिपात लावावे व मर्यादित जमीन असेल, कापसावर कापूस लावावाच लागत असेल तर अशा शेतात भरपूर शेणखत व रासायनिक खते वापरावीत.

३)     तणनाशकाने जमिनीवर वाईट परिणाम होतो काय?
-- तणनाशकांचा वापर पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये आपल्यापेक्षा १०० पट जास्त व अनेक दशकांपासून होत आहे. अजून त्यांच्या जमिनीवर काही वाईट परिणाम झाला नाही. आपला गैरसमज आहे. आपल्याला वाटते एवढे हिरवे झाड जळते. मग जमीन नक्कीच खराब होत असेल. मात्र, तसे नसते. झाडातील हरित द्रव्ये जळतात जमिनीत हरितद्रव्य नसतात व योग्य वापराने तणनाशकांचा जमिनीवर वाईट परिणाम होत नाही.

४)     एका जागेवर एक बी लावावे, की दोन बिया लावाव्यात? 
-- एका जागेवर दोन बिया जरी लावल्या तरी त्यामुळे त्या जागेवरील बोंडांची संख्या व वजन वाढणार नाही. उलट दोन झाडांची त्या ठिकाणी दाटणी होईल म्हणून जर आपण दोन झाडांमधील अंतर एक फूट ठेवत असाल तर एकच बी लावावी व नंतर खाडे (नांगे) लवकर भरावेत. जर दोन बिया लावल्या तर उगवून आल्यानंतर त्यातील एक झाड उपटून घ्यावे.

५)     पेरताना खते दिल्यास बियाणे जळते का?
-- होय. खतावर बी टाकल्यास किंवा बियांवर खत टाकल्यास कमी पाऊस आला तर बियाणे जळेल. मात्र, लागवड करताना आधी खत पेरले की, त्यावर थोडी माती पडते व नंतर बी लावले जाते किंवा बी लावण्याच्या थोड्या अंतरावर खत टाकले जाते म्हणजे खत व बियाण्यात थोडे जर अंतर राहिले तर बी जळत नाही.

६)     कीटकनाशके व इतर कृषी निविष्ठांचा परिणाम दिसत नाही?
-- कीटकनाशकांचा वापर हा योग्य वेळी, योग्य कीटकनाशक व योग्य प्रमाणात केला तरच त्याचा परिणाम दिसतो. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये संजीवके यांचा वापरसुद्धा समजून-उमजूनच करावा. तेव्हा त्यांचे चांगले परिणाम दिसतील. शक्यतोवर आपल्याला अनुभव असलेले किंवा विश्वासपात्र व्यक्तीने सांगितलेले प्रॉडक्टच वापरावेत. कोणतेही एक प्रॉडक्ट दुस-यासारखे नसते. आपल्या शिफारसीत प्रॉडक्टचा आग्रह धरा. योग्य वापर झाल्यास निश्चित फायदा दिसतो.

७)     कापसाला टॉनिक वापरावेत काय?
-- फक्त हिरवा कापूस होणे म्हणजे चांगले रिझल्ट नसतात. कापसाला गरज असल्यास चांगल्या गुणवत्तेचे मिळाल्यास व पाहिजे तेच त्या अवस्थेमध्ये मिळाल्यासच टॉनिक वापरा नाहीतर उधार मिळते, कापूस मस्त हिरवागार होतो. अमुक माणसाने वापरले म्हणून टॉनिक वापरून खर्च वाढवू नका तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार त्या अवस्थेत तसेच टॉनिक वापरा. त्यात बदल करू नका.

८)     यापुढील तंत्रज्ञान कोणते येणार आहे?
-- यापुढे राऊंडअप रेडी, वॉटर स्ट्रेस व इतर तंत्रज्ञान बी.टी.मध्ये येणार आहे. राऊंडअप रेडी म्हणजे त्या कापसामध्ये असा जीन सोडलेला असेल ज्याच्यामुळे कापसावर शेतात ग्लायफोसेट फवारल्यास तण जळेल. मात्र, कापूस नाही. वॉटर स्ट्रेसमुळे त्या झाडांना पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती मिळेल. हे नवनवे तंत्रज्ञान भारतात येत आहे.

९)     कापसाचे वेचणी यंत्र आहे काय? ते कसे आहे?
-- होय. भारतात काही कंपन्यांनी कापूस वेचणी मशीन तयार केली. ती एक माणूस चालवू शकतो; परंतु प्रत्येक बोंडाजवळ तिचे तोंड न्यावे लागत असल्याने त्यापासून फार फायदा दिसला नाही. मात्र, मोठ्या मशीनवर संशोधन चालू आहे. लवकरच अशी मशीन बाजारात येईल.
   
  १०) कापूस-बाजारपेठ कशी मिळवावी?
  -- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर, देशांतर्गत उत्पादन, आयात निर्यातीचे नियम व निर्बध या सर्व गोष्टींवर कापसाची बाजारपेठ अवलंबून असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून कापूस विकावा. प्रत्येक वर्षी परिस्थिती सारखीच राहील असे नसते.
 
  ११) मजूर मिळणे कठीण झाले आहे?
  -- दिवसेंदिवस ही समस्या वाढत चालली आहे; पण हताश होऊन
चालणार नाही. यावर पर्याय शोधा व जास्तीत जास्त तांत्रिक पद्धतीचा वापर करून मशिनरीने कामे पार पाडावीत. तणनाशकांचा वापर करावा. ठिबक संच वापरावा. छोटा ट्रॅक्टर बैलजोडीची सर्व कामे जसे की आंतरमशागत, नांगरणी, कापूस लागवड, फवारणी, रोटॅव्हेटर करतो. यामुळे माणूस किंवा बैलांपेक्षा कितीतरी जास्त पटीत कामे होतात. त्यांचा वापर करावा. या गोष्टींमुळे परावलंबीपणा कमी होईल. शेतकरी
गट करून छोटा ट्रॅक्टर व इतर आधुनिक कृषी अवजारे वापरावीत.
   
   १२) शेती फायद्याची होत नाही, नैराश्य आले, काय करावे?
  -- वस्तुस्थिती पाहता पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास व शेतमालाला भाव नसल्यास खरंच शेती फायद्याची होईल का नाही यात शंका आहे. मात्र, ही वेळ नेहमी सारखी राहत नसते. जीवनात ऊनसावली हा खेळ चालूच राहतो, याचा हिमतीने सामना करायचा असतो. नैराश्य येऊ देऊ नका. प्रत्येक अडचणीवर पर्याय, उपाय असतात. गरज आहे त्याला शोधण्याची. शेती व्यवसाय हा स्वार्थ व परमार्थ दोन्ही देणारा आहे. आपण जगाचे पोशिंदे आहात. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता फक्त आपल्यामध्येच आहे. वाढत चाललेल्या लोकसंख्येला अन्न कारखान्यातून, नोकरीतून किंवा राजकारणातून येणार नाही. त्यामुळे जग ख-या अर्थाने आपल्यावर अवलंबून आहे. खचू नका. आपसातील भेदभाव विसरून एक व्हा. गट तयार करा. निविष्ठा एकत्रित होऊन द्या. चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करा. तज्ज्ञांच्या संपर्कात राहा. तसे पाहता १ रुपयाचे किमान दोन रुपये व कमाल दहा रुपये हे फक्त शेती व्यवसायतच होऊ शकतात. त्यामुळे नियोजनबद्ध जिद्दीने शेती केल्यास हे नक्कीच फायद्याचे होते. फायद्याची शेती करा, उज्वल भविष्य आपल्याच हाती आहे. तांत्रिक मार्गदर्शनासाठी व्हाईट गोल्ड ट्रस्ट सदैव आपल्या सोबत आहेच.

No comments:

Post a Comment